कर्जदारांनी कर्जाची रक्कम चांगलीच थकवली! गळफास घेत अधिका-याने जिवनयात्रा संपवली

जळगाव : या युगात पैशाला फार महत्व आले आहे. आर्थिक निकड भागवण्यासाठी कर्ज घेतले जाते. आपल्या देशातील अर्थव्यवस्थाच अशी काही निर्माण करण्यात आली आहे की प्रत्येकाला कधी ना कधी कर्ज घ्यावेच लागते. बरेच उद्योगपती, व्यावसायीक आयकर विवरणात सुट मिळवण्यासाठी कर्ज घेत असतात. काही सामान्य लोक खरोखर अत्यावश्यक गरज म्हणून कर्ज घेत असतात. आपला सिबील स्कोर दिसण्यासाठी अनेकांना लहानमोठे कर्ज घ्यावे लागते. आपले लोन प्रॉडक्ट विकण्यासाठी खासगी फायनान्स कंपन्या आपल्या अधिका-यांना टार्गेट देते. हे टार्गेट पुर्ण करण्यासाठी व सामान्य मनुष्याला कर्जाच्या चक्रव्युहात अडकवण्यासाठी विविध फायनान्स कंपन्या विविध ऑफरचे आमिष दाखवून अडकवतात. या चक्रव्युहाला फायनान्स कंपन्या “लोन जर्नी” असे म्हणतात. या “लोन जर्नी”च्या विळख्यात एकदा का मनुष्य फसला म्हणजे त्याची मानसिकता खराब होत असते. एखादा हप्ता चुकला अथवा थकला म्हणजे कुत्री मागे लागतात त्याप्रमाणे या फायनान्स कंपन्यांचे फोन दिवसभर भुंकत असतात. त्यांचे सातत्याने मेसेज येत असतात. त्यातून कर्जदाराचे मानसिक संतुलन बिघडते व तो व्याधीग्रस्त होतो. सरकारी बॅंका सहजासहजी सामान्य मनुष्याला कर्ज देत नसल्यामुळे त्याला नाईलाजाने खासगी फायनान्स कंपन्यांची पायरी चढावी लागते. फायनान्स कंपन्यांची संगत म्हणजे मानसिकता खराब करुन घेण्याचे काम आहे. गरजवंत सामान्य मनुष्य कर्ज प्रकरणाच्या बारीक बारिक अक्षरातील भरमसाठ कागदपत्रांवर पटापट सह्या करतो. त्याला ते कागदपत्र वाचण्याची संधी देखील दिली जात नाही व सह्या करण्यास भाग पाडले जाते.

सामान्य मनुष्याला जेरीस आणणा-या फायनान्स कंपन्यांना ठगवणारे महाभाग देखील असतात. सामान्य मनुष्याची मानसिकता खराब करणा-या फायनान्स कंपनीच्या अधिका-यांना त्यांची मानसिकता खराब करणारे महाभाग देखील भेटतात. “शेरास सव्वाशेर भेटणे” या म्हणीचा प्रत्यय कंपनी अधिका-यांना या निमीत्ताने येत असतो. फायनान्स कंपनीत काम करणे व या कंपनीशी संबंध येणारे कर्जदार हे दोघेही घटक सुखी नसतात. त्यामुळे जुने जाणते लोक नेहमी सांगत असत की “उपाशी रहावे मात्र कुणाचे कर्ज घेऊ नये”.

जळगाव जिल्ह्याच्या जामनेर तालुक्यातील भारुडखेडा या गावातील दहा ते बारा जणांनी बोगस कागदपत्राच्या आधारे “मुथुट फायनान्स” या फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतल्याचे म्हटले जात आहे. कथीत बोगस कागदपत्राच्या आधारे देण्यात आलेले कर्ज प्रकरण या कंपनीसाठी एक डोकेदुखीचा विषय झाला होता.  या कर्जदारांकडून वसुली करण्याची जबाबदारी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रदीप धनलाल शिंपी या क्रेडीट मॅनेजरकडे सोपवली होती. या कर्जदारांकडून वसुली झाली नाही तर तुमच्या पगारातून पैसे वसुल करु अशी धमकी त्यांना दिली जात होती असे म्हटले जाते. या वसुलीच्या तगाद्यामुळे प्रदीप शिंपी यांची मानसिकता बिघडली होती. ते कायम तणावात रहात होते.

pradip shimpi

1 नोव्हेंबर 2017 पासून प्रदीप धनलाल शिंपी (मयुर कॉलनी जळगाव) हे मुथुट फायनान्स इंडीया लिमीटेड या कार्यालयात क्रेडीट मॅनेजर या पदावर कार्यरत होते. त्यांच्यावर कंपनीने जळगावसह औरंगाबाद, धुळे व शिरपुर येथील वसुलीची जबाबदारी दिली होती. कंपनीच्या विविध स्वरुपाच्या कामांची जबाबदारी त्यांना दिली जात होती. गेल्या सहा महिन्यांपासून हा अतिरिक्त  ताण वाढला होता. असह्य होणारा हा ताण ते आपल्या पत्नीजवळ बोलून दाखवत होते. या ताणतणावामुळे 8 जून रोजी त्यांची तब्येत बिघडली होती. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 20 जून रोजी शिंपी आपल्या परिवारासह नातेवाईकांकडे एका कार्याक्रमात गेले होते. रात्री उशिरा घरी आल्यानंतर ते एकटेच घरातील बैठक हॉलमध्ये झोपले. त्यांची पत्नी व दोन्ही मुले मागच्या खोलीत निजले होते. त्यांची पत्नी व मुले गाढ झोपली असली तरी शिंपी यांची झोप शेकडो मैल दूर पळाली होती. त्यांना कायमचे झोपायचे होते.

सकाळी साडेसहा वाजता त्यांचा लटकलेला मृतदेह घरातील सर्वांना दिसून आला. त्यांनी गळफास घेत आत्महत्या केल्याचे दृश्य बघताच त्यांच्या पत्नीसह मुलांनी टाहो फोडला. या घटनेची माहिती मिळताच रामानंद नगर पोलिस स्टेशनचे अधिकारी व कर्मचा-यांनी घटनास्थळी धाव घेतली. नातेवाईकांच्या मदतीने त्यांचा मृतदेह खाली उतरवण्यात आला. तो मृतदेह उत्तरीय तपासणीकामी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आला.

प्रदीप शिंपी यांनी तिन पानांची सुसाईड नोट लिहून ठेवली होती. त्यात कुटूंबियांना मदत करा व मला माफ करा असे आवाहन केले आहे. कामाचा ताण व अतिरिक्त दबाव हे त्यांच्या सुसाईड नोटमधील प्रमुख मुद्दे होते. कंपनीच्या विविध प्रकारच्या कामांची जबाबदारी आपल्यावर सोपवली जात होती असे सुसाईड नोटमधे त्यांनी नमुद केले आहे. कमी मनुष्य बळात जास्तीत जास्त काम करावे लागत असल्याचा उल्लेख त्यांनी चिठ्ठीत केला आहे. अतिरिक्त काम वेळेत पुर्ण करण्यासाठी वरिष्ठांकडून टाकला जाणरा दबाव आणि नोकरी जाण्याची भिती असे विविध मुद्दे त्यांनी चिठ्ठीत नमुद केले. कंपनीतील इतर सहकारी, अधिकारी, कंपनी मालकांनी भविष्य निर्वाह निधी, पेन्शन, आर्थिक मदत देऊन  कुटूंबाला मदत करण्याचे आवाहन देखील त्यांनी केले. सुसाइड नोटच्या काही झेरॉक्स प्रती मृत्यूपुर्वी शिंपी यांनी घरात वेगवेगळ्या ठिकाणी ठेवल्या होत्या. या कॉपी, मुळ सुसाइड नोट कुठे ठेवली आहे याची माहिती देणारी एक वेगळी नोट त्यांनी मुलाच्या नावाने लिहून ठेवली होती. याच नोटच्या आधारे परिवाराने ती मुळ सुसाइड नोट शोधून काढली.

पुणे येथील वरिष्ठ अधिकारी प्रशांत बर्गे यांच्या तणावाखाली असल्यामुळेच पतीने आत्महत्या केल्याचा आरोप त्यांची पत्नी सुचीता यांनी केला. सचिन बर्गे यांच्य्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी मृत प्रदीप शिंपी यांची पत्नी सुचीता यांनी केला. त्यांच्यासह नातेवाईकांची समजूत काढल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला. याप्रकरणी रामानंद नगर पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here