जळगाव मनपा बरखास्त करावी – गुप्ता

जळगाव: जळगाव महानगरपालिकेच्या नुकत्याच झालेल्या महासभेत सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराचे आरोप केले. थेट व्यासपीठावर जाऊन भाजपचे नगरसेवक कैलास सोनवणे यांनी शिवसेनेचे उप – महापौर कुलभुषण पाटील यांना धक्काबुक्की व बाचाबाची केली. विकास कामांच्या चर्चेवर भर देण्याऐवजी गुंडगिरीच्या माध्यमातून हमरीतुमरीचा दुर्दैवी प्रकार जळगावकर नागरिकांना बघण्यास मिळाला.

जळगाव शहरातील विविध व्यापारी संकुलातील बेसमेंटच्या जागी पार्कींगऐवजी व्यावसायिक वापर खुलेआम सुरु आहे. याप्रकरणी शिवसेनेचे उप – महापौर कुलभुषण पाटील हे संबंधितांकडून तोडीपाणी करत असल्याचा आरोप भाजपचे नगरसेवक कैलास सोनवणे यांनी केला आहे. तसेच व्यासपीठावर उप महापौरांनी बसू नये या मुद्द्यावरुन देखील नगरसेवक कैलास सोनवणे हातघाईवर आले होते.

घरकुल घोटाळ्यातील काही नगरसेवक महासभेत बसत असल्याच्या मुद्द्यावरुन देखील यावेळी वादंग माजले. या सर्व प्रकारामुळे जळगाव महानगरपालिका व पर्यायाने जळगाव शहराची पुरती बदनामी झाली आहे. जळगावच्या नागरिकांना रस्ते, दिवाबत्ती, पाणी या मुलभुत सोयी सुविधा व्यवस्थित मिळत नसतांना कर मात्र दुपटीने आकारण्याच्या गोष्टी केल्या जातात.

या सर्व बाबींकडे लक्ष वेधण्यासह जळगाव महानगरपालिका बरखास्त करण्याची मागणी जळगावचे सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी राज्याचे मुख्यमंत्री व उप मुख्यमंत्री यांच्या नावे असलेले निवेदन जिल्हाधिकारी डॉ. अभिजित राऊत यांना दिले आहे. सभागृहात राष्ट्रगीताच्या झालेल्या अवमान प्रकरणी संबंधीतांविरुद्ध रितसर गुन्हे दाखल करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here