मुंबई : अभिनय सम्राट दिलीपकुमार यांचे आज 7 जुलै रोजी भल्या पहाटे निधन झाले. खार येथील हिंदुजा हॉस्पीटल येथे त्यांना दाखल करण्यात आले होते. तेथेच त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला. मृत्युसमयी त्यांचे वय 98 वर्ष होते. गेल्या कित्येक दिवसांपासून त्यांची मृत्युशी झुंज सुरु होती. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. दिग्गज अभिनेता दिलीपकुमार यांच्या एक्झीटमुळे चित्रपटसृष्टीसह राजकीय, उद्योग, खेळ अशा विविध क्षेत्रातून शोकसंवेदना व्यक्त केल्या जात आहे.
दिलीपकुमार यांचे मुळ नाव मोहम्मद युसुफ खान सरवर खान पठाण असे आहे. त्यांचा जन्म 11 डिसेंबर 1922 रोजी त्यावेळच्या ब्रिटीश कालीन भारतातील पेशावर (आताचे पाकिस्तान) येथे झाला. बारा मुलांच्या पश्चतून परिवारात त्यांचा जन्म झाला होता. त्यांच्या वडीलांचा फळांचा व्यापार होता असे म्हटले जाते. त्यावेळचे बॉंम्बे व आताच्या मुंबईतील सैन्याच्या कॅन्टीनमधे त्यांनी सुरुवातीच्या काळात काम सुरु केले होते. त्याकाळात देविका राणी या आघाडीच्या अभिनेत्रीचा फिल्म इंडस्ट्रीमधे बोलबाला होता.
देविका राणी यांनी युसुफ खान यांच्यात अभिनय गुण अर्थात स्टार मटेरियल असल्याचे ओळखले होते. देवीकाराणी यांच्या पुढाकाराने दिलीपकुमार यांचे फिल्म इंडस्ट्रीत आगमन झाले. चित्रपट सृष्टीत आगमन झाल्यानंतर युसुफ खान यांचे दिलीपकुमार या फिल्मी नावात रुपांतर झाले. ज्वार भाटा या चित्रपटात दिलीपकुमार यांना सन 1944 मधे पहिली भुमिका मिळाली. सन 1966 मधे त्यांनी त्यांच्यापेक्षा दुपटीने कमी वय असलेल्या सायरा बानो या अभिनेत्रीसोबत संसार थाटला. त्यावेळी दिलीपकुमार यांचे वय 44 तर सायरा बानो यांचे वय अवघे 22 वर्ष होते.
लवकरच दिलीपकुमार यांची ट्रॅजेडी किंग अशी ओळख निर्माण झाली. बॉलीवुड मधे आपले अभिनयाचे साम्राज्य निर्माण करणा-या दिलीपकुमार यांनी मनोज कुमार यांचा क्रांती (1981) , सुभाष घई यांचा विधाता (1982), कर्मा (1986), सौदागर (1991) अशा एकाहून एक सरस चित्रपटाच्या माध्यमातून आपले अभिनय कौशल्य दाखवले. सन 1994 मधे दिलीप कुमार यांना जिवनगौरव फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. त्यानंतर त्यांना चित्रपट सृष्टीतील सर्वोत्कृष्ट समजला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आला. सन 1998 मधे त्यांना पाकिस्तानचा ‘निशान-ए-इम्तियाज’ या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.