बीएचआर पतसंस्थेचे 30 हजार कोटीचे मनी लॉंडरींग ? 12 हजार कोटी जप्त करणे अशक्य म्हणणा-यास बेड्या ठोकणार?

जळगाव : 27 नोव्हेंबरच्या सकाळी पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या सुमारे दिडशे अधिका-यांच्या ताफ्याने जळगावात आगमन केले. बीएचआर पतसंस्थेच्या मुख्यालयासह या संस्थेशी संबंधीत उद्योजक, सीए, अवसायक जितेंद्र कंडारे, ठेवीदार संघटनेचे विवेक ठाकरे यांच्यासह विविध ठिकाणी छापे घातले. या छापेमारीमुळे जळगावच्या औद्योगीक विश्वासह जनतेत खळबळ माजली आहे.

राज्यात पतपेढ्यांची जोरदार दुकानदारी गाजत होती. जिल्ह्यातील दोन बड्या पतसंस्थेच्या शाखांचे जाळे पसरले असतांना बीएचआर पतसंस्थेने त्यांना मागे टाकून मल्टीस्टेट दर्जा मिळवत सात राज्यात आपले पाय पसरले होते. अडीचशेसह तिनशे शाखांचे जाळे, 28 ते 38 हजार ठेवीदार आणि 1100 कोटींच्या ठेवींसोबत बॅंकींग क्षेत्राच्या व्याजदरांवर मात करत परताव्यांच्या भन्नाट योजनांचा देखावा मांडून बीएचआर पतसंस्थेचा कारभार सुरु होता. लाखो करोडो रुपयांच्या व्यवहारांचा बाजार मांडून बसलेल्या बीएचआर मल्टीस्टेट पतसंस्थेचे मुख्यालय आणि दिमाखदार वाटचालीचा फुगा पुण्याच्या घोले रोड शाखेतील 1608 कोटींच्या बेनामी व्यवहारातून फुटला.

दरम्यान जिल्ह्यात अशोक सादरे नामक तत्कालीन पोलिस निरीक्षकांनी एका तक्रारीवरुन मल्टीस्टेट पतसंस्था चेअरमन प्रमोद रायसोनी यांना त्याच रात्री घरातून उचलून पोलिस स्टेशनला आणले होते. या कारवाईमुळे त्यावेळी तुफान खळबळ माजली होती. याच गुन्ह्यात पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या उपायुक्त भाग्यश्री नवटके यांच्यासह पौर्णीमा गायकवाड, प्रेरणा कट्टे या तिन महिला अधिका-यांसह सुमारे 135 अधिका-यांच्या पथकाने छापेमारी केली. यात बिएचआर पतसंस्थेची संबंधीत दोन सीए शहरातील व्यावसायीक सुनिल झवर यांचे रमेश मोटार ड्रायव्हींग स्कुल, त्यांचे अकाऊंटंट, जनसंग्राम लोकमंच ठेवीदार संघटनेचे विवेक ठाकरे यांच्या निवासस्थानी छापे टाकण्यात आले.

अवसायनात गेलेल्या या संस्थेच्या प्रमुख पदावर पाच वर्षापासून बसलेल्या जितेंद्र कंडारे ( माजी डीडीआर यवतमाळ) यांच्या निवासस्थानी धाड पडल्याने एकच खळबळ उडाली. विशेष म्हणजे उद्योजक सुनिल झवर हे माजी मंत्री गिरीश महाजन यांचे अनेक वर्षापासूनचे समर्थक असून त्यांच्या किचन कॅबीनेटचे सदस्य तथा या गटाचे संकटमोचक म्हटले जातात. विवेक ठाकरे हे जनसंग्राम संघटना स्थापन झाल्यापासून ठेवीदारांचे पैसे व्याजासह परत मिळवण्यासाठी आंदोलन चालवत आहेत. त्याचप्रमाणे अशीच आंदोलने आणखी दोन तीन संघटनांनी हाती घेतल्याने त्यांच्या स्पर्धेतून परस्परांवर आरोप भानगडी बाहेर काढण्याच्या कारवाया रंगल्या आहेत.

तथापी पुण्याच्या एकट्या घोले रोड शाखेत 1600 कोटींचे बेनामी व्यवहार आढळल्याने या संस्थेवर मनी लॉंडरींगसह टेरर फंडींग तर करत नाही ना? असा संशय व्यक्त करणारे आरोप झाले. सुमारे 1100 कोटींच्या ठेवी असल्याचा दावा करणा-या बीएचआर मल्टीस्टेट पतसंस्थेच्या एकाच शाखेत 1608 कोटी रुपयांच्या बेनामी व्यवहार समोर येत असेल तर राज्यभर 250 शाखा आणि 7 राज्यात आणखी शाखा विस्तार असणा-या बिएचआर मल्टीस्टेट पतसंस्थेच्या आर्थिक उलाढालीवर संशय घेण्यास जागा दिसते.

आयकर विभागाच्या कचाट्यातून सुटण्यासाठी अनेक बड्या व्यापा-यांनी कोट्यवधीच्या बेनामी ठेवी, बेनामी कर्ज व्यवहारांचा धिंगाणा घातला होता. बिएचआर पतसंस्थेच्या ठेवीदार आणी बड्या कर्जदारांची यादी मागून देखील दिली जात नव्हती. अण्णा हजारे यांच्या आंदोलनातून निर्माण झालेला माहिती अधिकार कायदा – 2005 सहकारी संस्था – पतपेढ्या फेटाळून लावत होत्या. शिवाय सन 2015 मधे विधानसभेत आवाज उठवल्यावर तत्कालीन सहकार मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी बीएचआर पतसंस्थेच्या सुमारे 12000 कोटी रुपयांची बेनामी मालमत्ता जप्त करणे अशक्य असल्याचे सांगत हात टेकले होते. विशेष म्हणजे सन 2015 पासून हा कायदा जाहीर झाल्यावर देखील जिल्ह्यातील मंत्री, आमदार, खासदार गप्प बसून होते.

मार्च 2014 मधे जळगाव जिल्ह्यातील एका राजकीय पुढा-याने 25 कोटी रुपयांचे कर्ज ज्या पतसंस्थेतून उचलण्यासाठी मालमत्ता तारण दिल्याची कृती झळकली ती हीच संस्था असल्याचा संकेत होता. लोकसभा निवडणूकीपुर्वीचा हा काळ असल्याने ही तजवीज कशासाठी? याचा अंदाज होताच. शिवाय काही कार्यकर्त्यांनी जिल्ह्याचे तत्कालीन खासदार ए.टी. नाना पाटील, खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांना रजिस्टर पोस्टाने बीएचआर मल्टीस्टेट पतसंस्थेसह आणखी काही पतसंस्था मल्टीस्टेट वा अनेक कारणे सांगून ठेवीदारांचे पैसे देत नसल्याचे लक्षात आणून दिले होते.

जिल्ह्यातील एका राजकीय नेत्याकडे ठेवीदार याच प्रश्नी गेले असता “तुम्ही मला विचारुन नातेवाईकाच्या पतपेढीत ठेव ठेवली होती काय?” अशा शब्दात सुनावले होते. राज्याचा सहकार, महसुल व पोलिस विभाग ठेवीदारांच्या सव्याज परतीची मागणी करत असतांना बिएचआरचा अवसायक ठेवीदारांना 30% रक्कम देवून 100 % निल दाखले देत फिरला. शिवाय संस्थेकडील तारण 200 प्लॉटची मालमत्ता काही ठराविक लोकांनी कमी भावात लाटली. त्यात काही खास नावे आहेत. पाळधीचे एक शेटजी जळगाव जिल्ह्यात पाटबंधारे प्रकल्पांची बुडीत क्षेत्रातील शेत जमीन विकत घेवून नंतर ती सरकारला चढ्या भावाने विकणे, प्रकरणे न्यायालयात नेवून प्रचंड लाखो करोडो वसुल करण्याच्या उद्योगात असल्याचे या क्षेत्रातील काही अधिकारी (निवृत्त) , काही पत्रकारांना ज्ञात आहे.

शेकडो कोटी रुपयांचा काळा पैसा पांढरा करण्याच्या अनेक मार्गांपैकी खासकरुन बीएचआरच्या माध्यमातून जाण्याचा मार्ग अनेकांनी अवलंबला. विधानसभेत घोषीत झालेली 12000 कोटी रुपयांची मालमत्ता बघता हा सुमारे 20 ते 25 हजार कोटी रुपयांचा “झोलझाल” असल्याचे बोलले जात आहे.
ठेवीदारांना त्यांची ठेव व्याजासह परत देण्याची भुमीक कोण जाहीर करणार? याची प्रतिक्षा.

subhash-wagh

सुभाष वाघ ( पत्रकार – जळगाव )
8805667750

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here