बालगंधर्व महोत्सवाचे जानेवारीत जळगावला आयोजन

जळगाव : वसंतराव चांदोरकर मेमोरियल ट्रस्टच्या वतीने पुढील महिन्यात ६ ते ९ जानेवारी या कालावधीत बालगंधर्व संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात कथ्थक, भरतनाट्यम, धृपद, शास्त्रीय गायनासह कोकण कन्या ब्रँडची सांगितीक मेजवानी लाभणार आहे. शहरातील कांताई सभागृहात आयोजीत पत्रकार परिषदेत संस्थेचे विश्वस्त दीपक चांदोरकर यांनी याबाबत सविस्तर माहिती कथन केली. याप्रसंगी शरदचंद्र छापेकर, अपर्णा भट, दीपिका चांदोरकर आदींची उपस्थिती होती. ६ जानेवारी रोजी या महोत्सवाचे विधीवत उदघाटन जिल्हाधिका-यांचे हस्ते होणार आहे. अहमदाबादच्या मानसी मोदी व मानसी करानी यांची कथ्थक व भरतनाट्यमची जुगलबंदी प्रथम सत्रात होणार आहे. दुस-या सत्रात कोलकात्याचा शुभ्रनील सरकार हार्मोनिकावर शास्त्रीय संगीताच्या माध्यमातून आपली कला सादर करणार आहे. त्याला तबलावादक चारुदत्त फडके यांची साथ लाभणार आहे.

‘मर्मबंधातली ठेव’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन दुस-या दिवशी आहे. या कार्यक्रमात श्रीरंग भावे, धनंजय म्हसकर, वेदश्री ओक या कलावंतांचा सहभाग राहणार आहे. तिस-या दिवशी असलेल्या पहिल्या सत्रात कानपुरचे धृपद गायक पंडित विनोद कुमार व्दिवेदी यांच्या धृपद गायनाचा आनंद रसिकांना लाभणार आहे. दुस-या सत्रात कोलकाताचे तबलावादक पंडित कुमार बोस व त्यांचा शिष्य कुणाल पाटील यांची तबला व पखवाज जुगलबंदी आपल्याला बघण्यास मिळणार आहे. कार्यक्रमाच्या समारोपात कोकण कन्या ब्रँडच्या आरती सत्यपाल, अरुंधती तेंडुलकर, रसिका बोरकर, स्नेहा आयरे, निकिता घाटे, भाग्यश्री टिकले यांचा सहभाग राहणार आहे. सुत्रसंचालन अभिनेत्री दीप्ती भागवत यांचे राहणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here