फैजपूरच्या शौचालयास उद्घाटनाची प्रतिक्षा!— कधी संपणार आहे जनतेच्या संयमाची परिक्षा?

जळगाव : स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत फैजपूर शहरातील आठवडे बाजार परिसरात शौचालयाचे बांधकाम करण्यात आले आहे. नगरपालिकेच्या माध्यमातून सदर बांधकाम पुर्ण झाले असून सद्यस्थितीत ते कुलूपबंद अवस्थेत पडून आहे. जनतेकडून जमा झालेल्या कररुपी रकमेतून लाखो रुपये खर्च करुन हे शौचालय बांधण्यात आले आहे. दर बुधवारी आठवडे बाजारात येणा-या नागरिकांची आणि परिसरातील गाळेधारकांची शौचालयासह मलमुत्र विसर्जनाची सोय व्हावी या उदात्त हेतूने सर्व सोयींनी युक्त अशा या शौचालयाची निर्मीती करण्यात आली आहे. हे शौचालय पुर्ण होऊन जवळपास दोन वर्षाचा कालावधी उलटला आहे. आजही कॅलेंडरच्या तारखा उलटत आहेत. मात्र या शौचालयाचे ना उद्घाटन झाले ना ते जनतेसाठी खुले झाले.

त्यामुळे नाईलाजाने पुरुषांना एखाद्या ट्रकचा आडोसा घेऊन मलमुत्र विसर्जनाचे काम करावे लागते. महिला असल्यास मोठ्या प्रमाणात गैरसोय होते. शौचालयासाठी उघड्यावर अथवा बरेच अंतर कापून बस स्थानकावर जाण्याशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे स्वच्छ भारत अभियानाचा फैजपूर शहरात फज्जा उडाल्याचे चित्र दिसून येत आहे. सुमारे 25 ते 30 लाख रुपये खर्च करुन बांधलेल्या या शौचालयाचा उपयोगच होत नसेल तर हे लाखो रुपये पाण्यात गेल्याचे लोक आता खुलेआम बोलू लागले आहेत. सदर शौचालय एकतर जनतेसाठी खुले करावे अन्यथा उघड्यावर शौचालयास जाण्याची नगरपालिकेने रितसर परवानगी द्यावी असे देखील लोक आता उघडपणे बोलू लागले आहेत. फैजपूर नगर पालिकेच्या आरोग्य विभागाकडून या बांधकामासाठी जवळपास पूर्ण साहित्य पुरवले असल्याचे सांगण्यात येते. धुळखात पडलेल्या या शौचालयामुळे फैजपूर नगरपालिकेच्या आरोग्य विभागावर जनतेकडून विविध आरोप केले जात आहे. सदर आरोप नगरपालिका प्रशासन गेंड्याच्या कातडीप्रमाणे किती दिवस सहन करणार असा देखील गहन प्रश्न फैजपूरवासीय विचारत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here