पर्यावरण जीवन पद्धतीची आज आवश्यकता – डॉ. भालचंद्र नेमाडे

जळगाव, दि. 22 (प्रतिनिधी) – महात्मा गांधीजींच्या ‘प्रेयस आणि श्रेयस’ या तत्त्वानुसार प्रगती साध्य करायला हवी. प्रगती म्हणजे वेग नव्हे तर प्रगतीची सुयोग्य दिशा मोलाची असते. यासाठी कठोर निर्णय घ्यावे लागले तरी ते घेतले पाहिजे व संस्कृती आणि पर्यावरण जोपासण्याच्यादृष्टीने प्रत्येकाने कृती करायला हवी, पर्यावरण जीवन पद्धतीची आज आवश्यकता आहे असे आवाहन डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी केले. डॉ. नेमाडे यांनी अनेक उदाहरणे व दाखले दिले. महात्मा गांधीजींच्या वस्त्रत्याग शताब्दीच्या औचित्याने आपण घालत असलेले कपडे पर्यावरणपूरक, ज्या परिस्थितीत राहतो त्या हवामानाला अनुकूल आहेत का याबाबत आत्मचिंतन करणे आवश्यक आहे असे सांगून त्यांनी उपस्थितांना वस्त्राबाबत प्रतिज्ञा दिली. ‘गांधीतीर्थ जळगाव येथे आज 22 सप्टेंबर 2021 रोजी पूज्य गांधीजींच्या वस्त्रत्याग शताब्दीच्या शुभप्रसंगी मी असा संकल्प करतो की, पर्यावरण पोषक कपडे वापरीन आणि साधी राहणी हे पूज्य गांधीजींचे जगन्मान्य तत्त्व यथाशक्य आचरणात आणेल.’

आजच्या परिस्थितीत गांधी विचार क्षीण होत चाललेला आहे असे म्हटले जाते. गांधी विचार आचरणात आणायचा असेल तर घर्षण महत्त्वाचे असते, यातूनच मानवीमूल्य जोपासले जाऊ शकतात. एकूण मानवतेच्या विश्वात गौतम बुद्धानंतर, भगवान महावीर यांच्यासह मानवी जीवनांच्या सर्व पैलूंना स्पर्श करणारे, जीवनमूल्य जोपासणारे, दीन-दुबळ्यांपर्यंत पोहोचलेले गांधीजी होते.

औद्योगिक क्रांतीच्या आधी जेवढे लागेल तितकेच उत्पादन होत असे परंतु नंतरच्या काळात गरजेपेक्षा जास्तीचे उत्पादन करण्यात आले त्यासाठी बाजारपेठा शोधणे सुरू झाले आणि त्यातूनच हिंसेचा उदय झाला. यातून माणसाचे महत्त्व कमी होऊन यंत्रांचे महत्त्व वाढले. स्वस्तात वस्तू बनवायच्या आणि ग्राहकांना जास्तीच्या किंमतीने विकायचे असे नफ्याचे अर्थशास्त्र सुरू झाले.

‘जोपर्यंत श्रीमंत-गरीबांना आवश्यक एवढे स्वदेशी वस्त्र मिळत नाही तोपर्यंत मी केवळ पंचा नेसेल…’ या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या मदुराई येथे घेतलेल्या प्रतिज्ञेला २२ सप्टेंबर २०२१ रोजी शंभर वर्ष झाली. महात्मा गांधी यांच्या वस्त्रत्याग शताब्दी निमित्त गांधी रिसर्च फाउण्डेशन, जळगांव द्वारा ‘आज गांधी आठवतांना…!’ या विषयावर ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ साहित्यिक डॉ. भालचंद्र नेमाडे यांच्या ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. गांधी रिसर्च फाउंडेशनच्या कस्तुरबा हॉलमध्ये निमंत्रितांसमोर हा कार्यक्रम आयोजण्यात आला होता. त्याचे गांधी रिसर्च फाउंडेशनच्या सोशल मीडियावर त्याच्या ऑनलाईन प्रसारणाची व्यवस्था करण्यात आली होती. डॉ. भालचंद्र नेमाडे यांच्या व्याख्यानानंतर श्रोत्यांनी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून आपल्या मनातील शंकांचे निरसन करून घेतले. यात गांधी विचार पुन्हा रुजविण्यासाठी काय करणे आवश्यक आहे? तसेच मराठी साहित्यात गांधी विचार फारसा दिसत नाही या प्रातिनिधीक प्रश्नांवर भाष्य केले.

आरंभी कार्यक्रमातील पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. अनुभूती स्कूलचे शिक्षक निखिल क्षीरसागर आणि भूषण गुरव यांनी साने गुरुजींचे ‘खरा तो एकची धर्म…’ ही प्रार्थना सादर केली. कार्यक्रमाचे वक्ते डॉ. भालचंद्र नेमाडे यांचा परिचय करून देण्यात आला. कार्यक्रमाच्या औचित्याने शंभर वर्षांपूर्वी महात्मा गांधीजींनी केलेल्या वस्त्रत्याग घटनेच्या संकल्पनेबाबत छोटा माहितीपट बनविण्यात आला होता तो यावेळी उपस्थितांना दाखविण्यात आला. गांधी रिसर्च फाउंडेशनचे सहकारी चंद्रशेखर पाटील यांनी प्रास्ताविक केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कंपनीचे सहकारी ज्ञानेश्वर शेंडे यांनी केले. आभारप्रदर्शन गांधी रिसर्च फाउंडेशनचे सहकारी सुधीर पाटील यांनी केले. राष्ट्रगीताने या कार्यक्रमाचा समारोप झाला.

हा संपुर्ण कार्यक्रम गांधीतीर्थ या युट्युब चॅनलवर उपलब्ध आहे. गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या या अधिकृत https://www.youtube.com/watch?v=QU6UxkgEh60&list=LLO01_egeiXb0Re9jI7ZoLMw लिंकवर जावून पाहू शकता.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here