किसको गाली देता रे… आ. चव्हाण सटकले! –आमदार समोर दिसताच वसुलीखोर टरकले!!

जळगाव : आपल्या राज्यातील कारभार कशा पद्धतीने सुरु याची चाचपणी वजा तपासणी करण्यासाठी पूर्वीचे काही राजे महाराजे रात्री अपरात्री वेशांतर करुन गावात फेरफटका मारत असत. दोषी आढळणारा सेवक सकाळी राजाच्या दरबारात मानवंदना देत माफी मागत असे. दोषी सेवकाला कितपत शिक्षा द्यायची हे सर्वस्वी राजा स्वतःच निर्णय घेत असे. वेळ प्रसंगी प्रधानाचा अथवा सल्लागाराचा सल्ला घेऊन शिक्षेचे स्वरुप ठरवत असे. आता काळ बदलला.राजेशाही जावून लोकशाही आली आहे. (कमी अधिक प्रमाणात घराणेशाही मात्र सुरुच आहे.)

मुद्याचा विषय असा की चाळीसगाव तालुक्यातून औरंगाबादला कन्नड घाटातून मार्गक्रमण करावे लागते. हा कन्नड घाट एक वादाचा आणि चर्चेचा घाट नेहमीच राहिला आहे. या घाटात कित्येकदा वाहतूक ठप्प होत असते. सध्या हा कन्नड घाट अवजड वाहतुकीसाठी बंद असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. असे असले तरी अवजड ट्रक चालकांकडून काही पोलीस बांधव काही प्रमाणात धनराशी घेऊन त्यांच्या ताब्यातील वाहनांना जाऊ देत असल्याच्या तक्रारी आमदार महोदय मंगेश चव्हाण यांच्या कर्णपटलावर आल्या होत्या.

कन्नड घाट अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद असतांना देखील तेथे गैर प्रकार सुरु असल्याच्या वृत्ताने आमदार महोदय व्यथीत झाले. त्यांनी शहानिशा करण्यासाठी घटनास्थळाला भेट देण्याचे ठरवले. रात्रीच्या वेळी अंगात टी-शर्ट परिधान करत डोक्यावर भलामोठा बागायती रुमाल गुंडाळला. ट्रक चालकाच्या रुपात स्वतःचे वेशांतर करत ट्रक चालवत त्यांनी कन्नड घाटातील नाकाबंदीचे ठिकाण गाठले. सोबतीला व्हिडीओ शुटिंगची व्यवस्था सज्ज होती.

घटनास्थळावर जाताच त्यांच्या ताब्यातील वाहन पोलिस बांधवांनी हातातील बॅटरी चमकवत अडवले. घाटातून पुढे मार्गक्रमण करण्यासाठी पाचशे रुपयांची मागणी त्यांना करण्यात आली. मात्र पोलिस बांधव धनराशीची मागणी करत असल्याचे त्यांच्या मुखातून वदवून घेण्यासाठी आमदार महोदयांनी संवाद वाढवण्यास सुरुवातील नम्रपणे सुरुवात केली.
“ए भाई जरा कम करो ना…..लंबा जानेका है…..गरीब आदमी हू.…..दो सौ रुपये वापिस करो ना”. अशी विनवणी करत ट्रक तसाच उभा करुन ठेवला. “ए भाई…….बोलो ना इसको…..दो सौ रुपये वापिस करणे को इतने मत लो”.

शेवटी एक पोलिस दादा आक्रमक होत त्यांना साधारण ट्रक चालक समजून काहीश्या खरबरीत शब्द शैलीत बोलताच आमदार महोदयांच्या रागाचा पारा सर्रकन चढतो.
“गाली किसको देता रे……”असे म्हणत ट्रकचे स्टेरिंग सोडून ते खाली उतरतात. साक्षात चाळीसगावचे आमदार प्रकट झाल्याचे दिसताच आणि त्यांची ओळख पडताच चक्रीवादळ आल्यासारखी घटनास्थळावर परिस्थिती निर्माण होते. सर्व पोलिस बांधव पटापट लांब सरकतात.
त्यानंतर आमदार मंगेश चव्हाण विना माईकचे खाडखाड कडवे बोल सुरु करतात. रात्रीच्या निरव शांततेत त्यांचा आवाज चपळाईने दुमदुमण्यास वेळ लागत नाही.

माध्यमांसोबत बोलतांना ते म्हणाले की एकीकडे चाळीसगाव तालुक्यात शेतकऱ्यांचे गुरे चोरीला जात आहेत. गुरे चोरी रोखण्यासाठी नाकाबंदी करायला यांना वेळ नाही, महावसुली आघाडी सरकार शेतकऱ्यांचे वीजसंयोजन तोडत आहेत. गेल्या पंधरा दिवसांपासून सुरु असलेल्या एसटी संपाकडे कानाडोळा करतात मात्र पोलिसांच्या मार्फत महावसुली जोरात सुरु असल्याचा आक्षेप आमदारांनी घेतला.

वाहन सोडण्याच्या नावाखाली सुरु असलेली वसुली म्हणजे आंधळ दळतय आणि कुत्र पीठ खातय अशी अवस्था आहे. अवजड वाहनास बंदी असल्याचा फलक असतांना दोन्ही बाजूने वाहनांची ये-जा कशी काय सुरु आहे. रात्रभरातून 2 ते 5 लाखाची धनाराशी संकलित होत असल्याचा अंदाज आ.चव्हाण यांनी बोलतांना व्यक्त केला. भ्रष्टाचाराविरुद्ध आपण नेहमीच असून या वसुली प्रकरणी संबंधित पोलिसांच्या निलंबनाची मागणी करण्यात येणार असल्याची सिंहगर्जना आ.चव्हाण यांनी बोलतांना केली आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here