सालीचा अपहरणकर्ता प्रशांत नव्हता शांत!— पोलिसांच्या तावडीत आठवली त्याला भ्रांत!!

गोंदीया (अनमोल पटले) : गंगाझरी पोलिस स्टेशन हद्दीत राहणारा प्रशांत (काल्पनिक नाव) हा मुलींना फुस लावून पळवून नेण्यात पटाईत होता. अल्पवयीन मुलींना तो आपले टार्गेट करत होता. काही वर्षापुर्वी त्याने एका शाळकरी मुलीला आपल्या बोलीबच्चनच्या जाळ्यात अडकवले. बघता बघता त्याने त्या मुलीला आपल्या नादी लावले. त्याच्या गोड बोलण्यात ती मुलगी अलगद फसली होती. ती शाळकरी मुलगी आपल्या प्रेम जाळ्यात अडकल्याचे हेरुन एके दिवशी त्याने तिला शाळेतून परस्पर पळवून नेले. काही दिवसांनी दोघे प्रेमी युगल परत आले. मात्र ती प्रशांतच्या नादी लागल्याने तिच्या हट्टापुढे तिच्या आईवडीलांचे काही चालले नाही. अखेर ती सज्ञान झाल्यानंतर तिचा विवाह प्रशांत सोबत करुन देण्यात आला.

एवढे कमी झाले म्हणून की काय प्रशांतने पत्नीची बहिण अर्थात त्याची साली असलेल्या अल्पवयीन मुलीला देखील आपल्या नादी लावण्यात धन्यता मानली. ज्याप्रमाणे पत्नी अल्पवयीन असतांना तिला पळवून नेले होते. तसाच प्रकार त्याने सालीसोबत देखील सुरु केला. आपल्या बोलीबच्चनमधे त्याने सालीला देखील अडकवले. ती शाळेत गेल्यानंतर तिला देखील प्रशांतने फुस लावून पळवून नेले.

शाळेत गेलेली आपली मुलगी अद्याप घरी परत आली नसल्याचे बघून तिचे आईवडील हवालदिल झाले. त्यांनी आपल्या अल्पवयीन मुलीचा सर्वत्र शोध घेतला. मात्र त्यात त्यांना यश आले नाही. त्यांनी आपल्या जावयाचा शोध घेतला असता तो देखील मिळून आला नाही. त्याच मोबाईल क्रमांक देखील बंद होता. त्यामुळे आपल्या जावयानेच आपल्या दुस-या मुलीला देखील पळवून नेल्याची त्यांची पक्की खात्री झाली. पहिल्या मुलीच्या बाबतीत जे झाले ते झाले, मात्र दुस-या मुलीला त्याच्या नादी लागू द्यायचे नाही असे तिच्या आईवडीलांनी ठरवले.

त्यांनी 13 ऑक्टोबर रोजी गंगाझरी पोलिस स्टेशनची पायरी चढत पो.नि. पोपट टीकेकर यांची भेट घेतली. पो.नि. पोपट टीकेकर यांना त्यांनी आपली व्यथा कथन केली. मुलीला पळवून गेल्याचे आईबापाच्या चेह-यावरील दुख: पो.नि. पोपट टीकेकर यांनी समजून घेतले. त्यांनी तातडीने याप्रकरणी संशयीत आरोपी विरुद्ध मुलीला फुस लावून पळवून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

पो.नि. पोपट टीकेकर यांनी आपल्या सहका-यांच्या मदतीने तपासाची चक्रे गतीमान केली. त्यांनी मुलीसह जावयाच्या नातेवाईकांचे फोन नंबर मागून घेतले. दरम्यान आपल्या मुलीने एटीएम मधून दहा हजार रुपये विड्रॉल केल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने हा प्रकार पो.नि. पोपट टिकेकर यांच्या कानावर घातला. संबंधीत बॅंकेशी संपर्क साधून माहिती घेतली असता पैसे काढण्याचा प्रकार नागपूर शहरातील एटीएममधून झाला असल्याचे त्यांना समजले. याचा अर्थ पलायन केलेला संशयीत आरोपी नागपूर येथे मुलीसह असल्याचे पो.नि. टीकेकर यांच्या लक्षात आले. त्यांनी नागपूर येथे जाण्यासाठी एक पथक तयार केले. त्या पथकात मुकेश शेंडे, महेंद्र कटरे व महिला पोलीस कविता बोपचे यांचा समावेश करण्यात आला. पळून गेलेल्या प्रशांत व पळवून नेलेल्या मुलीवर नजर ठेवत त्यांना ताब्यात घेण्याच्या सुचना पो.नि. टीकेकर यांनी गणेशपेठ नागपूर येथील पोलिसांना देवून ठेवल्या.

गणेशपेठ नागपुर पोलिसांच्या सहकार्याने गंगाझरी पोलिसांच्या पथकाने दोघांना शुक्ला लॉज येथून ताब्यात घेत गंगाझरी पोलिस स्टेशनला आणले. दोघांना पो.नि. टीकेकर यांच्या समक्ष हजर करण्यात आले. 18 ऑक्टोबर रोजी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने सुरुवातीला त्याला पोलिस कोठडी सुनावली. पोलिस कोठडी दरम्यान अधिक तपासाअंती संशयीत आरोपीविरुद्ध भा.द.वि. 376 (1) (2) (एन) तसेच पोस्कोचे कलम वाढवण्यात आले. संशयीत आरोपी सध्या पोलिस कोठडीत आहे.(या कथेतील संशयीत आरोपीचे प्रशांत हे नाव काल्पनिक आहे).

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here