सातारा : कोरोना रोखण्यासाठी प्रशासनाने सुरु केलेले लॉकडाऊन गरिबांच्या जिवावर उठले असून उपासमार करणारे आहे. हे लॉकडाऊन तात्काळ उठवले नाही तर भुकेपोटी लोक दरोडे टाकतील असा इशाराच खा. उदयनराजे भोसले यांनी प्रशासनाला दिला आहे.
सातारा येथील पोवई नाका येथे खा. उदयनराजे भोसले यांनी चक्क कटोरा घेत रस्त्यावर भिक मांगो आंदोलन सुरु केले. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. चला चला शंभर रुपये टाका……. कलेक्टरांना द्यायचे आहे….. असे म्हणत त्यांनी रस्त्यावर भिक मांगो आंदोलन सुरु केले. उद्यापासून “नो लॉकडाऊन”- मारामारी झाली तर यु आर रिस्पॉन्सिबल असे म्हणत सुव्यवस्था कलेक्टरची आहे असे म्हणत त्यांनी अधिकारी वर्गाला फैलावर घेतले.
भिक मागून जमा करण्यात आलेले पैसे त्यांनी प्रशासनाकडे सुपुर्द करत कठोर टीका देखील केली. कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन हा एकमेव पर्याय असल्याचे कोणता तज्ञ सांगतो याचे स्पष्टीकरण जनतेसमोर झाले पाहिजे असे म्हणत आतापर्यंत झालेला लॉकडाऊन चुकीचा असल्याचे देखील त्यांनी म्हटले. उद्यापासून सर्व यंत्रणा सुरु राहतील असा इशाराच खा. उदयनराजे भोसले यांनी स्थानिक जिल्हाधिका-यांना दिला आहे. लॉकडाऊन काय तुमच्या बापाचे राज्य आहे काय? अशी गर्जना करत राजेशाही असती तर सगळ्यांना हत्तीच्या पायाखाली तुडवले असते असे देखील खा. भोसले म्हणाले.