देवकर हॉस्पिटलमध्ये खुब्याची शस्त्रक्रिया झाली यशस्वी

जळगाव : आपल्या घरात चालत असतांना एकाएकी पाय घसरुन पडल्यानंतर पायाचा खुबा (कमरेतील बॉल) फ्रॅक्चर झाल्याने जेष्ठ नागरिक मुरलीधर शंकर निकुंभ हे गेल्या महिनाभरापासून अंथरुणाला खिळले होते. जळगाव शहरातील महाबळ परिसरात राहणारे 85 वर्ष वय असलेले मुरलीधर शंकर निकुंभ यांच्या परिजनांनी त्यांना वैद्यकीय उपचारार्थ काही डॉक्टरांकडे नेले होते. मात्र निकुंभ यांचे वय आणि त्यांना असलेल्या हृदयाच्या झडपेची व्याधी लक्षात घेता कुणीही डॉक्टर शस्त्रक्रिया करण्यास धजावत नव्हते.

श्री गुलाबराव देवकर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी मात्र हे आव्हान स्विकारले. अवघ्या आठ दिवसांच्या उपचारानंतर श्री. मुरलीधर निकुंभ आपल्या पायांवर उभे राहिले. जळगावच्या महाबळ परिसरातील रहिवासी असलेले निकुंभ सव्वा महिन्यापूर्वी आपल्या घरातच पाय घसरुन पडले आणि त्यांच्या पायाचा खुबा मोडला. त्यांना चालणेच काय पण साधे उभे राहणेही शक्य होत नव्हते. त्यांच्या परिवारातील सदस्यांनी शहरातील काही रुग्णालयांमध्ये त्यांना उपचारासाठी नेले होते. त्यांची खुब्याची शस्त्रक्रिया करावी लागणार होती. मात्र, त्यांचे ८५ वर्षांचे वय आणि त्यांना पूर्वीच असलेल्या हृदयाच्या झडपेची व्याधी पाहता डॉक्टरांनी शस्रक्रिया करण्याची रिस्क न घेता त्यांना घरी परत पाठवले. कारण वय आणि झडपेचा आजार पाहता त्यांना भूल देऊन शस्त्रक्रिया करणे शक्य नव्हते. अखेर त्यांनी देवकर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल गाठले. या ठिकाणी हृदयाच्या व अन्य सर्वच चाचण्याची सोय एकाच छताखाली असल्याने तेथील डॉक्टरांनी या शस्त्रक्रियेचे आव्हान पेलत श्री. निकुंभ यांच्यावर उपचार करण्याचा निर्णय घेतला.

त्यानुसार निकुंभ यांच्या सर्व चाचण्या दोन दिवसांत पार पाडून शस्त्रक्रियेसाठी डॉक्टरांचा चमू सिद्ध झाला. यात अस्थिशल्यविशारद डॉ. अभिजित पाटील यांच्यासह आयसीयू तज्ञ डॉ. प्रियांका अभिजित पाटील, भूलतज्ञ ललित पाटील डॉ. स्नेहल गिरी, डॉ. आशिअन्वर, डॉ. अमित नेमाडे, डॉ. नितीन पाटील यांनी शस्त्रक्रियेची तयारी केली अन्‌ अवघ्या दोन तासांत या चमूने ही शस्त्रक्रिया लिलया पार पाडली. दहा दिवसांच्य विश्रांती आणि व्यायामानंतर श्री. निकुंभ यांना डिश्‍चार्ज देण्यात आला. त्यावेळी त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. कारण तब्बल सव्वा महिन्यांनतर ते पुन्हा आपल्या पायावर चालू लागले होते. या अत्यंत जिकिरीच्या शस्त्रक्रियेनंतर रुग्णालयाचे संस्थापक संचालक माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी स्वतः श्री. निकुंभ यांची विचारपूस करून डॉक्टरांच्या टीमचे तोंडभरून कौतुक केले.

यासंदर्भात श्री. गुलाबराव देवकर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे अस्थीशल्यविशारद डॉ. अभिजीत पाटील यांनी “क्राईम दुनिया“सोबत बोलतांना म्हटले की हृदयासंबंधीच्या व अन्य सर्व चाचण्यांची सोय असल्याने त्या तातडीने करणे आणि ते रिपोर्ट पाहून शस्त्रक्रिया करण्याची आम्ही रिस्क घेतली. रुग्णाची संपूर्ण सरक्षा आणि काळजी घेत आम्ही ही शस्रक्रिया लिलया यशस्वी केली. एका वृद्धाचे उतारवयात होऊ पाहणारे हाल आम्ही टाळू शकलो याचे आम्हाला मनस्वी समाधान आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here