झोपी गेलेले अण्णा जागे झाले

महाराष्ट्राचे कधीकाळचे महापुरुष अण्णा हजारे यांचे नुकतेच टीव्ही वर दर्शन झाले. मीडियाने त्यांना शोधून काढले. अण्णा बारा वर्षांनी जागे झाल्याचे दिसले. त्यांचा सर्वांना आनंद व्हायलाच हवा. कुणी म्हणतात ते बारा वर्ष झोपी गेले, पण हे ठीक वाटत नाही. रस्त्यात पडलेला दगडही कामाचा असतो असं म्हणतात ते उगाच नव्हे. अण्णा हजारे हे तर नसानसात भ्रष्टाचारविरोध भरलेले. त्यांनी महाराष्ट्रात भ्रष्टाचारी मंत्र्यांना सळो की पळो केले. माहिती अधिकार कायदा आणला पण त्याकाळी काही सत्तारुढ राजकारण्यांना त्यांचे काम अडथळा वाटले. त्यांना “वाकड्या तोंडाचा गांधी” अशीही उपाधी देण्यात आली. वाकड्या तोंडाचा का असेना पण गांधी तर म्हटले.

कधीकाळी सन 1920 नंतर देशाच्या राजकीय पटलावर आलेल्या महात्मा गांधी यांनी ब्रिटिश सत्तेला आव्हाने दिली. तशीच अण्णा हजारे यांनी महाराष्ट्रात भ्रष्टाचा-यांना, सत्ताधीश मंत्र्यांना दिली. तेव्हा अण्णा म्हणजे भ्रष्टाचारमुक्त एनओसी प्रमाणपत्र देणारी बिन सरकारी एजन्सी आहे काय अशी टीका झाली होती? पण सन 2011 – 12 मध्ये अण्णांनी काँग्रेसच्या भ्रष्टाचाराविरुद्ध लोकपालाच्या कक्षेत पंतप्रधानांचाही भ्रष्टाचार आणा म्हणत दिल्लीत आंदोलन केले. तेथे अरविंद केजरीवाल नामक युवक, किरण बेदी यांच्यासारखे अनेक जण अण्णांच्या आंदोलनात जाऊन मिळाले. केजरीवाल तेव्हा “इंडिया अगेन्सट करप्शन” आंदोलन चालवत होते. काँग्रेसच्या भ्रष्टाचारी राजवटीविरुद्ध तरुणांनी सत्तेत जावे असे अण्णा म्हणाले. किरण बेदी पुढे राज्यपाल बनल्या. केजरीवाल यांनी दिल्लीत भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध लढा पुकारला. ते मुख्यमंत्री बनले. अण्णांच्या आंदोलनाने कॉंग्रेसची सत्ता जाऊन भाजपाची सत्ता आली. अण्णाचा रोल संपला. ते घरी परतले.

काँग्रेसी राजवटीत अशाच प्रकारे व्यायामाचे महत्व सांगणारे काहीसे तिरळे योगगुरु बाबा रामदेव गाजले. पोलीस कारवाईत पळाले. विदेशी औषधांविरुद्ध स्वदेशीचा पुकारा करत भाजपच्या सत्तेत नवे दुकान थाटून बसले. पण अण्णांना आता प्रकाशझोतात आणून  केजरीवालांनाबाबत प्रश्न विचारला. मद्याला विरोध दर्शवत केजरीवाल यांनी चुक केली तर शिक्षा व्हायला हवी असे अण्णा बोलून गेले. अण्णांचे अगदी बरोबर आहे. काँग्रेसचे लोकच तेव्हा भ्रष्ट होते. आता भाजपची नवी मंडळी सत्तेत आली. महाराष्ट्रात 2019 मध्ये भाजपाला फाट्यावर मारुन शिवसेना काँग्रेस – राकाँसोबत जाऊन सत्तेत बसली. आता लोकसभा निवडणूक आहे. तत्पूर्वी ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय, नार्कोटिक्स ब्युरोद्वारा धाडी घालून भाजपविरोधी अनेकांवर समन्स बजावले. काहींना जेल दाखवली. काही कंपन्यांवर धाडी पडल्या.

अलीकडे इलेक्टोरल बॉन्ड म्हणजे निवडणूक चंदा (निधी) वसुली कांड गाजत आहे. 16,000 कोटींच्या या बॉंडमधून 7000 कोटी भाजपाकडे देणगी म्हणून आल्याचे सांगतात. ज्याच्यावर केंद्रीय यंत्रणांनी धाडी टाकल्या त्यांच्याकडून देणग्या घेऊन प्रकरणे बंद करण्यात आली. आता तर सुप्रीम कोर्टानेच इलेक्टोरल बॉंड घटनाविरोधी ठरवून कायदाही अवैध ठरवला. या महत्वाच्या विषयावर अण्णा हजारेंचे मत काय? हे त्यांनी जाहीर करुन जनतेच्या ज्ञानात भर घालावी असे काही नतद्रष्ट लोकांना वाटते. याच बॉंड प्रकरणात 100 कोटी देणगी मिळवण्याच्या प्रकरणात केजरीवाल ईडी कोठडीत आहेत. 6000 कोटी मिळवणा-यांचे काय? असे प्रश्न खासदार संजय राऊतांसारखे अनेकजण विचारत आहेत. अण्णांनी यावर बोलावे. इलेक्टोरल बॉंड प्रकरण दडपले जाईल असे लोक बोलतात. हे बॉंड अवैध तर बॉंडद्वारे धाडीच्या भीतीपोटी 16,000 कोटींची तरतूद करुन मिळवलेला हा पैसा रिझर्व बँकेतून घेणार का? बनवाबनवीचे माध्यम ठरलेल्या बॅंकांवर कारवाई होणार का?असे जनतेच्या मनात प्रश्न असल्याचे विश्लेषक म्हणतात ते खरे की खोटे?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here