जळगाव : जळगाव तालुक्यातील भादली बुद्रुक ग्रामपंचायत निवडणुकीत अंजली पाटील या तृतीयपंथी उमेदवाराने वार्ड क्रमांक 4 मधून विजय मिळवला आहे. अंजली पाटील या तृतीयपंथी उमेदवाराने सर्वसाधारण महिला प्रवर्गातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र निवडणूक निर्णय अधिका-यांनी तो अर्ज बाद केला होता.
न्याय हक्कासाठी अंजली पाटील हिने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. न्यायालयाकडून तिला उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सकारात्मकता दाखवल्यामुळे निवडणूक निर्णय अधिका-यांनी तिचा अर्ज दाखल करुन घेतला. आता अंजली पाटील हिने ग्रामपंचायत निवडणूकीत विजय मिळवला आहे.
तृतीयपंथी व्यक्ती अधिकार संरक्षण कायदा 2019 नुसार लिंग निवड करण्याचा अधिकार तृतीयपंथीयांना आहे. त्यानुसार खंडपीठाचे न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांनी अंजली पाटील यांच्या बाजूने निकाल देत निवडणूक अर्ज स्त्री राखीव प्रवर्गातून वैध असल्याचे म्हटले. मात्र भविष्यात पुरुष म्हणून कोणतीही सवलत मिळणार नसल्याचे देखील न्यायालयाने म्हटले आहे.