अवैध लाकुडतोड आणि वाहतुकीवर चाळीसगावला कारवाई

जळगाव : विनापरवाना लाकुडतोड आणि तोडलेल्या लाकडांची ट्रॅक्टरद्वारे अवैध वाहतुक चाळीसगाव ग्रामीण पोलिसांच्या पथकाने रोखली आहे. पुढील कारवाईकामी लाकडांनी भरलेले ट्रॅक्टर आणि चालकास वन विभागाच्या सुपुर्द करण्यात आले आहे.

चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनचे पो.नि. संजय ठेंगे यांच्या पथकातील कर्मचारी पोलिस नाईक गोवर्धन बोरसे, शांताराम पवार, संदीप पाटील, जयंत सपकाळे असे वाघळी शिवारात गस्त घालत होते. दरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने वडाळा वडाळी ते वाघळी दरम्यान लाकडाने भरुन जात असलेल्या एमएच 19 बीजी 5372 या क्रमांकाच्या ट्रॅक्टरला अडवले. या ट्रॅक्टर चालकाकडे लाकुडतोडीचा परवाना आहे काय अशी विचारणा करण्यात आली. मात्र त्याच्याकडे कोणताही परवाना नसल्याम्ळे त्याला पोलिस स्टेशनला आणले गेले. अलताफ अली नवाब अली असे ट्रॅक्टर चालकाचे तर गुलाब बंडू शिरसाठ रा. वाघळी असे ट्रॅक्टर मालकाचे नाव असल्याचे उघड झाले आहे. पुढील कारवाई कामी त्यांना वनाविभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here