अहमदनगर : दिल्ली येथील शेतकरी आंदोलन आणि भारत बंदला पाठिंबा व्यक्त करण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राळेगणसिद्धी येथील पद्मावती मंदिरात महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर एक दिवसाचे उपोषण केले होते. दिल्ली येथील शेतकऱ्यांनी सुरु केलेल्या आंदोलनास अण्णा हजारे यांनी यापूर्वीच पाठिंबा दिला आहे. आता, दिल्ली येथील शेतकरी आंदोलकांच्या मुलांनी अण्णा हजारे यांची भेट घेतली. या भेटीनंतर दिल्ली येथे शेवटचे आंदोलन करणार असल्याचे अण्णांनी म्हटले आहे. या आंदोलनासाठी जागा मिळायला हवी, असे देखील अण्णा हजारे यांनी म्हटले आहे.
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर दिल्लीत रामलीला अथवा जंतरमंतर या ठिकाणी जागा मिळाल्यास आपण शेवटचे आंदोलन करणार असल्याचे अण्णा हजारे यांनी म्हटले आहे. राळेगणसिद्धी येथे आंदोलक शेतकरी पुत्रांनी अण्णांची भेट घेतली, त्यावेळी अण्णा बोलत होते.
स्वामिनाथन आयोगाच्या अहवालानुसार पिकांना उत्पादन खर्चापेक्षा पन्नास टक्के जादा भाव देण्याची मागणी मोदी सरकारने गेल्या वेळेस मान्य केली होती. 23 मार्च 2018 रोजी लेखी आश्वासन देखील दिले होते. मात्र त्यावर कोणतीही अंमलबजावणी झाली नाही. याबाबत अण्णा यांनी वेळोवेळी पत्रव्यवहार देखील केला. मात्र आश्वासनपुर्ती सरकारकडून झाली नाही. त्यानंतर अण्णा हजारे यांनी सात दिवस उपोषण केले. कृषी मंत्र्यांनी त्यावेळी देखील लेखी आश्वासन दिले होते की कृषिमूल्य आयोगाला स्वायत्तता देण्याविषयी समिती तयार केली जाईल.