सातारा : माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांना आयकर विभागाकडून एक नोटीस बजावण्यात आली आहे. गेल्या दहा वर्षात पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडील संपत्तीच्या तपशीलाची मागणी या नोटीसीत करण्यात आली आहे. एकवीस दिवसात या नोटीसचे उत्तर चव्हाण यांना द्यायचे आहे तसेच हजर राहण्यास देखील सांगण्यात आले आहे.
सदर नोटीस म्हणजे आयकर विभागाच्या नियमित प्रक्रियेचा भाग असून त्या नोटीसचे उत्तर देण्यात येणार असल्याचे चव्हाण यांनी पत्रकारांना सांगीतले. यावेळी बोलतांना पृथ्वीराज चव्हाण यांनी शरद पवारांना आलेल्या नोटिसचा देखील उल्लेख केला. यावेळी त्यांनी बीजेपीच्या कार्यपद्धतीवर एक प्रकारे टीका करत यंत्रणांच्या गैरवापराबद्दल अप्रत्यक्षपणे बोट ठेवले. ‘सत्तेचा वापर कसा आणि कुणासाठी करायचा याबद्दल बीजेपीने नियोजनबद्ध व्यूहरचना केली असून सगळ काही सुरु असल्याचे त्यांनी म्हटले. काही दिवसांपूर्वी शरद पवार यांना देखील अशाच प्रकारची एक नोटीस आली होती असे चव्हाण यांनी बोलतांना म्हटले.
केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपला वेळोवेळी टार्गेट करत असल्यामुळे आयकर खात्याची नोटीस आली असे वाटते काय? या प्रश्नाच्या उत्तरावर ते म्हणाले की तस काही असेल असे वाटत नाही. मात्र सत्तेचा वापर कसा करायचे हे भाजपला चांगल्या प्रकारे माहीत असल्याचे चव्हाण यांनी पुढे बोलतांना म्हटले. आयकर विभाग बिजेपीच्या नेत्यांना अशा नोटीस पाठवत नसल्याचे देखील चव्हाण यांनी म्हटले आहे.