घाटंजी – यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : धनादेश अनादर झाल्याप्रकरणी घाटंजी तालुक्याच्या शिरोली येथील विवेक पुंजाराम ठावरी यास घाटंजी येथील द्वितीय न्यायालय प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी तथा पीठासीन अधिकारी अनिकेत अरुण कळमकर यांच्या न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. तीन महिने साधा कारावास, १,१२,७६८ रुपयांसह नुकसान भरपाई म्हणून ५०,००० असे एकूण १,६२,७६८ रुपये असे या शिक्षेचे स्वरूप आहे. ३० दिवसांच्या आत शिक्षेची रक्कम जमा न केल्यास कसूर म्हणून आणखी एक महिन्याची शिक्षा भोगावी लागणार असल्याचा आदेशही न्यायालायाने दिला आहे.
घाटंजी येथील गोदावरी अर्बन क्रेडीट को ऑपरेटिव्ह सोसायटी मर्यादित नांदेड बॅक या फिर्यादी संस्थेतर्फे ॲड. निलेश चवरडोल यांनी बाजू मांडली. तर विवेक ठावरी यांच्यातर्फे ॲड. पी. पी. राऊत यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले.
फिर्यादी संस्था ही महाराष्ट्र सोसायटी ॲक्ट १९६० नोंदणीकृत असून सभासदांना कर्ज पुरवठा करणे, ठेवी स्विकारणे इत्यादी व्यवसाय करते. विवेक ठावरी हे संस्थेचे सभासद असून त्यास १३ मे २०१६ रोजी १,००,००० रुपयांचे कर्ज मंजूर झाले होते. तसेच व्याजासह १,१२,७६८ रुपये झाले होते. ठावरी यांनी दि यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा शिरोली बँकेचा रुपये १,१२,७६८ चा धनादेश दिनांक २७ जुलै २०१८ रोजीचा फिर्यादी संस्थेला दिला. बँक खात्यातील निधी अभावी तो धनादेश परत आला. अगोदर फिर्यादी संस्थेने आरोपीला नोटीस बजावली. मात्र रक्कम जमा न केल्याने पराक्रम्य लेख अधिनियम, १८८१ चे कलम १३८ प्रमाणे घाटंजी येथील न्यायालयात खटला दाखल केला.
सदर प्रकरणात फिर्यादीचे वकील व आरोपीचे वकील यांच्यात युक्तीवाद झाला. फिर्यादीचे वकील ॲड. निलेश चवरडोल यांचा युक्तीवाद ग्राहय ठरवून आरोपी विवेक पुंजाराम ठावरी (रा. शिरोली ता. घाटंजी) यांस पराक्रम्य लेख अधिनियम, १८८१ चे कलम १३८ अन्वये दोषी ठरविण्यात आले.