विहीरीत कार कोसळल्याने आवाज आला फार—- ग्रामस्थ धावून आल्याने कुणीही झाले नाही ठार

मालेगाव : रात्रीच्या वेळी समोर आलेल्या कुत्र्यांच्या समुहाला वाचवण्याच्या प्रयत्नात कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने कारने गिरकी घेत ती सरळ खोल विहिरीत पडली. विहीरीत कार कोसळल्याने मोठा आवाज झाला. त्या आवाजाच्या दिशेने धाव घेत आलेल्या नागरिकांनी समयसूचकता दाखवत तात्काळ मदतकार्य सुरु केले. या मदतीमुळे आणि कारचे चारही दरवाजे बंद असल्यामुळे सुदैवाने कारमधील तिघांचे लाख मोलाचे प्राण वाचले.

मालेगाव – मनमाड रस्त्यावरील वऱ्हाणे गावाजवळ रविवारी रात्री नऊच्या सुमारास हा अपघाताचा थरार घडला. जीव वाचलेल्या कुणीही नजीकच्या तालुका पोलिसात तक्रार दिली नाही. मालेगाव येथील काकाणी नामक दाम्पत्य औरंगाबाद येथून मालेगावच्या दिशेने कारने येत होते. वाटेत कुत्र्यांचा समुह आडवा आल्याने चालकाने हँडब्रेक दाबताच वेगात असलेली कार गोलाकार गिरकी घेत विहिरीत कोसळली. कारच्या काचा बंद असल्याने पाणी आत आले नाही. दरम्यान ग्रामस्थ मदतीला धावून आले. नियतीचा आशिर्वाद आणि ग्रामस्थांची मदत एकाचवेळी जुळून आल्याने कारमधील तिघांना बचावाची संधी मिळाली.

कार कोसळताच ग्रामस्थांनी तात्काळ खाट आणून तिला दोर बांधून ती विहिरीत सोडली. कार चालकाने एक खिडकी उघडून सुरुवातीला महिलेला खाटेवर बसवले. क्षणाचाही वेळ वाया न घालवता ग्रामस्थांनी महिलेस तातडीने बाहेर काढले. त्यानंतर क्रमाक्रमाने चालक व महिलेचा पती यांना बाहेर काढण्यात आले. अकस्मात झालेल्या या घटनेने कारमधील तिघे प्रचंड भेदरले होते. “देव तारी त्याला कोण मारी” या म्हणीचा प्रत्यय यावेळी बचावलेल्यांसह सर्वांनाच आला. सकाळी कार देखील बाहेर काढण्यात आली.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here