फुटलेल्या पाइपलाइनमुळे पाण्याची नासाडी

जळगाव : पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी महामार्गालगत फुटली आहे. जलवाहिनी फुटल्यामुळे लाखो लिटर पाणी वाहून गेले आहे. नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे पाण्याची नासाडी झाली असून तातडीने दुरुस्ती झाली नाही तर पाचोरा काँग्रेस आंदोलनाच्या तयारीत असल्याचे तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी म्हटले आहे.

पाचोरा शहरातील नागरिकांना एकीकडे पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत असून दुसरीकडे प्रशासनाच्या बेजबाबदार कारभारामुळे जारगाव येथे जणू काही पाण्याचा जिवंत झरा वाहत असल्याचे चित्र दिसत आहे. लाखो लिटर पाण्याच्या नासाडीला जबाबदार कोण असा संतप्त सवाल करत कॉंग्रेस आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. जारगाव शहरातील सिंधी कॉलनी, कृष्णापुरी भागात पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी जारगांव शिवारात हायवे लगत फुटली आहे. या पाईपलाईनद्वारे सिंधी कॉलनीच्या जलकुंभाला पाण्याचा पुरवठा होतो. तेव्हा मोठ्या प्रमाणावर पाणी वाहून सरळ जारगाव येथील नुराणी नगर परीसरातील नागरिकांनाच्या दुकानात आणि घरात जाते. गल्लीतील हे पाणी पुन्हा हिवरा नदी पात्रात जात आहे. स्थानिक नागरिकांनी पाचोरा नगर परिषदेला तक्रार केली. मात्र संबंधित कर्मचाऱ्यांनी याच ठिकाणी भलामोठा विस फुटाचा खड्डा करुन काम अर्धवट सोडून दिले आहे. त्यामुळे लहान मुलांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे.

याबाबत माहिती मिळताच कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी घटनास्थळाला भेट दिली. यावेळी ग्रामस्थांनी अतिशय संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे पाणी पुरवठा बंद झाल्यावर खड्डय़ातील घाणीचे पाणी पुन्हा पाईपलाईन मध्ये जाते आणि तेच पाणी पुढे नवीन पाणी पुरवठा सुरु असतांना सिंधी कॉलनीच्या जलकुंभात जाते. या फुटलेल्या पाईपलाईनच्या जागेवर वीज पुरवठा करणारे दोन पोल आहेत. ते कधीही खाली कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पाचोरा नगर परिषदेने याप्रकरणी गंभीर दखल घेण्याची मागणी होत आहे. अन्यथा कॉंग्रेस आंदोलन करेल असे सचिन सोमवंशी यांनी म्हटले आहे. तसे निवेदन न. पा. प्रशासनाला दिले जाणार आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here