जळगाव : रुग्णालयात दाखल कोविड रुग्णास दिलेल्या उपचाराबाबत अवाजवी बिलाची आकारणी केल्याप्रकरणी दिपककुमार गुप्ता यांनी केलेल्या पाठपुराव्यास यश आले आहे. या पाठपुराव्यामुळे रुग्णालयाने घेतलेली अतिरिक्त रक्कम रुग्णास परत मिळाली आहे.
जळगाव शहरातील ब्रेन अॅक्झॉन रुग्णालयात दिपक कावळे यांची आई अॅडमिट होती. दिपक कावळे यांच्या आईवर कोरोनाबाबत उपचार सुरु होते. या उपचारानंतर रुग्णालयाने दिपक कावळे यांच्याकडून 6 लाख 40 हजार रुपयांच्या बिलाची आकारणी केली होती. या रकमेचे बिल देखील कावळे यांना देण्यात आले नव्हते.
दरम्यान कावळे यांनी सामाजिक कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांची भेट घेवून त्यांना याबाबत घटनाक्रम कथन करत लेखी देत मदतीची मागणी केली. या अवाजवी बिलाबाबत दीपककुमार गुप्ता यांनी शासनस्तरावर पत्रव्यवहार तसेच जिल्हाधिकारी यांची भेट घेत योग्य ती कार्यवाही करण्याची विनंती केली. रुग्णालयाने रुग्णास बिल देखील दिले नव्हते मात्र लाखो रुपये घेतले होते.
सामाजिक कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी रुग्णाच्या नातेवाईकासोबत एका शासकीय डॉक्टरला ब्रेन अॅक्झॉन रुग्णालयातील व्यवस्थापक डॉ. किनगे यांच्याकडे पाठवले. या भेटीत डॉ. किनगे यांनी आपण रुग्णाकडून 6 लाख 40 हजार रुपये घेतल्याचे कबुल केले. मात्र आता बिल देवू शकत नाही असे देखील डॉ. किनगे यांनी म्हटले.
बराच वेळ झालेल्या चर्चेअंती घेतलेली अतिरिक्त रक्कम टप्प्याटप्प्याने परत देण्याचे डॉ. किनगे यांनी आक्षेप निवारण समिती तथा जिल्हा शल्य चिकित्सक जळगाव यांचेकडे मान्य केले. अखेर ब्रेन अॅक्झॉन रुग्णालयाने रुग्णास आकारलेले अतिरिक्त 2 लाख 44 हजार रुपये परत करण्याचे आदेश देण्यात आले.
सामाजीक कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी केलेला पाठपुरावा तसेच जिल्हाधिकारी अभीजीत राऊत यांनी शासनस्तरावरुन केलेले सहकार्य यामुळे रुग्णाला दिलासा मिळाला. तसेच रुग्णालयाने आकारलेली अतिरिक्त रक्कम परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.