मुंबई : महापरिनिर्वाण दिन हा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करण्याचा दिवस असल्यामुळे ज्या-ज्या गोष्टी करायच्या, त्या सर्व गोष्टी केल्या जातील. त्यामध्ये कुठलाही कमीपणा येऊ दिला जाणार नाही. मात्र कोरोना विषाणूच्या संकटामुळे यावर्षी जनतेने मुंबईच्या चैत्यभूमीवर गर्दी न करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली 6 डिसेंबर रोजी होणा-या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 64 व्या महापरिनिर्वाण दिनाच्या अनुषंगाने व्हिडीओ कॉन्फरन्सींगच्या माध्यमातून आढावा बैठक घेण्यात आली.
महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीने देखील 6 डिसेंबर रोजी आपल्या अनुयायांना अभिवादनासाठी मुंबईत येवू नये असे आवाहन केले आहे. या भूमिकेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून स्वागत करण्यात आले आहे. महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवरील मानवंदना, अभिवादन आणि दर्शनाचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे.