जळगाव दि.5 प्रतिनिधी – स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूर व स्व. वसंतराव चांदोरकर स्मृति प्रतिष्ठान, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. ९ जानेवारी २०२२ रोजी खुल्या राष्ट्रीय रांगोळी स्पर्धेचे आयोजन सकाळी ८ ते ११ या वेळेत बालगंधर्व खुले नाट्यगृह येथे आयोजित करण्यात आले आहे. या स्पर्धेचे आयोजन संस्कृती मंत्रालयाच्या अंतर्गत दक्षिण-मध्य सांस्कृतिक केंद्र व स्व. वसंतराव चांदोरकर स्मृति प्रतिष्ठान करीत आहे. सदर स्पर्धेला राष्ट्रीय स्तरावर सुमारे ६ लाख रुपयांची बक्षिसे दिली जाणार असून प्रत्येक स्पर्धकास संस्कृती मंत्रालयातर्फे सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या स्पर्धेचे नियम व अटी खालील प्रमाणे आहेत
१. रांगोळी काढण्यासाठी तीन तासांचा अवधी असेल.
२. प्रत्येक स्पर्धकास ऑनलाईन नोंदणी (E – Registration) आवश्यक आहे. यासाठी स्वतः चा मोबाईल सोबत आणावा लागेल. बाकीची तांत्रिक मदत प्रतिष्ठान कडून मिळेल.
३. नोंदणी झाल्यावर तीन तासात आपली रांगोळी (ठिपक्या ठिपक्यांची, संस्कारभारती प्रमाणे, पोर्ट्रेट, गालिचा) पूर्ण करून रांगोळी काढतांनाचा फोटो व रांगोळी झाल्यावर रांगोळी सोबतचा फोटो काढून हे फोटो मिनीस्ट्रीच्या वेबसाईटवर अपलोड करायची आहे. (यासाठी प्रतिष्ठानतर्फे तांत्रिक मदत मिळेल)
४. रांगोळी काढण्यापूर्वी कोणत्याही प्रकारचे खडूने स्केच करणे किंवा दोरीच्या साह्याने गोल काढणे यासाठी परवानगी नाही.
५. रांगोळी काढण्यासाठी चार फूट बाय चार फूट (४’ x ४’) चौकोन आपल्याला मिळेल.
६. आपण काढत असलेल्या रांगोळीला लागणारे सर्व सामान व विविध रंगाच्या रांगोळ्या स्पर्धकाने स्वतःच्या खर्चाने आणायच्या आहेत.
७. स्पर्धेच्या दरम्यान शासनाने कोविड – १९ च्या संदर्भातील मार्गदर्शक तत्त्वानुसार या स्पर्धेचे आयोजन होईल त्यामुळे हात धुवून, सॅनिटाईज करणे, मास्क वापरणे व सुरक्षित अंतर ठेवणे हे सर्व स्पर्धकांवर बंधनकारक राहील. (स्पर्धेसाठी परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल) तरी जळगावच्या तमाम रांगोळी कलाकारांना दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र व स्व. वसंतराव चांदोरकर स्मृति प्रतिष्ठान च्या वतीने आवाहन करण्यात येते की जास्तीत जास्त स्पर्धेत स्पर्धकांनी या संधीचा लाभ घ्यावा व स्पर्धेत भाग घेण्यासाठी दिपक चांदोरकर मो. 9422778911 यांच्याशी संपर्क साधावा.