जळगाव :
शरीराने धडधाकट असलेल्या तुषार सुर्वे यास दारु पिण्याचे भारी व्यसन होते. त्याच्या मनाविरुद्ध कुणी वागला म्हणजे तो त्याला जागच्या जागी खडे बोल सुनावत असे. चाळीशीच्या घरातील तुषार सुर्वे याच्या अंगी मोठ्या प्रमाणात जोश होता. त्याचाच परिणाम म्हणून तो सर्वांशी रफटफ वागत होता.
जळगाव तालुक्यातील कंडारी या गावात विवाहीत तुषार सुर्वे रहात होता. याच गावात राहुल जाधव नावाचा एक तरुण रहात होता. राहुल हा अवघा विस वर्षाचा तरुण होता. राहुल यास त्याच्या ताब्यातील दुचाकी भरधाव वेगाने चालवण्याची भारी हौस होती. राहुलच्या हातात दुचाकी आली म्हणजे तो मागचा पुढचा विचार न करता ताब्यातील दुचाकी सुसाट वेगाने दामटत असे. त्याचा हा प्रकार नित्याचा झाला होता. एके दिवशी तुषार रस्त्याने जात असतांना त्याच वेळी राहुल हा तेथून भरधाव वेगाने दुचाकीवर जात होता. राहुल जाधव याच्या ताब्यातील भरधाव दुचाकीचा धक्का तुषार सुर्वे यास
लागला. शरीराने धडधाकट व अंगात रुबाब असल्याने साहजिकच तुषारने दुचाकीचालक राहुल यास जागच्या जागी खडे बोल सुनावले. तुला दिसत नाही का? येता जाता जोरात गाडी चालवतो असे म्हणत तुषारने राहुल यास सुनावले. बघता बघता दोघांचा वाद सुरु झाला. दोघांचा वाद लवकर थांबण्याची चिन्हे दिसत नव्हती. शब्दामागे शब्द वाढत होता. दोघे एकमेकांसोबत बघून घेण्याची भाषा करत होते. शरीराने धडधाकट असलेल्या तुषारची भिती राहुलच्या मनात असली तरी त्याने ती दर्शवली नाही. राहुलने देखील तुषार सोबत बघून घेण्याची भाषा करत तेथून काढता पाय घेतला.
या घटनेनंतर काही दिवस निघून गेले. याच गावात विशाल मराठे नावाचा एक तरुण रहात होता. विशाल हा विशी ओलांडलेला रांगडा तरुण होता. त्याच्या अंगात देखील जोश होता. तो देखील मनाविरुद्ध झाले म्हणजे समोरच्या व्यक्तीसोबत बघून घेण्याची भाषा करत असे.
एके दिवशी कंडारी
गावाच्या बस स्थानकावर विशाल मराठे आणि तुषार सुर्वे यांच्यात कोणत्यातरी कारणावरुन वाद झाला. या वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले. तुषार सुर्वे आणि विशाल मराठे यांच्यात सुरु झालेल्या तुंबळ हाणामारीचा प्रकार उपस्थित अनेकांनी पाहिला. तुषार सुर्वे हा तब्येतीने मजबुत असल्यामुळे त्याने विशाल मराठे यास चारी मुंड्या चित केले होते. या प्रकाराने विशाल मराठे याने देखील जाता जाता तुषार सोबत बघून घेण्याची भाषा केली. अशा प्रकारे तुषार याने गावातील राहुल जाधव आणि विशाल मराठे या दोघा तरुणांसोबत दुश्मनी अर्थात शतृत्व ओढवून घेतले होते.
27 मे रोजी सायंकाळी गावातील मंदीराजवळ असलेल्या टपरीजवळ विशाल मराठे उभा होता. त्यावेळी त्याचे मित्र राहुल जाधव आणि गोपाळ भुसारी असे दोघे जण तेथे आले. तिघांनी तंबाखुचे सेवन केल्यानंतर सोबत दारु पिण्याचा बेत आखला. काहीवेळाने अंधार पडल्यावर पुन्हा तिघे जण दारु पिण्यासाठी गावातील शाळेत जमले. ज्या ठिकाणी विद्यादान आणि विद्यार्जन केले जाते त्या शाळेच्या आवारातच राहुल जाधव, विशाल मराठे आणि गोपाळ भुसारी या तिघा मित्रांनी मद्य प्राशनाचा कार्यक्रम सुरु केला. मद्य प्राशन केल्यानंतर चांगल्या प्रमाणात नशा येण्यासाठी अजून एक मद्याची बाटली मागवण्यात आली. एकामागून एक पेग रिचवले जात असतांना आता तिघांना मद्याची धुंदी चढली होती.
मद्याच्या धुंदीत चर्चा सुरु असतांना गावातील तुषार सुर्वे याचा विषय छेडला गेला. दुचाकीचा कट लागण्याच्या कारणावरुन तुषार सुर्वेसोबत राहुल जाधव याचा वाद झाला होता. विशाल मराठे व राहुल सुर्वे यांची बस स्थानकावर एका कारणावरुन हाणामारी झाली होती. अशा प्रकारे दोन समदुख़ी: आत्मे एकत्र आले होते. त्यांच्या साथीला मद्य प्राशनात सहभाग घेणारा गोपाळ भुसारी हा हजर होता. गोपाळ भुसारी याचा तुषार सुर्वे सोबत कुठलाही वाद नव्हता. तो त्यांच्यासमवेत मद्य पार्टीत सहभागी होण्यास आला होता.
मद्याची नशा अर्थात झिंग चढत असतांना राहुल आणि विशाल या दोघांनी तुषार यास संपवण्याचा बेत आखला. याकामी त्यांनी गोपाळ भुसारी यास सामील करुन घेण्याचे ठरवले.
तुषार सुर्वे हा दररोज रात्री खळ्यात झोपायला जातो हे त्यांना ठावुक होते. रात्र झाल्यानंतर तिघांनी तुषार झोपत असलेल्या खळ्यात जावून त्याचा कायमचा गेम करण्याचा बेत आखला. तो आपल्याला खरोखरच मारेन की काय अशी राहुल आणि विशाल यांच्या मनात भिती होती. तुषारची तब्येत धडधाकट असल्याने त्याची दोघांच्या मनात दहशत निर्माण झाली होती. याच दरम्यान खळयात झोपण्यासाठी आलेल्या तुषार सुर्वे आणि रायपूर येथील उप सरपंच वसंत धनगर यांचा एकत्रितपणे मद्यप्राशनाचा कार्यक्रम झाला होता. त्यानंतर वसंत धनगर आपल्या घरी निघून गेले होते. मद्याच्या नशेत तुषार हा एकटाच खळ्यात झोपलेला होता.
मद्य रिचवल्यानंतर राहुल जाधव, विशाल मराठे यांनी आपल्यासोबत गोपाळ भुसारी यास सोबत घेत तुषार झोपत असलेले खळे गाठले. त्यावेळी रात्रीचे साडे नऊ वाजले होते. त्याठिकाणी तुषार सुर्वे हा खाटेवर गाढ झोपलेला होता. बघून घेण्याची धमकी देणा-या तुषार सुर्वेची दोघांच्या मनात भिती निर्माण झाली होती. त्या भितीपोटी त्याला मारण्यासाठी दोघे जण गोपाळ भुसारी सोबत त्याठिकाणी आले. तेथे जवळच भलामोठा दगड पडलेला होता. राहुलने तो दगड उचलून झोपलेल्या तुषारच्या डोक्यावर व चेह-यावर जोरात हाणला. दगडाच्या त्या प्रहारामुळे झोपलेला तुषार काही कळण्याच्या आत जखमी व जागा झाला. आपल्यासोबत नेमका कसा हल्ला झाला हे त्याला लवकर समजलेच नाही. तुषारला काही कळण्याच्या व तो प्रतिकार करण्याच्या आत राहुलने पुन्हा त्याच्यावर दगडाने हल्ला चढवला. त्यावेळी त्याच्यासोबत विशाल मराठे व गोपाळ भुसारी हे दोघे हजरच होते. या घटनेच्या वेळी हजर असलेल्या गोपाळ भुसारी याने केवळ दोघांच्या मैत्रीखातर तेथे हजेरी लावली होती. तुषार रक्ताच्या थारोळ्यात निपचीप पडल्यानंतर तिघे मित्र तेथून पसार झाले. आपल्याला जणू काही माहितच नाही अशा अविर्भावात ते आपल्या घरी परतले.
दुस-या दिवशी 28 मे रोजी सकाळी सहा वाजता तुषार हा मयत अवस्थेत गावातील प्रल्हाद देशमुख यांना आढळून आला. त्यांनी लागलीच तुषारच्या घरी जावून त्याची पत्नी मनिषाला हा प्रकार कथन केला. आपल्या पतीची हत्या झाल्याचे समजताच त्याची पत्नी मनिषा हिने धाय मोकलून रडण्यास सुरुवात केली. या घटनेची माहिती गावात वायुवेगाने पसरली होती. घटनास्थळावर गर्दी जमण्यास सुरुवात झाली होती. या घटनेची माहिती नशिराबाद पोलिस स्टेशनला समजताच सहायक पोलिस निरिक्षक प्रविण साळुंखे यांनी आपल्या सहका-यांसह घटनास्थळ गाठले. पोलिस पथक येताच घटनास्थळावरील गर्दी बाजुला झाली.
या प्रकरणी मयत तुषार सुर्वे याची पत्नी मनिषा सुर्वे हिच्या फिर्यादीनुसार नशिराबाद पोलिस स्टेशनला अज्ञात हल्लेखोराविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हा भाग 5 गु.र.न. 151/20 भा.द.वि. 302 नुसार दाखल करण्यात आला.
या गुन्हयाची माहिती मिळताच अप्पर पोलिस अधिक्षक भाग्यश्री नवटके, पोलिस उप अधिक्षक गजानन राठोड, स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.बापू रोहोम, उपनिरिक्षक सुधाकर लहारे, अशोक महाजन, नारायण पाटील, राजेंद्र पाटील, विजयसिंग पाटील, शरद भालेराव, रामकृष्ण पाटील, नरेंद्र वारुळे, राजेश मेढे, संजय हिवरकर, रवी घुगे, किरण धनगर, प्रमोद लाडवंजारी, अनिल इंगळे, अनिल देशमुख, विनोद पाटील, सुधाकर अंभोरे, रामचंद्र बोरसे, रमेश चौधरी, संतोष मायकल, इद्रीस पठाण, मनोज दुसाने, दर्शन ढाकणे, दिपक पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान नशिराबाद पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरिक्षक प्रविण साळुंखे, स.पो.नि. सचिन कापडणीस, हे.कॉ.प्रविण ढाके, हे.कॉ.राजेंद्र साळुंखे, हे.कॉ. सतिष पाटील, पोलिस नाईक किरण बाविस्कर, महिला पोलिस कर्मचारी लिना लोखंडे यांनी आपल्या सहका-यांसह गावातील लोकांसोबत चर्चासत्र राबवले. तपास यंत्रणेतील प्रत्येक अधिकारी व कर्मचा-यांनी आपले कौशल्य वापरुन चौकशी सुरु केली. मयताची पार्श्वभुमी काय आहे? मयताचे गावात कुणाशी वाद आहेत का? त्याचा खून कोण व कशासाठी करु शकतो? याचा सखोल तपास करण्यात आला. अधिक चौकशीअंती पोलिस पथकाला समजले की काही दिवसांपुर्वी मयत तुषार सुर्वे याचा गावातील विशाल मराठे या तरुणासोबत बस स्थानकावर वाद झाला होता. या वादातून दोघात हाणामारी देखील झाली होती. हा धागा पकडून सहायक पोलिस निरिक्षक प्रविण साळुंखे व त्यांच्या सहका-यांनी विशाल मराठे यास ताब्यात घेतले. त्याला पोलिसी खाक्या दाखवून खरा प्रकार वदवण्यात आला. या प्रकरणी गुन्हा कबुल करतांना त्याचा मित्र राहुल जाधव याचे नाव पुढे आले. त्यामुळे राहुल जाधव यास देखील ताब्यात घेण्यात आले. राहुल जाधव याने आपला गुन्हा कबुल केला. दुचाकीचा कट लागल्याने आपला मयत तुषार सोबत वाद झाला होता. त्यामुळे आपणच तुषार यास दगडाने ठेचून मारले असून त्यावेळी आपल्यासोबत विशाल मराठे व गोपाळ भुसारी हे दोघे हजर होते. या गुन्हयात तसे बघता गोपाळ भुसारी याचा मयत तुषार सोबत कोणताही वाद झालेला नव्हता. तो केवळ मित्रता म्हणून राहुल व विशाल या दोघांसोबत घटनास्थळावर आलेला होता.
या प्रकरणी तिघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले. त्यांना अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयात हजर केले असता सुरुवातीला तिघांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणी पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक प्रविण साळुंखे व त्यांचे सहकारी करत आहेत.