राज ठाकरे नेमके कोणाला भारी पडणार?

महाराष्ट्राच्या राजकारणात हिंदुत्वाचा झेंडा हाती घेऊन अयोध्यावारी घोषित करणाऱ्या राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यावरुन 3 मे 2022 या तारखेचा अल्टिमेटम देऊन खळबळ उडवून दिली आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या या इशा-याचे काही परिणाम समोर येत आहेत. मुंबईत म्हणे 72 टक्के भोंगे उतरवण्यात आले. तत्पूर्वी केवळ गैर भाजपा सत्तेच्या राज्यातच भोंग्यांचे राजकारण का? फडणवीस राजवटीत हे भोंगे दिसले नाहीत का? असे प्रश्न उपस्थित करण्यात आले. त्यावर लागलीच उत्तर प्रदेश योगी सरकारही भोंग्यांविरुद्ध ॲक्शन मोडमध्ये येत असल्याचे दिसले. खरेतर गेल्या काही महिन्यांपासून शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील मवीआ सरकार अस्थिर करुन पाडण्याचे केंद्र सरकारवर आरोपांचे बाण चालवले. केंद्रीय यंत्रणांचा महाराष्ट्र कधी नव्हे एवढा हस्तक्षेप आता वाढला असा आरोप रा.कॉ. अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अनेकांनी केला. मविआ सरकारचे दोन मंत्री अनिल देशमुख (165 दिवस), नवाब मलिक (50 दिवस) अटकेत टाकून देखील अपेक्षित परिणाम दिसत नसल्याने भाजपने राज ठाकरे यांच्या “मनसे”ची सेवा “हायर” केल्याचे बोलले जात आहे त्यामागची कारणमिमांसा महत्त्वाची.

सिने-अभिनेता सुशांतसिंग राजपूत याची रहस्यमय आत्महत्या, मनसुख हिरेन हत्या, क्रुझ ड्रग्ज प्रकरणातील पंच प्रभाकर साहिल याचा कथित संशयास्पद मृत्यू, परमवीर-वाझे प्रकरणापासून महाराष्ट्रातील केंद्रीय यंत्रणा सीबीआय, ईडी, एनसीबी, एनआयए यांचा तंबू ठोकला गेल्याचे चित्र निर्माण झाले. त्याद्वारे राष्ट्रवादी काँग्रेस – शिवसेनेचे आघाडीचे म्होरके जेरबंद करत दोघांचे तंबू उतरवण्याचा प्रयत्न झाल्याचे बोलले गेले. भरीस भर म्हणून केंद्रीय मंत्री नारायण राणे – माजी खा. किरीट सोमय्यांच्या तोफांचा मारा झाला. परिणामी रा.कॉ. आणि शिवसेना यांची मैत्री घट्ट बनल्याचे चित्र निर्माण झाले. जोडीला काँग्रेसकडूनही केंद्रावर हल्ले करण्याचा प्रयत्न झाला. याच भाऊगर्दीत केंद्रीय भाजपाई नेतृत्वाला पर्याय म्हणून यूपीएचे नेतृत्व शरद पवार यांनी करावे अशी हवा सोडण्यात आली. त्याला प्रत्युत्तर म्हणून ईडीच्या कारवाईची शिवसेना नेत्यांना जोरदार धडक बसली. थेट मातोश्रींच्या दारावर ठकठक करुन झाली. दस्तुरखुद्द शरद पवार हे दिल्लीवारी करुन मोदीजींना भेटले.

दरम्यान महाराष्ट्राच्या राजकारणावर “लक्ष” साधून असलेल्या केंद्रीय नेतृत्वाने शिवसेनेसह मविआला धडा शिकवण्यासाठी बहुदा मनसेला जवळ करण्याचा निर्णय घेतला असावा. मनसे प्रमुख राज ठाकरे गत दोन वर्षाहून अस्तित्वाची लढाई लढत आहेत. त्यांनी त्यांच्या इंजिन ची दिशा बदलून पाहिली. पक्षाचा झेंडा बदलला. भगवा झेंडा स्वीकारला. तत्पूर्वीच्या ईडीच्या प्रेमळ समन्सनंतर त्यांची केंद्र विरोधाची भूमिका गळून पडली. भाजप समर्थक हिंदुत्वाकडे निघालेला नवा जननायक असा स्वतःचा नवा कायाकल्प करुन ते पुढे निघाले आहेत.

खरे तर भाजप सारख्या बलाढ्य राजकीय पक्षाला राज ठाकरे यांच्यासारख्या नेत्याची गरज का भासावी? हा कळीचा प्रश्न आहे. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा बुद्धिमान नेता कमजोर वाटू लागला काय? असाही प्रश्न राजकारण्यांच्या काही गटात विचारला जातो असे म्हणतात. तसे असल्यामुळेच “राडे”बाज मनसे नेत्याला भाजपने आता मैदानात उतरवल्याचे बोलले जाते. तसे पाहिले तर भाजपा हा सभ्य महाजनांचा पक्ष. हिंदुत्व विचारांचा वाहक. फडणवीसी सभ्यता उद्दिष्टपूर्तीत व्यत्यय आणते अशा विचाराने मनसेला “आत” घेऊन शिवसेनेला बाहेरचा रस्ता दाखवण्याची ही खेळी म्हटली जाते. सुमारे 50 हजार कोटींच्या बजेटची मुंबई मनपाची सत्ता शिवसेनेच्या हातून खेचण्याचा पहिला डाव दिसतो. गेल्या 25 वर्षापासून मुंबई मनपात शिवसेना सत्ता गाजवत आहे. शिवसेनेची आर्थिक रसद तोडण्याच्या खेळात भाजपा आता मनसेसोबत युती करुन त्या निवडणुका लढवेल असे बोलले जाते. त्याचा पहिला जोरदार फटका शिवसेनेला बसू शकतो. गेल्या वेळेस भाजपसोबतची युती तोडून मनपात शिवसेना स्वतंत्र लढली तरी भाजपनेही जोरदार टक्कर दिली होती. शिवसेनेपेक्षा दोन – चार जागा कमी पडल्या. आता ती कसर मनसे भरुन काढू शकते. काही महिन्यांपासून “मुंबई आमचीच” अशी गर्जना करणारी शिवसेना आता मात्र बॅकफूटवर येऊ शकते. केवळ आम्हीच लढवू – आम्हीच जिंकू आणि 50 हजार कोटींची ढेप स्वत:कडे ठेवू असे म्हणणार्‍यांची भूमिका कशी बदलते ते पाहणे महत्त्वाचे राहील.

राज ठाकरे भाजपचाच अजेंडा राबवत असल्याचे म्हटले गेले. परंतु राज यांनी भगव्यासह हिंदुत्वाचा झेंडाही आपल्याच हाती असल्याची गर्जना केली आहे. शिवसेनेच्या हिंदुत्वाचा दावा “हायजॅक” करण्यासाठी राज यांनी “भगवे उपरणे” परिधान करीत सेनाप्रमुखांची कॉपी करण्याचा प्रयत्न चालवल्याचे बोलले जाते. मशिदीवरील भोग्यांवरुन राज ठाकरे यांच्या कथित “अल्टिमेटम”ने राज्याच्या राजकारणासह सामाजिक अस्वस्थेत भर पडल्याचे बोलले जाते. दिल्लीत नुकत्याच जहांगिरपुरा भागात झालेल्या दंगलीचा मास्टरमाईंड म्हणून कोणी अन्सार याचे नाव पुढे येत आहे. तो भाजपचा पदाधिकारी असल्याचे सांगितले जाते. केंद्राला महाराष्ट्राचीही सत्ता हवी हे आता लपून राहिलेले नाही. मविआने आतापर्यंत सर्व डाव उलटवले आहेत. भाजपचा खुला अजेंडा असला तरी त्यासाठी शरद पवारांच्या राजकारणावर हल्ले करण्यासाठी राज ठाकरेच हवेत हेही आता अधोरेखित झाले आहे.

भोंग्याचा मुद्दा घेऊन राज ठाकरे ज्या वेगाने हिंदुत्वाचा मुद्दा गाजवत आहेत ते पाहता आता ते भाजपला तर वरचढ ठरणार नाहीत ना? असाही प्रश्न काहींच्या मनात पिंगा घालू लागला आहे. भाजपचे सॉफ्ट हिंदूत्व विरुद्ध शिवसेना राज यांचे हार्ड हिंदुत्व अशीही चर्चा होऊ लागली आहे. राज ठाकरे यांची “मनसे” अयोध्यावारी करणार असली तरी त्यांचा “रोल” मर्यादित करण्याची खेळी नजीकच्या काळात होईल असे बोलले जाते.

महाराष्ट्राच्या आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीतून शिवसेनेचे राजकारण हद्दपार करण्याची केंद्राची खेळी दिसते असे बोलले जाते. नारायण राणे यांनी सरकार पडण्याचा मुहूर्त जून महिन्याचा दिला आहे. त्यासाठी महाराष्ट्रीय जनतेच्या बुद्धीभेदासाठी “हाका-यांची फौज” सोशल मीडियावर धिंगाणा घालून आहे. त्यांच्या “पोटापाण्याची” सोय झाली याचा आनंद आहे. तिकडे उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाने असेच भोंगे वाटून सध्याच्या महागाई,  बेरोजगारी प्रश्नावर आवाज उठवण्याचा प्रयत्न चालवला आहे. भोंग्याचे राजकारण धार्मिक की सामाजिक? जनतेला भावनेच्या लाटेवर स्वार करुन सत्तेवर जायचे की त्यांच्या जगण्याचे प्रश्न सोडवून? यावर अधिक विचारमंथन व्हावे एवढीच अपेक्षा.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here