चाकूने गळा चिरणाऱ्या मित्रास जन्मठेप

legal

अंबाजोगाई न्यायालयाचा निकाल

अंबाजोगाई  : परळी येथील बरकत नगर भागातील मित्राने आपल्या मित्राचा दुचाकीवर डबलसिट बसून चाकूने खून केला होता. आपल्या घराकडे वाईट नजरेने पहात असल्याच्या संशयावरुन हा खून झाला होता. या घटनेतील पुरावा आरोपींकडून नष्ट करण्यात आला होता. असे असले तरी परळी ग्रामीण पोलीसांनी योग्य रितीने तपास करत आरोपींकडून गुन्हयाची कबुली घेतली होती.

या घटनेत प्रत्यक्ष साक्षीदार नव्हता. मात्र रक्ताने माखलेले कपडे, दुचाकी व चाकूवर लागलेले रक्ताचे डाग हा पुरावा ग्राहय धरण्यात आला. अंबाजोगाई जिल्हा व सत्र न्यायालय क्रमांक 3 च्या न्यायमुर्ती माहेश्वरी पटवारी यांनी आज हा निकाल दिला. या घटनेतील आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावत 15 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

परळी शहरातील बरकत नगर भागात मयत शेख मकदूल शेख कलंदर (30) व आरोपी शेख समीर शेख वल्ली हे दोघेही मित्र होते. दोघेही 3 डिसेंबर 2018 रोजी एमएच 23 ए 8616 या दुचाकीने अंबाजोगाई येथे पार्टीसाठी सोबत आले होते. पार्टी आटोपल्यानंतर दोघेही नंदागौळ मार्गे परळीच्या दिशेने जात होते. अंबाजोगाईतून दोघांना दुचाकीवरुन येतांना साक्षीदाराने पाहिले होते.

त्याने न्यायालयासमोर तशी साक्ष दिली. घटनेच्या दिवशी आरोपी शेख समीर शे.वल्ली याने मयत शेख मकदूल शेख कलंदर याच्या पोटात धावत्या दुचाकीवर चाकू खूपसला होता. मयत शेख मकदूल हा जागेवरच कोसळला होता. आरोपीने मयताच्या पोटातील चाकू काढत अकरा वेळा पुन्हा पुन्हा पोटात चाकू खुपसला. तरी देखील तो मयत झाला नसावा या शंकेतून त्याने बाराव्या वेळेस त्याचा गळा चिरला होता.

गुन्हयात वापरलेला चाकू आरोपीने नंदागौळ शिवारात फेकून देत दुचाकी पुलाखाली लपवून ठेवली होती. लपवून ठेवलेल्या दुचाकीवर त्याने गवत झाकले होते. रक्ताने माखलेले कपडे घरातील कपाटात लपवून ठेवत अपघाताचा बनाव करण्यात आला होता. अटकेनंतर आरोपीने पोलिसांसमोर या घटनेचे वास्तव मांडले होते.

ग्रामीण पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एम.एम.शेळके यांनी तपास पुर्ण केला. आरोपीविरुद्ध दोषारोपत्र अंबाजोगाई जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केले. न्यायालयात सुनावणी दरम्यान आठ साक्षीदारांनी साक्ष दिली.

प्रयोगशाळेच्या रक्ताचा अहवाल, दुचाकीवरुन दोघांना जातांना पाहणाऱ्याची साक्ष ग्राहय धरण्यात आली. जिल्हा व सत्र न्यायालय क्र. 3 च्या न्या.माहेश्वरी पटवारी यांनी सरकार पक्षाने मांडलेला युक्तिवाद, प्रयोगशाळेचा अहवाल व घटनेत वापरलेली दुचाकी व चाकू  हे सर्व गुन्हात ग्राहय धरण्यात आले.

आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावत 15 हजार रुपयांचा दंड सुनावला. सरकार पक्षाच्या वतीने अ‍ॅड.लक्ष्मण फड यांनी बाजू मांडली. आरोपी जिल्हा कारागृहात असल्यामुळे व्हि.सी.द्वारे निकाल सुनावण्यात आला. या गुन्हयाच्या निकालाकडे परळी तालुक्याचे लक्ष लागले होते. घटनेच्या वेळी एकही साक्षीदार नसताना न्यायालयाने आरोपीस जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्यामुळे मयताच्या कुटूंबियांनी समाधान व्यक्त केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here