बेपत्ता मजुराचा घातपात? दोघा संशयितांना अटक

जळगाव : गेल्या दिड महिन्यापासून बेपत्ता मजुराला पळवून नेऊन डांबून ठेवल्याचा अथवा त्याचा घातपात झाल्याच्या संशयातून दोघांना अटक करण्यात आली आहे. बेपत्ता मजुराच्या पत्नीने या प्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल केली आहे. सदर फिर्यादीनुसार अटकेतील दोघांना आज न्यायालयात हजर करण्यात आले. दोघा संशयीतांना 11 जून पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. भिकन शामसिंग परदेशी आणि विठ्ठल प्रेमसिंग परदेशी दोन्ही रा. रायपुर, ता जि जळगाव अशी अटकेतील दोघांची नावे आहेत.

आशा भुषण तळेले रा. रायपूर – जळगाव या महिलेचा पती भुषण तळेले हा 17 एप्रिल 2022 रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास दुचाकीने भुसावळ येथे मोटार सायकलवर गेला होता. जातांना त्याने मोबाईल सोबत नेला होता. त्यानंतर भुषण तळेले हा तरुण घरी परत आला नाही तसेच त्याचा मोबाईल देखील लागला नाही. नातेवाईकानी सर्वत्र शोध घेऊन देखील तपास लागला नाही. त्यानंतर त्याची मोटार सायकल रायपूर कुसुंबा परिसरात पडलेली आढळून आली. जवळच गाडीची चावी देखील पडलेली होती. त्या चावीने डिक्की उघडून पाहिली असता त्यात मोबाईल आढळून आला.

बेपत्ता भुषण तळेले हा भिकन परदेशी या ठेकेदारकडे कामाला जात होता. ठेकेदार भिकन परदेशी हा वेळोवेळी बेपत्ता भुषण तळेले याच्या पत्नीकडे येऊन सांगत होता की मी तुझ्या पतीला शोधून आणतो. तु घर सोडून कुठेही जाऊ नको. तुझा पती परत आणून देण्याची जबाबदारी माझी आहे. तु जर माझे ऐकले नाही तर मी गळफास घेऊन आत्महत्या करुन घेईन. भिकन परदेशी प्रमाणेच विठ्ठल परदेशी हा देखील महिलेला तिच्या बेपत्ता पतीबद्दल विविध प्रकारची माहिती देत असल्याने महिला गोंधळून गेली आहे. या दोघांना बेपत्ता पतीची माहिती असून ते दिशाभुल करत असल्याचा दाट संशय व्यक्त केला जात आहे. भुषण तळेले या बेपत्ता मजुराचा घातपात झाला असण्याची शक्यता पडताळणी सुरु असून अटकेतील दोघांची सखोल चौकशी सुरु आहे. पो.नि. प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक अनिस शेख, गफ्फार तडवी, रतीलाल पवार आणि सिद्धेश्वर डापकर पुढील तपास करत आहेत. अटकेतील दोघांना 11 जून पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here