नागपूर : महाराष्ट्रात वाढत असलेली कोरोना रुग्णांची संख्या आणि सोशल डिस्टन्सींगसह मास्कच्या वापराकडील दुर्लक्ष लक्षात घेत राज्यात नाईट कर्फ्यू लावण्याचा विचार राज्य सरकार करत असल्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. नागपूर येथे माध्यमांसोबत बोलतांना त्यानी तसे संकेत दिले आहे. सायंकाळी सहा ते सकाळचे नऊ या कालावधीत हा कर्फ्यू राहील असे म्हटले जात आहे.
मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद व नाशिक या मेट्रो शहरात कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. या संख्येला आळा घालण्यासाठी कोरोना प्रतिबंधक नियम पाळणे गरजेचे असले तरी नागरिक याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. त्यासाठी नाईट कर्फ्यू लावला जाण्याचा विचार राज्य सरकारकडून सध्या सुरु आहे. यापुढेही काळजी घेतली नाही तर लॉकडाऊनची पुन्हा वेळ येवू शकते असे देखील वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. संपुर्ण राज्यात नाईट कर्फ्यू लावण्याएवजी त्या त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिका-यांना अधिकार दिले असल्याचे देखील एका प्रश्नाच्या उत्तरात बोलतांना मंत्री वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.