मुंबई : मुंबई पोलिसांवर संशय व्यक्त करणा-या अमृता फडणवीस यांच्यासह माजी मुख्यमंत्री तथा राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, नारायण राणे व चंद्रकांत पाटील यांच्या सुरक्षा व्यवस्थेत ठाकरे सरकारने कपात केली आहे.
काही दिवसांपुर्वी राज्य सरकारने घेतलेल्या बैठकीत माजी मंत्री आणि विरोधी पक्षातील नेत्यांच्या सुरक्षेबाबतचा आढावा घेतला होता. त्यानंतर आता विरोधी पक्षातील नेत्यांसह त्यांच्या परिवाराची सुरक्षेत कपात करण्यात आली आहे.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सर्व कुटुंबाला सुरक्षा देण्यात आली होती. मुख्यमंत्री फडणवीस यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात आली होती. त्यात कपात करण्यात आली असून ती आता वाय प्लस एस्कॉर्टसह देण्यात आली आहे. त्यांच्या ताफ्यातील बुलेटप्रुफ गाडी आता काढण्यात आली आहे. अमृता फडणवीस, त्यांची मुलगी दिवीजा यांना वाय प्लस एस्कॉर्टसह सुरक्षा देण्यात आली होती. ती आता केवळ एक्स सुरक्षा राहणार आहे.
सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी बोलतांना त्यावेळी अमृता फडणवीस यांनी मुंबई पोलिसांवरच संशय व्यक्त केला होता. मुंबई शहर आता सुरक्षित राहिले नसून याठिकाणी निष्पाप लोकांच्या बाबतीत माणुसकी दाखवली जात नसल्याचे त्यांनी म्हटले होते. मुंबईत आता स्वाभिमानी आणि साध्या लोकांचे जगणे सुरक्षित नसल्याचे त्यांनी ट्विट केले होते. त्यांच्या या ट्विट नंतर वादाला तोंड फुटले होते. शिवसेना नेत्यांनी त्यांना सुरक्षा घेवू नये असा देखील सल्ला दिला होता.
देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रविण दरेकर, प्रसाद लाड आदींच्या सुरक्षा व्यवस्थेत मोठ्या प्रमाणात कपात केली आहे. प्रवीण दरेकर यांना वाय सुरक्षा देण्यात आली आहे. अगोदर ती वाय प्लस होती. नारायण राणे यांची देखील सुरक्षा व्यवस्था कमी करण्यात आली आहे. आपल्या जिवीताला काही झाल्यास राज्य सरकार जबाबदार राहील असे नारायण राणे यांनी म्हटले आहे.