खाकी वर्दीसह सोशल मिडीयावर घेऊ नका वाहवा– जालना पोलिस अधिक्षकांनी भरली कारवाईची हवा

जालना : खाकी वर्दीचा रुबाब दाखवत सोशल मिडीयावर फॉलोअर्स वाढवण्याचा नाद करणा-यांना जालना पोलिस अधिक्षक विनायक देशमुख यांनी चांगलेच खडसावले असून कारवाईचा इशाराच दिला आहे. खाकी वर्दी आणि सरकारी वाहनाचा वापर करत सोशल मिडीयावर फॉलोअर्स वाढवून लाईक, कमेंट्स वाढवणा-या संबंधितांना या इशा-याने जरब बसली असल्याचे म्हटले जात आहे.

कोरोना कालावधीत पोलिसांनी जिवाची बाजी लावून अथक परिश्रम घेतले. त्यामुळे पोलिसांचा निश्चितच सन्मान वाढला आहे यात दुमत असण्याचे कारण नाही. असे असले तरी पोलिस प्रशासनातील काही सोशल मिडीयावर ड्युटी कालावधीत वर्दी असतांना सरकारी वाहनासोबत व्हिडीओ तयार करुन हवा करण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हटले जात आहे. अमरावती ग्रामीण पोलिस दलातील एका कर्मचा-याने हातात पिस्तुलसारखी दिसणारी वस्तू हातात घेत एक व्हिडीओ व्हायरल केल्याचा प्रकार उघडकीस आला. याच धर्तीवर जालना पोलिस अधिक्षक विनायक देशमुख यांनी सोशल मिडीयावर सक्रीय असणा-या पोलिस दलातील संबंधीतांना इशारा दिला आहे. ड्युटीवर असतांना मोबाईलवर जास्त लक्ष दिल्यामुळे त्याचा कामावर परिणाम होत असल्याचे म्हटले जात असून या प्रकाराबाबत काही महिन्यांपुर्वी आयजी यांनी देखील काही सुचना वजा आदेश दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here