पोलिस स्टेशन आवारात डीजे वाजवून झाली मजा!- बारा पोलिसांना वेतनवाढ रोखीची मिळाली सजा!!

अमरावती : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर गणेश विसर्जन विना मिरवणूकीने ढोलताशे आणि वाद्य न वाजवता काढण्याच्या शासनाच्या सुचना होत्या. मात्र अमरावती जिल्ह्याच्या तळेगाव दशासर पोलिस स्टेशनच्या कर्मचा-यांनी गणेश विसर्जन मिरवणूक काढतांना पोलिस स्टेशन आवारात डीजे लावला होता. या डीजे लावून काढण्यात आलेल्या गणेश विसर्जन मिरवणूकीचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला होता. या घटने प्रकरणी संबंधीत पोलिसांना त्यांची एक वर्षाची वेतनवाढ रोखण्याची नोटीस बजावण्यात आली आहे.

या घटनेची दखल जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक अविनाश बारगळ यांनी गांभिर्याने घेतली. या घटनेची चौकशी करुन तसा अहवाल देण्याचे आदेश त्यांनी उप विभागीय अधिकारी जितेंद्र जाधव यांना दिले होते. या घटनेची चौकशी पुर्ण झाल्यानंतर पोलिस अधिक्षकांना अहवाल सादर करण्यात आला.

या प्रकरणी तळेगाव दशासर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अजय आकरे यांच्यासह बारा पोलिसांचा या डीजे प्रकरणात सहभाग असल्याचा अहवाल देण्यात आला आहे. घटनेच्या दिवशी पोलिस निरीक्षक अजय आकरे हे शासकीय कामानिमीत्त अमरावती येथे गेले होते. मात्र प्रभारी म्हणून त्यांना देखील एक वर्षासाठी वेतनवाढ रोखण्याबाबतची नोटीस देण्यात आली आहे. सुरुवातीला त्यांची नियंत्रण कक्षात रवानगी करण्यात आली होती. मात्र घटनेच्या दिवशी त्यांची अनुपस्थिती असल्याने त्यांना पुन्हा पोलिस स्टेशनला पाठवण्यात आले असले तरी त्यांची वेतनवाढ रोखीची नोटीस मात्र कायम राहिली आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here