लग्न झाले तरी सुटलाच नाही प्रियकराचा सहवास – दोघांनी मिळून महेशला दिला कायमचा स्वर्गवास

पुणे – पुणे जिल्ह्याच्या इंदापूर तालुक्यातील राजकुमारी (नाव बदललेले) चे गावातील अनिकेत विकास शिंदे या तरुणासोबत प्रेमसंबंध जोमात सुरु होते. तारुण्यात पदार्पन करणा-या राजकुमारीवर प्रेमाचे जाळे फेकण्यात अनिकेत यशस्वी झाला. त्याच्या प्रेमजाळ्यात ती अलगद अडकल्यामुळे त्याला हायसे वाटले.  पहिल्याच प्रयत्नात राजकुमारीला आपलेसे करण्यात अनिकेत यशस्वी झाला होता.

अनिकेत आणि राजकुमारी या दोघांचा सहवास दिवसेंदिवस वाढत होता. सहवासातून प्रेमाचा अंकुर फुलला होता. बघता बघता दोघे प्रेमाच्या त्या सर्वोच्च बिंदूवर जाऊन भिडले होते. दोघांच्या प्रेमसंबंधाची कुणकुण दोघांच्या घरापर्यंत जाण्यास वेळ लागला नाही. गावात देखील दोघांची लव्ह स्टोरी चर्चेत आली होती. आपल्या मुलीची अनिकेत सोबत सुरु असलेली प्रेमकथा अजून चर्चेत येऊ नये असे तिच्या पालकांना वाटू लागले. त्यामुळे त्यांनी तिचे लग्न समाजातील एखाद्या तरुणासोबत लवकरात लवकर करुन देण्याचा विचार सुरु केला.

दौंड तालुक्यातील रावणगाव  येथील दत्तात्रय चव्हाण यांचा थोरला मुलगा महेश या तरुणाचे स्थळ राजकुमारीच्या पालकांना योग्य वाटले. महेश चव्हाण हा पेट्रोल पंपावर नोकरी करत होता. राजकुमारी अनिकेतच्या जास्त आहारी जाण्याला अटकाव होण्यासाठी तिचे लग्न करुन देणे हा एकच उपाय तिच्या आईवडीलांना योग्य वाटला. मात्र राजकुमारीला अनिकेतच्या स्पर्शाची सवय पडलेली होती. ती काही केल्या जात नव्हती.

राजकुमारीचे महेश चव्हाण या तरुणासोबत मोठ्या थाटामाटात लग्न पार पडले. लग्नानंतर राजकुमारी सासरी दौंड तालुक्यात असलेल्या रावणगाव येथे राहण्यास आली. राजकुमारीचे रुप बघून महेश भाळला होता. तो तिच्यावर मनापासून प्रेम करत होता. मात्र ती शरीराने सासरी पतीसोबत रहात असली तरी तिचे मन मात्र गावाकडे प्रियकर अनिकेतमधेच गुंतले होते. नवविवाहीत राजकुमारी सासरी उदास रहात होती. त्यामुळे तिचा पती महेश तिला प्रेमाने जवळ घेऊन विचारत होता की तु उदास का आहेस? त्यावर ती त्याला उत्तर देत होती की मला माहेरची आठवण येते.

नवीन नवीन लग्न झाल्यामुळे तिला सासरी करमत नसेल असा साधा व सरळ विचार करत तो तिला समजून घेत होता. सुटीच्या दिवशी महेश तिला स्वत:च माहेरी घेऊन जात होता व लागलीच सोबतच परत घेऊन येत होता. या संधीचा देखील ती पुरेपुर फायदा घेत होती. माहेरी आल्यावर मैत्रीणीला भेटायला जाते असा बहाणा करुन ती प्रियकर अनिकेतच्या भेटीला जात होती. त्या काही मिनीटांच्या भेटीतच ती प्रियकरासोबत आपले प्रेमसंबंध बळकट करुन घेत होती. त्यानंतर ती पतीसोबतच सासरी परत येत होती. लग्नाच्या आधीपासूनच तिचे गावातील अनिकेत सोबत असलेले प्रेमसंबंध विसरण्यास तीचे मन तयारच होत नव्हते.

हळूहळू काळ पुढे सरकत होता. ती दोन मुलांची माता झाली. तरीदेखील तिचे मन प्रियकर अनिकेतभोवतीच घिरट्या घालत होते. अजून देखील माहेरची आठवण येते या बहाण्याखाली ती माहेरी जाण्याचे काम काही सोडत नव्हती. कधी कधी तिचा पती महेश तिला एकटीलाच जाऊ देण्यास परवानगी देऊ लागला. एकटीला माहेरी जाण्याची संधी मिळताच तिचा आनंद गगनात मावेनासा होत असे. त्याचे कारण म्हणजे ती अनिकेतला भेटण्यासाठी पुर्णपणे मुक्त रहात होती. तिला पतीरुपी महेशचे बंधन आणि तातडीने परत येण्याची घाई रहात नव्हती. त्यामुळे जेव्हा महेशला वेळ नसेल तेव्हाच संधी साधून ती माहेरी जाण्याचा तगादा लावत होती. त्यामुळे तिला एकटीलाच माहेरी जाण्याचा योग येत होता.

तु एकटीच माहेरी येत जा असे अनिकेत तिला म्हणत असे. त्यामुळे दोघांना मुक्तपणे रहाता व फिरता येत होते. लग्न झाले व दोन मुले झाले तरी देखील राजकुमारीचा गावी असलेल्या अनिकेतसोबत प्रेमाचा सहवास सुरुच होता. बघता बघता सहा ते सात वर्षांचा कालावधी लोटला गेला होता. राजकुमारी आणी तिचा प्रियकर अनिकेत दोघेही एकमेकांच्या स्पर्शाला चटावले आणि सुखावले होते. ती अनिकेतला कायमसाठीच हवी होती. मात्र ती विवाहीता असल्यामुळे सध्या तरी ती त्याची एकट्याची नव्हती. तिच्याभोवती असलेले पतीरुपी महेशचे कुंपन त्याला तोडून टाकायचे होते.

मध्यंतरी लॉकडाऊन सुरु झाले. त्यामुळे महेश रिकामा झाला. त्याच्या हातांना काम नव्हते. खिशात पैसे नव्हते. त्यामुळे राजकुमारीने माहेरी जाण्याचे म्हटले तरी तो तिच्या सोबतच येत होता. त्यामुळे तिला अनिकेतच्या भेटीसाठी जातांना अडचणी व मर्यादा येत होत्या. त्या मर्यादा बघून इकडे अनिकेतच्या जिवाचा जळफळात होत असे. सासरी आलेल्या महेशचा अनिकेतसोबत परिचय झाला होता. मात्र आपली पत्नी व अनिकेत कोणत्या पातळीपर्यंत गेले आहेत याची महेशला कल्पना नव्हती.

राजकुमारी केवळ आपलीच रहावी असे अनिकेतला वाटत होते. त्यासाठी महेशला या जगातून कायमचे हद्दपार केल्यास राजकुमारी कायमची आपली होईल व दोघे राजा राणीसारखे राहू असे खुळ त्याच्या डोक्यात शिरले. महेशला कायमचे कसे संपवता येईल याचा विचार अनिकेत करत होता. याकामी त्याने त्याने चुलत भाऊ गणेश हनुमंत शिंदे याला तयार केले. रक्षा बंधनाच्या निमीत्ताने राजकुमारी गावी येणार हे दोघांना चांगल्याप्रकारे माहिती होते. त्यामुळे 23 ऑगस्ट रोजी राजकुमारी पती महेशसोबत माहेरी आली. त्याच दिवशी महेशला संपवण्याचे दोघांनी नियोजन केले. ठरल्यानुसार राजकुमारी आणी महेश जोडीने इंदापूर तालुक्यात आले. महेशचा अनिकेतसोबत परिचय झालेला होता. सायंकाळी महेश एकटाच घराबाहेर फिरण्यास निघाला. नेमकी हिच संधी अनिकेत शिंदे व गणेश शिंदे या दोघांनी हेरली.

त्यांनी त्याची भेट घेतली. दोघांनी बोलत बोलत महेशला एकांतात नेले. रात्री दहा वाजेपर्यंत महेश दोघांसोबत निरा भिमा नदी जोड प्रकल्पाच्या बोगद्याजवळ निर्जन ठिकाणी गप्पा करत बसला होता. रात्रीचे दहा वाजले असल्यामुळे व तो परिसर निर्जन असल्याची संधी साधत गप्पांच्या ओघात गणेश व अनिकेतने महेशवर हल्ला चढवला. अनिकेतने धारदार कोयत्याने महेशच्या मानेवर जोरदार वार केला. अंधारात अचानक झालेल्या हल्ल्यामुळे महेश भांबावला. रक्तबंबाळ अवस्थेत तो खाली कोसळला. महेश खाली कोसळताच घाबरलेल्या दोघांनी रक्ताने भरलेला कोयता जवळच असलेल्या विहीरीत टाकून देत तेथून पलायन केले.

दुस-या दिवशी 24 ऑगस्ट रोजी हा मृतदेह कुणाच्या तरी नजरेस पडला. अज्ञात व्यक्तीने याबाबत भिगवन पोलिस स्टेशनला खबर दिली. माहिती मिळताच स.पो.नि. दिलीपराव पवार यांनी आपल्या सहका-यांसह घटनास्थळाकडे धाव घेतली. पोलिस पथकाच्या दृष्टीने महेशचा मृतदेह अनोळखी होता. त्याच्या गळ्यावर धारदार शस्त्राचे वार दिसून येत होते. कुणीतरी त्याच्या मृतदेहाचा फोटो सोशल मिडीयावर प्रसारीत केला. त्याचा फायदाच झाला. त्यातून मृतदेहाची ओळख पटली.

दौंड तालुक्यातील रावणगाव येथील महेश दत्तात्रय चव्हाण (34) या तरुणाचा तो मृतदेह असल्याचे निष्पन्न झाले. त्याचा भाऊ नितीन चव्हाण याला पोलिसांनी पाचारण केले असता त्याने मृतदेहाला ओळखले. मयत महेशचा भाऊ नितीन याने दिलेल्या माहीतीनुसार त्याचा भाऊ महेश हा 23 ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाच्या दिवशी पत्नी व मुलांसह सासरवाडीला गेला होता. नितीन चव्हाण याने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी महेशच्या सासरवाडीच्या लोकांवर लक्ष केंद्रीत केले. घटनेच्या आदल्या रात्री महेश कुणाकुणाच्या संपर्कात आला होता. त्याच्या मोबाईलवर कुणाकुणाचे कॉल आले होते. याबाबतची माहिती संकलीत करण्यात आली. साध्या वेशातील पोलिस कर्मचारी गावात चर्चेचा कानोसा घेण्यासाठी पाठवण्यात आले. यावेळी गावात महेशच्या पत्नीचे व अनिकेत यांच्यातील प्रेमसंबंधाची दबक्या आवाजात चर्चा सुरु होती. पोलिसांनी हा मुद्दा देखील तपासाच्या पटलावर घेत तपास रेटून नेला. 

तपासाचा भाग म्हणून अनिकेत शिंदे याला चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले. त्याला स.पो.नि. दिलीपराव पवार यांच्यासमक्ष हजर करण्यात आले. चौकशीत तो सहकार्य करत नव्हता. आपल्याला काहीच माहिती नाही असे तो वारंवार सांगत होता. मात्र पोलिसी खाक्या बघताच त्याने आपला गुन्हा कबुल केला. त्याने दिलेल्या माहितीत गणेश शिंदे याचे देखील नाव समोर आले. त्यामुळे गणेशला देखील चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले. गणेशला स्वतंत्रपणे विचारणा करण्यात आली. मात्र त्याने देखील आपल्याला काहीच माहिती नाही असा पाढा सुरु केला. मात्र आम्हाला अनिकेतने सर्व काही सांगीतले आहे असे त्याला म्हणताच त्याचा चेहरा उतरला. दोघांना एकमेकांच्या समोर आणले गेले. त्यावेळी दोघे एकमेकांकडे बघू लागले. दोघांनी आपला गुन्हा कबुल केला. 

याप्रकरणी भिगवण पोलीस स्टेशनला महेश शिंदे व गणेश शिंदे या दोघांविरुद्ध खूनाचा गुन्हा नोंदवण्यात आला. सदर गुन्हा भाग 5 गु.र.न. 209/21 भा.द.वि. 302, 201, 34 नुसार दाखल करण्यात आला. अटकेनंतर दोघांना इंदापूर येथील न्यायालयात हजर करण्यात आले. इंदापूर प्रथम वर्ग न्यायदंडाधिका-यांनी त्यांना सुरुवातीला सहा दिवस पोलिस कोठडी सुनावली. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, बारामती विभागाचे उपविभागीय अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा पुढील तपास भिगवण पोलीस स्टेशनचे स.पो.नि. दिलीपराव पवार करत आहेत. त्यांना पोलिस उप निरीक्षक सुभाष रुपनवर, पोलिस उप निरीक्षक विनायक घडस पाटील, पोलीस अंमलदार नाना वीर, विठ्ठल वारगड, समीर को, सचिन पवार, महेश उगळे, केशव चौधर, महेश माने, संदिप पवार, विजय लोंढे, अतुल पठाण, पालसांडे, भांडवलकर, अंकुश माने आदींची मदत लाभत आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here