राम मंदीर-कोरोना आणि शरद पवारांचा “मार्मिक टोला”

महाराष्ट्रात गेल्या तिन चार महिन्यांपासून जोर पकडून असलेला कोरोना नियंत्रणात कसा आणि कधी येणार? याची जनतेला चिंता आहे. रोज कोरोनाच्या नव्या बातम्यांच्या पाऊस पडतो. राज्यातील महाविकास आघाडी सरकार मधील जितेंद्र आव्हाड, अशोक चव्हाण अशा काही मंत्री व आमदारांनाही कोरोनाची बाधा झाली. देवेंद्र फडणवीस यांनी तर आपणास कोरोनाबाधा झाल्यास सरकारी दवाखान्यात दाखल करण्याचा संदेश माजी मंत्री आणि संकटमोचक गिरीशभाऊ महाजन यांना जाहिरपणे दिला.

त्यामुळे कोरोनाचे राजकीय रंग दिसले. अलिकडेच मात्र कोरोनाच्या अस्तित्वावरुन वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आणि काही शास्त्रज्ञ यांनी उलट सुलट दावे केले. मधेच कोरोना हा एक पैसे कमावण्याचा  धंदा होवून बसल्याचा आणि या सोनेरी संधीत खासगी हॉस्पीटल चालक लाखो रुपयांची बिले आकारत असल्याची जोरदार टीका झाली. तसेच काही बड्या हॉस्पीटल्सनी लुटालुट चालवल्याच्या ब-याच कथा बाहेर आल्या.

एका रिक्षाचालकाच्या नातेवाईकाचे आठ लाख रुपयांचे बिल काढून पैसे भरल्याशिवाय मृतदेह रोखून धरण्याचे प्रकरण समोर आले. यावेळी शिवसेना नेते नितीन नांदगावकर यांनी हॉस्पीटलमधे धाव घेत आठ लाख रुपयांचे बिल कसे काढले याचे डीटेल्स मागत लुट असल्याची तक्रार करत राडा केला. दोनच दिवसांनी शिवसेना नेते नांदगावकरांना धमक्यांचे फोन आले. कोरोनाच्या कथित गाजलेल्या संकटाचे भिती युक्त बलून फुटून काही विशीष्ट प्रकारच्या गैरप्रकारांवर नवे प्रकाशझोत पडू लागल्याने कोरोनाचा अजगरी विळखा सुटून पकड ढिली पडली.

लागलीच कथित महानायक अमिताभ यांची फॅमिली म्हणजे ते स्वत: – पुत्र व सुन तिघे नानावटी हॉस्पीटलमधे दाखल झाले. हॉस्पीटलमधे अ‍ॅडमिट होण्यापुर्वीच अमिताभ यांनी या कथित वादग्रस्त हॉस्पीटलचे डॉक्टर्स, कर्मचारी  यांच्या तारिफचे पुल बांधले. त्यामुळे “दाल मे कुछ काला” जरुर है असा संदेशही जनतेत गेला. नाही तरी केवळ पैसा कमावण्यासाठीच दुस-याने लिहिलेल्या स्क्रिप्टवर हुकुम अभिनय करणारे सिने अभिनेते केवळ करमणूकीची साधने असल्याचे पुन्हा एकवार समोर आले.

महाराष्ट्रात वरील प्रमाणे अनेक प्रसंगांनी वातावरण ढवळून निघाले असतांना अयोध्येत बहुप्रतिक्षित प्रभू श्रीराम मंदीर उभारणीचा मुहुर्त जाहीर झाला. राममंदीराच्या निर्माण कामाचे भुमीपुजन पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या शुभहस्ते ऑगस्टच्या पहिल्या सप्ताहात होणार असल्याचे जाहीर झाले. प्रभू श्रीराम मंदीर उभारणीचा मुहुर्त घोषित झाल्याचे समस्त हिंदू जन हर्षभरीत झाले असतील. तथापी कोरोना संकट कायम असतांनाच देशाचे नेते माजी संरक्षण – कृषी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी केवळ मंदीर उभारुन कोरोना कसा जाणार?

आधी कोरोना हटवायचा की मंदीर उभारायचे? असे प्रश्न उपस्थित केले. मंदीर उभारणी हा भाजपाचा घोषित कार्यक्रम असला तरी येत्या 5 ऑगस्टला अयोध्येत होणा-या राम मंदीर भुमीपूजनास महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे उपस्थित राहणार किंवा नाही यावर वाद माजला आहे. खरे तर भाजप आणि शिवसेना हे दोघे हिंदुत्ववादी पक्ष आहेत.

हिंदुत्वाच्या अजेंड्यावर दोघांकडून समान हक्क सांगितला जातो. त्यातही राज्यातल्या महाविकास आघाडीत सामिल झालेली शिवसेना तिन्ही राजकीय पक्षाच्या “कॉमन” समविचारी अजेंड्यावर एकत्रीत आली आहे. तथापी भाजपाने आता राममंदीर उभारणीची तारीख जाहीर करुन एका दगडात अनेक पक्षी मारले. त्याच शैलीत मुत्सद्दी राजकारणी नेते शरद पवार यांनी मंदीर बांधून कोरोना संपणार काय?

असा मार्मिक टोला भाजपासह शिवसेनेला देखील अप्रत्यक्ष लगावला आहे. एकट्या शिवसेनेचे अयोध्या प्रेम कितीही असले तरी महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून उद्धवजी ठाकरे मोठी जबाबदारी निभवत असतांना त्यांना अयोध्यावारी कशी शक्य आहे? असा पेच शरद पवारांनी टाकल्याचे दिसते. अयोध्येच्या रामाला कुणी वंदन करायला जात असेल तर त्यास कुणाचा विरोध असण्याचे कारण दिसत नाही.

तथापी कॉंग्रेसी आघाडीची राज्ये गिळंकृत करायला निघालेल्या भाजपाने घोषित केलेल्या राममंदीर भुमीपुजनासह “मंदीर कार्ड” खेळणा-यांना रा.कॉ. ने “मार्मीक टोला” हाणलेला दिसतो. त्यावर पुढच्या राजकीय रंगमंच कसा लागतो? कोरोनाचे काय होणार हे ऑगस्टच्या मध्य किंवा अंतिम चरणात स्पष्ट होईल.

सुभाष वाघ(पत्रकार) जळगाव

8805667750

jain-advt