वकिलाला मारहाण व लुट करणा-या दोघांना सक्तमजुरी 

बीड : खासगी वाहनाने औरंगाबादकडे जाणा-या वकिलास वाटेत मारहाण व लुट करणा-या दोघांना पाच वर्ष सक्तमजुरी व एक हजार रुपयांच्या द्रव्यदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सन 2008 मधे घडलेल्या या घटनेप्रकरणी दुसरे अतिरिक्त सत्र न्या. सी. एम. बागल यांनी हा निकाल दिला आहे.

औरंगाबाद खंडपीठात वकीली करणारे अ‍ॅड. बसवराज रामलिंगअप्पा सोनटक्के (रा. औरंगाबाद) हे 4 नोव्हेंबर 2008 रोजी उस्मानाबाद जिल्ह्यातील हसेगाव येथे गेले होते. त्यानंतर 6 नोव्हेंबर 2008 रोजी ते कामकाज आटोपून औरंगाबादला परतीच्या प्रवासाला जाण्यासाठी बिड बस स्थानकावर आले होते. त्यावेळी ते बसची वाट बघत असतांना एक खासगी वाहनचालक त्यांच्याजवळ आला. त्याने अ‍ॅड. सोनटक्के यांना औरंगाबाद येथे घेऊन जाण्याची तयारी दाखवली. त्यामुळे बसची जास्त वेळ वाट न बघता त्यांनी खासगी वाहनाने प्रवास सुरु केला. वाटेत गेवराई तालुक्यातील हिरापूरनजीक वाहन चालकासह इतरांनी त्यांना मारहाण करत त्यांच्याजवळ असलेला ऐवज लुटला. त्यात सोन्याची अंगठी, रोख 3 हजार 700 रुपये, घड्याळ व मोबाईल या वस्तूंचा समावेश होता. गेवराई पोलिस स्टेशनला या घटनेप्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. पोलिसांनी तपासाअंती गीताराम जाधव, सूर्यकांत कावळे, शेख हुजूर शेख बुऱ्हाण, सखाराम गायकवाड (रा. संगम जळगाव, ता. गेवराई), नामदेव गायकवाड (रा. कुरण, जि. जालना) आदींना ताब्यात घेत अटक केली. दरम्यान नंदू कावळे व संतोष भापकर हे फरार झाले होते. सरकार पक्षाच्या वतीने या घटनेप्रकरणी एकुण नऊ साक्षीदारांची तपासणी करण्यात आली.  सुनावणीच्या कालावधीत आरोपी सखाराम गायकवाड याचे निधन झाले. सहायक सरकारी वकील अ‍ॅड. राम बिरंगळ यांनी या प्रकरणी यशस्वी युक्तिवाद पुर्ण केला. दुसरे अतिरिक्त सत्र न्या. सी. एम. बागल यांनी या आरोपी गीताराम जाधव, सूर्यकांत कावळे यांना दोषी ठरवत त्यांना पाच वर्ष सक्तमजुरी आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here