अमळनेर (प्रतिनिधी) : पश्चिम रेल्वेचे महाप्रबंधक अलोक बंसल यांचे आज 2 फेब्रूवारी रोजी सकाळी अकरा वाजता अमळनेर रेल्वे स्टेशनवर आगमन झाले. यावेळी त्यांनी आपल्या सोबत आलेल्या सुमारे दिडशे अधिकारी व कर्मचारी वर्गाच्या मदतीने रेल्वे स्टेशनसह बारा रेल्वे डब्यांची विशेष तपासणी देखील केली.
यावेळी रेल्वे स्टेशनच्या विविध कामकाजाचा त्यांनी आढावा घेतला. विविध अत्याधुनिक मशिनरी विभागाचे त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. धरणगावमार्गे अमळनेरला येण्यापुर्वी महाप्रबंधक अलोक बंसल यांनी चोपडा रेल्वे गेटजवळ रेल्वे रुळांची तसेच तांबेपुरा रेल्वे बोगद्याची त्यांनी पाहणी केली. त्यानंतर त्यांनी संबंधीत अधिकारी वर्गाला काही सुचना केल्या.
अमळनेर रेल्वे स्टेशन अंतर्गत तयार करण्यात आलेल्या ऊधना ते जळगांव रेल्वे खंडाच्या गँगटूल रुमसह सिनियर सेक्शन इंजीनिअर कक्षातील मशीनरीचे त्यांनी उद्घाटन केले. या ठिकाणाहून रेल्वे तपमान आणि टेलीमेट्री डिव्हाईनचे कामकाज पाहिले जाणार आहे. त्या सोबतच या कार्यालयच्या शेजारी रेल्वे विभागाच्या मशिन कर्मचारी वर्गाचे विश्रामगृह, रेल्वे कर्मचा-यांसाठी असलेली पाण्याची टाकी, बगीचा व पश्चिम रेल्वे कर्मचारी संघटनेचे कार्यालय आदी ठिकाणी त्यांनी भेट दिली.
पश्चिम रेल्वेचे महाप्रबंधक येणार असल्यामुळे अमळनेर रेल्वे स्टेशन एखाद्या नववधूप्रमाणे सजवण्यात आले होते. कर्मचारी वर्गाने रात्रंदिवस राबून स्टेशनची स्वच्छता व रस्त्यांची डागजुगी केली होती. अलोक बंसल यावेळी धरणगाव मार्गे स्वतंत्र रेल्वेने आले होते. त्यांच्या आगमनापुर्वी अमळनेर रेल्वे स्टेशन चकाचक करण्यात आले होते. त्यासाठी लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला. या स्वच्छतेसाठी सुमारे दोनशे ते अडीचशे कर्मचारी रात्रंदिवस राबत होते. त्यांच्या स्वागतासाठी प्रवासी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. या पदाधिका-यांनी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन यावेळी बंसल यांना देण्यात आले. रेल्वे स्थानकावर नवीन पुलाची निर्मिती करणे, सुरत भुसावळ दरम्यान लांब पल्ल्याच्या गाड्या सुरु करुन त्यांना थांबा देणे यासह विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.