मोबाईल चोरटे एलसीबीने केले जेरबंद

जळगाव : मोबाईलवर बोलत असलेल्या नागरीकांच्या हातातील मोबाईल जबरीने हिसकावून पलायन करणाऱ्या तिघांना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. नितीन दत्तु पाटील (शिवकॉलनी,जळगाव) या मुख्य आरोपीसह या जबरी चोरीत त्याला मदत करणारे गोविंदा उत्तम गोपाळ व विकास लहु गोपाळ (दोघे रा.साने गुरुजी कॉलनी,रामानंदनगर,जळगाव) अशी अटकेतील तिघांची नावे आहेत.

एलसीबी पथकाने तिघांना जळगाव शहरातील साने गुरुजी कॉलनी परिसरातून शिताफीने अटक केली. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली मोटार सायकल व तीन मोबाईल हस्तगत करण्यात आले आहे. मोबाईलच्या जबरी चोरीप्रकरणी जिल्हा पेठ व एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हे दाखल असून या तपासाच्या माध्यामातून ते उघडकीस आले आहेत.

आरोपी नितीन दत्तु पाटील हा सवयीचा गुन्हेगार असुन त्याचेवर यापुर्वीसुद्धा नाशिक तसेच जळगावच्या रामानंदनगर पोलीस स्टेशनला मोटार सायकल चोरीचे गुन्हे दाखल आहेत. नितीन दत्तु पाटील यास पोलीसांनी पकडल्यावर पोलीसांविरुद्ध मारहाणीचे खोटे नाटे आरोप करण्याची त्यास सवय आहे. यापुर्वी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने एका गुन्ह्यात त्याला पकडले होते. त्यावेळी काही पोलीसांवर त्याने मारहाण केल्याचे खोटे आरोप केले होते. तो दिवसभर दुचाकी गॅरेजवर काम करतो. त्यानंतर वेगवेगळ्या साथीदारांसह जळगाव शहरात फोनवर बोलत असणा-या नागरीकांचे मोबाईल मोटारसायकलवर येऊन जबरीने हिसकावुन चोरुन घेऊन जात होता. त्याच्याकडून बरेच गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. अटकेतील तिघांना पुढील तपासकामी जिल्हापेठ पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आलेले आहे.

पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अमोल देवढे, स.फौ.अशोक महाजन, पोहेकॉ विजयसिंग पाटील, पोहेकॉ सुधाकर अंभोरे, पोहेकॉ गोरख बागुल, पोना बैसाने, पोना विजय शामराव पाटील, पोना राहुल पाटील, पोना प्रितम पाटील, पोकॉ पंकज शिदे, पोकॉ दिपक शिंदे, पोकॉ हेमंत पाटील आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here