नागपूर : पतीच्या परवानगीविना नेहमी नेहमी माहेरी जाणे, माहेरी महिने महिने राहून वाद घालण्यासह पोलिस स्टेशनला तक्रारी करणे या सर्व मनस्ताप देणा-या गोष्टी घटस्फोटासाठी कारणीभूत ठरल्याचे निरिक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नोंदवले आहे. या कारणामुळे खंडपीठाने पिडीत पतीला घटस्फोट मिळवून देत तो योग्य ठरवला आहे.
न्या. पुष्पा गणेडीवाला व न्या. अतुल चांदुरकर यांच्याकडून हा निर्णय देण्यात आला आहे. नागपुर येथील पती व पत्नी 24 ऑक्टोबर रोजी विवाहबद्ध झाले होते. लग्नानंतर पत्नी एकत्र कुटूंबात काही महिने राहिली. नंतर ती पतीच्या परवानगीविना माहेरी जावू लागली. एकत्र कुटूंबात राहण्याची तयारी नसल्यामुळे ती महिने महिने माहेरी मुक्काम करु लागली. तिचा पती वेळोवेळी तिला सासरी आणत होता. मात्र तीने पोलिस स्टेशनल छळाची तक्रार दाखल केली. पती पत्नीचा वाद महिला सेलच्या माध्यमातून मिटवण्यात आला होता. बाळंतपणासाठी माहेरी गेल्यानंतर ती सासरी येण्यास तयार नव्हती.
कायदेशीर नोटीस दिल्यानंतर पत्नी सासरी परत आली. मात्र एकत्र कुटूंबात राहण्यास पत्नी तयार नसल्यामुळे पतीने भाड्याचे घर घेतले. मात्र तेथेदेखील ती निट राहिली नाही. अखेर पतीने क्रुरतेच्या आधारे घटस्फोटासाठी कुटूंब न्यायालयात धाव घेतली. 2 मे 2017 रोजी त्याची याचिका मंजुर झाली. त्या निर्णयाविरोधात पत्नीने उच्च न्यायालयात अपिल केले होते.