सोमय्यांची तोफ आणि मंत्र्यांच्या घोटाळ्यांनी गाजला महाराष्ट्र

सध्या महाराष्ट्रात भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या नावाची तोफ भ्रष्टाचा-यांवर रोज भडीमार करतांना दिसते. त्यामुळे गेल्या सुमारे दोन तिन महिन्यांपासून महाराष्ट्र दणाणला आहे. एकटे सोमय्या हेच नव्हे तर इन्कम टॅक्स, ईडी, नार्कोटीक्स ब्युरो, या केंद्रीय एजन्सीच्या छाप्यांनी खळबळ उडवून दिली आहे. देशभर कोरोना कहर माजल्याने ही छापेमारी मध्यंतरी पावसाळी छत्री उन्हाळ्यात बंद करुन ठेवावी तशी बंद होती.

विधानसभा निवडणूकीनंतर महाराष्ट्रातला पहाटेचा शपथविधी दोन मंत्र्यांची गुलाबी प्रकरणे गाजली. दरम्यान राज्यात “ऑपरेशन लोटस” होणार, कोणता राजकीय पक्ष भाजपा सोबत नवी सत्ता बनवणार याची असलेली फुकट फौजदार माध्यमकर्मी पाळीव पत्रकारी सुत्राद्वारे हवा तापवण्यात आली. सध्याची दुकानदारी सुखनैव चालावी म्हणून “दिल्ली दरबारी स्वारी केव्हाही येऊ शकते तुमच्या घरी” म्हणून “संशयकल्लोळ” नामक राजकीय नाटक रंगले.

महाराष्ट्राची मंडळी बधत नाही हे बघून दोन राजकीय पक्षांना तोडण्याचा सुरु झालेला प्रयोग छापा सत्राद्वारे अद्याप सुरु आहे. याच दरम्यान राज्यातील सत्तारुढ घटक पक्षांनी स्ववर्चस्वासाठी सहकारी पक्षांना “खाली दाबण्यासाठी” आपल्या खास प्याद्यांचा वापर केला. कुरघोडी खेली केली. 100 कोटी रुपयांच्या खंडणीचे आरोप झाले. गृहमंत्री अनिल देशमुखांनी राजीनामा दिला. त्यांच्या घरावर अकरा छापे पडले. ज्यांच्या आरोपामुळे एखाद्या राज्याच्या गृहमंत्र्यांवर राजीनामा देण्याची वेळ येते त्या परमबीर सिंग यांना गायब होण्याची वेळ आली. ज्यांच्यावर आरोप झाले ते “गायब” आणी आरोपकर्ताही “गायब”. दरम्यान बडे उद्योगपती अंबानी यांच्या घरासमोरील स्फोटक प्रकरणात मनसुख हिरेनचा एक खून पडला. या प्रकरणाशी संबंधीत सचिन वाझे नामक पोलिस अधिका-याने “आता जगाचा निरोप घेण्याची वेळ आली” अ‍शी सोशल मिडीयावर टाकलेली पहिली भावनात्मक पोस्ट किती खरी होती त्याची आता खरी कल्पना येतेय.

एक तर आत्महत्या करुन स्वत:ला संपवा किंवा तुमच्या गुन्ह्यातील सहभागी सुत्रधार तुम्हाला ढगात पाठवतील ही भिती. त्यात जिवंत राहण्यासाठी “कुणाच्या हातचे कळसुत्री बाहुले” बनून राहण्याची नोकरशाही सुबुद्धी. आपली खंडणीखोरी एक तर वरिष्ठ पोलिस अधिकारी त्याचा हिस्सा घेऊन वाचवणार. हप्ता जमा करणा-याने बदमाशी केली तर टोळीवाले त्याचा खूनच पाडतात हा अनुभव सांगितला जातो. यापेक्षा वेगळे राजकीय व इतर क्षेत्रात वेगळे घडत नाही असे आता लोकांनाही कळते.

टोळीवाल्यांसारखीच महाराष्ट्रात राजकीय क्षेत्रात वर्चस्वाची लढाई सुरु झाली. ईडी, सीडीच्या इशा-यापासून प्रत्यक्षात ईडी, इन्कमटॅक्स, एनसीबीच्या धाडीचा धडाका गाजतोय. सिने अभिनेता सुशांतसिंग राजपूत याची आत्महत्या की हत्या यावर अद्याप सीबीआयचा निर्णय नाही. याच प्रकरणी कंगना रणौत सिने अभिनेत्रीने बॉलीवुड मधे ड्र्ग्ज कसे फोफावले यावर आवाज उठवला. ड्रग्ज माफीया शोधा, पकडा म्हणून ओरडली. परिणामी तिचे घर तोडले. “उखाड लिया” महाभाग गर्जले. बॉलीवुड मधील नशेखोरी म्हणजे रेव्ह पार्टीत चरस, गांजा, अफीम, हेरॉईन, एमडी, एलएसडी, कोकेन अशा अनेक व्यसनांचा धुमाकुळ सिने अभिनेता किंग खान पुत्र आर्यन खानच्या अटकेपर्यंत येऊन थांबला. आता “मन्नत” पर्यंत एनसीबीची छापेमारी होत असल्याच्या बातम्या आहेत.

या फिल्मी क्राईम स्टोरीपेक्षा काकणभर सरस असा भ्रष्टाचार भांडाफोड करणारा धुमाकुळ किरीट सोमय्या यांच्या भ्रष्टाचारावर हल्ला बोल ने माजवला. राज्यातील अठरा मंत्र्यांचे 24 घोटाळे सोमय्या यांच्या रडारवर आहेत. त्यांनी पुराव्यासह आरोप केल्यामुळे शिवसेना मंत्री अनिल परब यांचे रिसॉर्ट आणि शिवसेना प्रमुख उद्धवजींचे उजवे हात मिलींद नार्वेकर यांची बांधकामे पाडली गेली. राज्यातील सहकारी साखर कारखाने विक्रीतील घोटाळे बाहेर काढण्याची त्यांची मोहीम. त्यात जरंडेश्वर (सातारा) साखर कारखाना विक्रीतील गैरव्यवहारावर त्यांनी तोफ डागली. त्यासाठी बरीच कागदपत्रे पाठवली. सुमारे 25 हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप झालेत. परंतु उप मुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी साखर कारखान्यांच्या विक्री व्यवहार कागदपत्रांसह पत्रकारांपुढे उघड केला. बहुसंख्य साखर कारखाने किमान 20 कोटी ते 65 कोटी या दरम्यानच विक्री झालेत. त्यामुळे 25 हजार कोटीच्या भ्रष्टाचाराच्या आरोपातील हवा त्यांनी काढली. त्यावर कोण किती विश्वास ठेवते हे लवकरच दिसेल. सोमय्या यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या जावयाशी संबंधीत “जयोस्तुते” कंपनीला दहा वर्षासाठी दिलेला 15 हजार कोटींचा ठेका उजेडात आणताच तो आता रद्द करण्यात आला आहे. वर्षाला 1500 कोटी या कंपनीस मिळणार होते. सन 2012 मधे स्थापन झालेली ही कंपनी आठ वर्षात काहीही नफा मिळवू शकली नाही. आठ महिन्यांपुर्वी मुश्रीफ यांच्या जावयाने ती विकत घेताच 1500 कोटीचा दहा वर्षासाठी ठेका दिला होता. यावर पलटवार म्हणून सोमय्या भाजपा काळातील भ्रष्टाचा-यांवर का बोलत नाही? रा.कॉ.त मंत्री असतांना विजय गावीत, नारायण राणे यांच्या बद्दलच्या आरोपाचे काय झाले? भाजपा राष्ट्रीय अ‍ध्यक्षपदाच्या मागील निवडणूकीपुर्वी नितीन गडकरी यांच्या संबंधीत कंपन्या, त्यांची बेहिशेबी मालमत्ता याचे काय झाले? देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतांना कोयना धरणग्रस्तांना मुंबईत सिडकोची 24 एकर जमीन 1700 कोटी किमतीची केवळ तिन कोटीत कुणाच्या घशात घातली? असे प्रश्न विचारले आहेत. त्यावर सोमय्यांचे म्हणणे असे की राज्यात “मविआ” सत्तेत आहे. पुणे स्मार्ट सिटी घोटाळा संजय राऊत यांनी माझ्याकडे ढकलणे राजकीय स्टंटबाजी आहे. त्यावर राऊत ही प्रकरणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना चौकशीसाठी का देत नाही? असाही सोमय्यांचा सवाल आहे.

एकंदरीत राज्याच्या राजकारणात सध्या सोमय्यांचा धडाका, ड्र्ग्ज माफीया, भुमाफिया, बॅंक माफीयांचा धुमाकुळ दिसतो. अजून येत्या वर्षाच्या जानेवारी अखेरपर्यंत हे असेच चालु राहील. सोमय्या तोफेला तुर्त विश्रांतीचा सल्ला दिला जाऊ शकतो. परमबीर सिंग चंदीगढमधे लपल्याचे म्हणतात. सुपा-या फोडण्यात पटाईत असलेली पुणे – ठाणे – तोरसे – मुंबईची बोरु बहाद्दर मंडळी पाच पाच लाखांच्या सुपा-या खाऊन “चित भी मेरी पट भी मेरी” चा आभास देत त्यांच्या धन्याचा आवाज बुलंद करत बसली आहेत. आपण वाचकांनी प्रतिक्षा करायला काय हरकत आहे? 

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here