नागपूर : पोलीस अधिकारी व कर्मचारी वर्गाच्या तुलनेत त्यांना राहण्यासाठी घरांची संख्या कमी आहे. पोलिसांसाठी घरांची वाढत असलेली मागणी लक्षात घेत राज्य पोलिस दलासाठी एक लाख घर बांधणीचा प्रकल्प सुरु केला जाणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे. नागपूर येथील पोलिस महासंचालक कार्यालयासह पाचपावली व इंदोरा येथे पोलिस अंमलदारांच्या निवासस्थानाचे लोकार्पन झाले. यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हे विधान केले.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री डॉ. नितीन राऊत उपस्थित होते. तसेच व्यासपीठावर पोलीस महासंचालक हेमंत नगराळे, विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद, पोलीस आयुक्त डॉ. अमितेश कुमार, पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांच्यासह अपर पोलीस आयुक्त सुनील फुलारी, नवीनचंद्र रेड्डी, डॉ. दिलीप झळके, विनिता साहू, पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्यासह इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी हजर होते.
नागपूर शहरासह ग्रामीण पोलिसांना राहण्यासाठी मोठ्या प्रमाणात घरांची उपलब्धता होण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे गृहमंत्र्यांनी यावेळी बोलतांना म्हटले. स्वातंत्रपुर्व काळात राज्यात 48 टक्के घरे होती. नंतरच्या कालावधीत फक्त 42 टक्के घरे बांधली गेली. महाराष्ट्र पोलीस गृहनिर्माण संस्थेकडून तीन विविध प्रकारचे प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सादर करण्यात आले असल्याचे देशमुख म्हणाले.
पोलीस विभागाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प वरळी पोलीस सोसायटीच्या जागेत पुर्ण केला जाणार आहे. या प्रकल्पासाठी निधी बाहेरुन उभा केला जाईल. कंत्राटदारास 4 एफएसआय दिला जाईल. राज्य पोलीस दल जेल पर्यटनाची सुरुवात करणार आहे. प्रजासत्ताक दिनी त्याची सुरुवात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते येरवडा जेलपासून होणार आहे. स्वातंत्र्य सैनिकांना ठेवण्यात आलेल्या खोल्या, महात्मा गांधी आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यात झालेला पुणे करार, चाफेकर बंधू यांना फासावर चढवण्यात आलेला यॉर्ड पर्यटक पाहू शकणार आहेत. पुण्यापाठोपाठ रत्नागिरी, नाशिक व धुळे येथील जेलमधे देखील पर्यटन सुविधा सुरु केली जाणार आहे.