कु. चंचल पवार अनुभुती स्कूलमध्ये प्रथम

जळगाव : जैन इरिगेशनचे संस्थापक पद्मश्री डॉ. भवरलालजी जैन यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या (दारिद्र्य रेषेखालील विद्यार्थ्यांसाठी) अनुभूती इंग्लिश मिडियम स्कूलचा इयत्ता 10 वी चा 100 टक्के निकाल लागला. यात विद्यार्थीनींनी बाजी मारली. चंचल कैलास पवार-प्रथम (99.60 %), ओजस्विनी किरण बोरसे- द्वितीय (99.00 %) व शर्वरी हेमंत वाडकर- तृतीय (98.40 %) ठरली. गुणवत्ताधारक उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अनुभूती स्कूलच्या संचालिका सौ. निशा अनिल जैन तसेच जैन इरिगेशनचे सह-व्यवस्थापकीय संचालक अतुल जैन यांनी अभिनंदन केले.

शास्त्र, गणित आणि सामाजिक शास्त्र या विषयात तर बहुतांश विद्यार्थ्यांनी 100 पैकी 100 गुण पटकावले आहेत. शास्त्र विषयात शर्वरी वाडकर, चंचल पवार, रोशन पवार, पवन राऊत, गणित विषयात पवन राऊत, रोशन पवार, चंचल पवार, ओजस्विनी बोरसे, श्रुती खैरनार तर सामाजिक शास्त्र या विषयात कल्पना जोशी व चंचल पवार यांनी पैकीच्या पैकी गुण मिळविले आहेत. 10 व्या इयत्तेसाठी एकूण 72 विद्यार्थी होते. त्यांची टक्केवारी पाहिली असता 90% च्यावर गुण मिळविणारे 11, 80 ते 89 टक्के गुण मिळविणारे 19, 75 ते 79 टक्के गुण मिळविणारे 15 विद्यार्थी आहेत. सर्वच वि्दयार्थी उत्तम गुण मिळवून उत्तीर्ण झालेले आहेत.

“अत्यंत प्रतिकूल आर्थिक परिस्थितीत असलेल्या या वि्दयार्थ्यांना ‘कोविड-19’ च्या आव्हानात्मक परिस्थितीत खूप अडचणी आल्या असल्या किंवा परीक्षा झाली नसली तरी सर्व विद्यार्थ्यांनी अत्यंत निष्ठेने व सातत्याने आपला अभ्यास चालू ठेवला ह्या गोष्टीचे मला कौतुक आहे,” अशी प्रतिक्रिया जैन इरिगेशनचे व भवरलाल अँण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन यांनी व्यक्त केली.

शाळेत प्रथम आलेली कु. चंचल पवार हिचे वडील सेल्समन असून ते घरोघरी जाऊन आरोग्य व सौंदर्य प्रसाधनांची विक्री करतात. “आपल्या कन्येने मिळविलेल्या यशामुळे आम्ही सर्व आनंदात आहोत”, अशी प्रतिक्रिया तिच्या आई-वडिलांनी नोंदविली. स्कूलमध्ये दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या कु. ओजस्विनी बोरसेचे वडील बांधकाम क्षेत्रात काम करतात. त्यांची आर्थिक परिस्थिती ही बेताची आहे. शर्वरी वाडकर हिचे वडील एका मेडिकल दुकानात कामावर आहेत. अशा प्रकारे परिस्थितीशी दोन हात करून अव्वल क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here