तुटेल इतकं रबर ताणू नये असे म्हणतात. पण महाराष्ट्रात महाराष्ट्रातील महा विकास आघाडीची सत्ता संपवण्यासाठी शिवसेनेचाच मोहरा वापरुन शिवसेनेलाच हायजॅक करण्याच्या वरवर दिसणाऱ्या प्रयोगात रोज नवी वळणे येत आहेत. राज्यातील मराठी माणसाचे हितरक्षण करण्याच्या नावाने बाळासाहेब ठाकरे यांनी काढलेली शिवसेना आता मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात भाजपसोबत सत्तेचे नवे समीकरण घेऊन सत्तारुढ होतांना दिसत आहे. स्वतःला बाळासाहेबांचे सच्चे शिवसैनिक म्हणवणाऱ्या एकनाथ शिंदे गट आणि त्यांना जाऊन मिळालेले 41आमदार यांच्या कालपरवाच्या बंडखोरी नाट्यात आता अधिकृतपणे भाजपची एन्ट्री झाली आहे. शिवसेना प्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सोबत सावलीसारखे राहणाऱ्या कानभरु कंपूशाहीच्या दहशतवादी कारनाम्यांच्या दर्दभऱ्या कहाण्या पेश होत आहेत.
भाजपासोबत सत्तेत येऊ घातलेल्या शिंदे गटाला राज्यात 8 कॅबिनेट, 5 राज्यमंत्रीपदे शिवाय केंद्रीय सत्तेत दोन मंत्रीपदे अशी ऑफर भाजपने दिल्याचे चॅनल्सचे वर्तमान आहे. शिवसेनेची सारी संघटनशक्ती, सत्तेवर जाऊन पोहोचलेली मंत्री पातळीवरील यंत्रणा डोईजड होऊ नये म्हणून नेतृत्वाने दबंगगिरी करत कसे छळले हे सांगत जनतेची सहानुभूती मिळवण्याचा शिंदे गटाचा पहिला आवेश संपला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही भावनिक साद घालून हातून निसटू पाहणारी सत्ता वाचण्याचा शेवटचा का होईना प्रयत्न करुन पाहिलाच. शिवसेनेचा गड असा पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळू लागल्याच्या क्षणातच उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदी बसवणार्या रा.कॉ. अध्यक्ष शरद पवार यांची “प्रसंगी आम्ही विरोधात बसू” ही मार्मिक पहिली प्रतिक्रिया बरेच काही सांगून जाणारी आहे. कारण नाही – नाही म्हणत भाजपसोबत पंचवीस वर्षे सत्तेत राहून शिवसेना सडली – हा कालखंड वाया गेला असे म्हणणाऱ्या शिवसेनेने भांडत तंटत उशिरा का होईना भाजपसोबत पाच वर्ष सत्ता उपभोगलीच. तेव्हा “शिवसेना हा सत्तेच्या ढेपेला चिकटून बसलेला मुंगळा” अशी टोकदार टीका शरद पवार यांनीच केली होती.
सन 2019 च्या निवडणुकीनंतर मात्र भाजपसोबत जाऊन मुख्यमंत्री पद मिळणे सुतराम शक्य नाही असे दिसताच शिवसेनेने संजय शिष्टाई द्वारे रा.कॉ.चे मुरब्बी नेते शरद पवार यांच्या चाणक्य नेतृत्वाखाली मविआत पित्याला मुख्यमंत्रीपद आणि पुत्राला कॅबिनेट मंत्री पदाची प्राप्ती करुन घेतली. ज्या वयात पदवी प्राप्त करुन पोटापाण्यासाठी नोकरी मिळावी म्हणून तरुण वणवण हिंडतात, प्रसंगी आत्महत्याही करतात त्याच वयातल्या ठाकरे पुत्राचे राजकीय लॉंचींग मंत्रीपदावर झाल्याने आनंदाचा डबल धमाका या कुटुंबात झाला असणार. कुणाचेही असे भरभरुन भले व्हावे यात आमच्याप्रमाणे अनेकांनाही दुसऱ्याचे भले होण्याची कामना करतात व आनंद वाटणारच असो.
ज्याप्रकारे शिवसेना सत्तेच्या गुळाच्या ढेपेला चिकटलेला मुंगळा असल्याचे तेव्हा पवारांना वाटले अगदी तसेच भाजपलाही सन 2019 पासून वाटत आले. आता रा.कॉ. फोडून फुटत नाही म्हटल्यावर सत्तेच्या ढेपेला चिकटलेला शिवसेना रुपी मुंगळा तेथून काढायचा तर सत्तेची गुळाची ढेपच का पळवू नये असा दूरदर्शी विचार करुनच दिल्लीच्या चाणक्यांनी शिवसेनेच्याच वजनदार “मोहरा”रुपी मुंगळ्याच्या पाठीवर देऊन ढेपच पळवून लावली. अशाप्रकारे हायजॅक केलेली शिवसेना आता शिंदे गटाची होऊ घातली आहे. परंतु काही राजकीय विश्लेषकांना हे नॅरेटीव्ह पचनी पडत नाही. शिंदे यांच्या कथित बंडखोरीचे स्क्रिप्ट बहुदा उद्धव ठाकरे यांनीच लिहिले असावे असे सोशल मीडियावरील काही संदेश सांगतात. मविआ सोबत जाऊन मुख्यमंत्रिपदाची महत्वकांक्षा पूर्ण झाली. पुत्राचे राजकीय लॉंचिंग झाले. शिवाय हिंदुत्वाचा जोरदार गजर भाजप-मनसे करत आहे. शिवाय मुंबई महापालिकेची 50 हजार कोटीची ढेप मविआ सत्तेतल्या भागीदारांना का द्यावी? या मनपाच्या 90 हजार कोटीच्या एफडीत नव्या पाहुण्यांना वाटा का द्यावा? राज्यात रोज भ्रष्टाचार बोकाळल्याच्या बातम्या, प्रकल्प नियोजनात टक्केवारी, प्रशासकीय मंजुरी, निधी मंजुरी उपलब्धीत टक्केवारीचा धुमाकूळ ठरलेला. समृद्धी महामार्ग, नवे आमदार निवास – मंत्रालय अशा हेवीवेट प्रोजेक्टची कंत्राटे, मॅनेजमेंट, कंत्राटांची हडपाहडपी करणारी मंत्री पातळीवरील मंडळी हिस्सा सोडत नाही आणि वाटतही नाही असे बोलले जाते. त्यामुळे गळ्यातले मविआचे लोढणे जड वाटू लागल्याने ते काढून फेकावे कसे? या सापळ्यात अडकलेल्यांना कुणी मोफत सुटकेचा मार्ग दाखवल्यास हवाच होता असे म्हटले जाते. यासंदर्भात रा.कॉ. नेते शरद पवार यांचे ताजे विधान महत्त्वाचे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोरीला कणखरपणे विरोध केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्या पाठीशी उभी राहील हे ते विधान. याचा दुसरा अर्थ मुख्यमंत्री बंडखोरांना कठोरपणे हाताळत नाही असा होतो. बंडखोरांसोबत दोन हात करत शस्त्रे उपसून उपसून लढण्याचे सोडून गोलमटोल भावनांच्या साखर पाकातील आवाहने काय कामाची? असा प्रश्न उभा करतात. याचा आणखी एक अर्थ शिंदे यांच्या खांद्यावर शिवसेनेचा भार देत हा पक्ष सत्तेबाहेर नेण्यासोबत उद्याच्या नव्या सत्तेत वाटा मिळवण्याची ही “गहरी चाल” तर नव्हे? असा संशय येण्यास बळकटी देणारी कृती आपला आतापर्यंतचा सहकारी पक्ष करतोय की काय? असे प्रश्न राजकारण्यांच्या आणि जनतेच्या मनात पिंगा घालत आहेत.
कधी या राजकीय पक्षात तर कधी त्या राजकीय पक्षात, तर कधी या आघाडीत – कधी त्या आघाडीत घुसून सत्ता मिळवून स्वतःच्या घरच्या तिजोरीची गंगाजळी, सत्तेची संपत्ती वाढवण्याचा मतलबी खेळ तर होत नाही ना असेच या सत्ता हस्तांतराच्या नवनाट्यावरुन वाटते. शेवटी महात्मा गांधीच काय म्हणाले त्यापेक्षा हिटलरच्या आत्मचरित्रात त्याने म्हटल्याप्रमाणे लोकशाहीत लोकांच्या हाती सत्ता कधीच नसते. ती असते ही व्यवस्था राबवणाऱ्या पुढाऱ्यांच्या, लोकप्रतिनिधींच्या हाती. हिटलरने पोलिसांकडून कायदेशीररीत्या जी कामे करुन घेणे शक्य नाही ती कामे करण्यासाठी “तुफानी सेना” काढली होती असे त्यांचे आत्मचरित्र सांगते. हुकूमशाही केव्हाही वाईटच. त्यावर लोकशाहीच्या गुळाचे पोते घोंगडे म्हणून पांघरले म्हणजे गोड वास येतो म्हणतात. तुम्हास काय वाटते?