जळगाव : औरंगाबाद ते जळगाव दरम्यान महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या सुरु आहे. सदर काम स्फिरो – दरा प्रा.लि. या कंपनीकडे देण्यात आले आहे. फेज तिन अंतर्गत फर्दापूर ते जळगाव दरम्यान रस्त्याचे काम सुरु आहे. या फेज तिन मधील पुलाच्या कामात भ्रष्टाचार सुरु असल्याबाबत माहिती अधिकार कार्यकर्ता दिपककुमार गुप्ता यांना माहिती मिळाली आहे.
या पुलाच्या कामात जळगाव ते औरंगाबाद दरम्यान रिटेनिंग वालच्या रॅफ्ट मधे स्टील कमी वापरण्यात आले असल्याचे दीपककुमार गुप्ता यांचे म्हणणे आहे. यासह विविध तांत्रीक बाबींची माहिती गुप्ता यांनी संकलीत केली असून त्या कामाचे फोटोग्राफ्स देखील गुप्ता यांनी काढले आहेत.
या कामाची योग्य रितीने चौकशी होण्याची मागणी गुप्ता यांनी केली आहे. या कामात अनियमितता व भ्रष्टाचार आढळून आल्यास मक्तेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी गुप्ता यांनी केली आहे. तसेच या कामावर लक्ष ठेवणारी पीआयडीसी प्रायव्हेट लिमीटेड या कंपनीने आपले काम योग्य रितीने केले नाही म्हणून त्यांना देखील ब्लॅक लिस्ट मधे टाकण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबतचे पत्र दीपककुमार गुप्ता यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उप मुख्यमंत्री अजित पवार, राज्याचे मुख्य सचिव, जळगावचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत आदींना देण्यात आले आहे.