नागपूर : घाईगर्दीत चुकीच्या रेल्वेत चढल्यानंतर तिकीटधारक रेल्वे प्रवाशाच्या अपघातात मृत्यू झाल्यास त्या प्रवाशाचे वारस भरपाईसाठी पात्र असल्याचा निकाल मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने दिला आहे. न्या. अनुजा प्रभुदेसाई यांनी हा निर्वाळा दिला आहे. त्या प्रवाशास अनधिकृत प्रवासी म्हणता येणार नसल्याचे निर्णयात म्हटले आहे.
भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील देव्हाडी येथील विक्की चौबे नामक प्रवाशाने 12 डिसेंबर 2012 रोजी रेल्वेचे नागपूर – तुमसर दरम्यानचे तिकीट खरेदी केले होते. तिकीट खरेदी केल्यानंतर विक्की चौबे हे हावडा-ज्ञानेश्वरी एक्सप्रेस या प्रवासी गाडीत बसले. त्यांच्या ताब्यातील तिकीट त्या गाडीसाठी रेल्वे प्रशासनाच्या दृष्टीने अधिकृत नव्हते. प्रवासा दरम्यान मुंदीकोटा रेल्वे स्टेशन नजीक धावत्या रेल्वेतून पडून त्यांचा मृत्यू ओढवला.
विक्की चौबे यांची आई मुन्नीबाई चौबे यांनी नुकसान भरपाई मिळण्याकामी रेल्वे न्यायाधिकरणात दावा केला होता. 17 जानेवारी 2017 रोजी न्यायाधिकरणाने मुन्नीबाई चौबे यांचा दावा खारीज केला. विक्की चौबे यांनी चुकीच्या रेल्वेतून प्रवास केला व त्यामुळे त्यांना अधिकृत प्रवासी म्हणता येणार नसल्याचे कारण पुढे करत दावा नाकारण्यात आला.
या निर्णयाच्या विरोधात मुन्नीबाई यांनी उच्च न्यायालयात धाव घेत प्रथम अपील दाखल केले. त्या अपिलात उच्च न्यायालयाकडून सुधारित निर्णय देण्यात आला. उच्च न्यायालयाने दावा दाखल करणा-या मुन्नीबाई चौबे यांना आठ लाख रुपये तिन महिन्याच्या आत देण्याचे आदेश रेल्वे प्रशासनाला केले.