आता 100 खोकी? आणि “तक्षका”य स्वाहा……..

महाराष्ट्राच्या राजकारणात “शिवसेनाय स्वाहा”चा खेळ आता भलताच रंगतोय. भ्रष्टाचाराच्या (कथित शंभर कोटी वसुली) मुद्द्यावरून ईडी आणि केंद्रीय यंत्रणांनी मागील सरकारचे गृहमंत्री देशमुख यांचेभोवती फास आवळला तेव्हा बड्या पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची यादी शिवसेना नेत्यांचे उजवे हात अनिल परब यांच्याकडून आल्याचे जाहीर झाले होते. श्रीमान परब यांनीही ती यादी त्यांच्या “सुप्रीमो” कडून आल्याने पुढे पाठवली अशा वार्ता होत्या. शिवाय शिवसेना नेतृत्वाला अडचणीत आणणारे म्हणून संजय राऊत यांचे नाव चर्चेत होतेच.

भाजपाचे लढवय्ये माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आरोपांचे कागद फडकावत कोणकोण नेते तुरुंगात जाऊन बसणार त्याची यादीच जाहीर केली होती. “आता नंबर परब यांचा” असेही घोषित करतांनाच मुख्यमंत्र्यांचा (आता माजी) परिवार लपेटला जाईल यावर त्यांचा फोकस होताच. त्यामुळे “कुटुंब परिवार” वाचवण्यासाठी बहुदा “परबाय” स्वाहा : संजयाय स्वाहा: अशी आहुती पडते की काय? अशी शंका माझ्या मागील लेखात व्यक्त केली होती. पण फासे टाकणा-यांचा डाव काही वेगळाच होता. गेल्या जूनच्या तिसऱ्या आठवड्यात शिवसेना फोडून शिवसेनाय स्वाहा: असा पुर्वरंग रंगला. ज्या “मविआ”च्या ताकदीवर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते ती सत्ता एका डावपेचासरशी होत्याची नव्हती झाली हे आपण पाहिले. शिवसेनेचे ठाण्यातील लोहपुरुष एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बहुसंख्य आमदारांचा कळप सुरत, गोवाहाटी – गोव्यात धावला.

दरम्यान “काय झाडी, काय डोंगर, काय हाटील, काय 50 कोटी असे कवित्व अजूनही गाजतेय. “मविआ”च्या लोखंडासोबत बाळासाहेबांची शिवसेना गंज चढून भंगून जाऊ नये या उदात्त हेतूने हिंदुत्वाची मशाल हाती घेत शिवसेनेत बंड नव्हे तर उठाव केल्याचे सांगितले जात आहे. आता तर अदृश्य “महाशक्ती”च्या पाठिंब्याने शिंदे – भाजप युतीचे सरकार सत्तेवर आले. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुमारे 40 आमदार, त्यात मुंबईहून डायरेक्ट गुवाहाटीस धावलेले 9 मंत्री एकवटल्याने शिवसेनेचे तारु फुटीच्या खडकावर आदळून छिन्नविच्छिन्न अवस्थेत आता बुडणारच असे जोरजोरात ढोल वाजवले जाताहेत. शिवसेनेची अस्तित्वाची लढाई जिंकण्यासाठी शिवसेना सोडून गुवाहाटीला पळालेल्या बंडखोरांना संजय राऊत मुखाग्नीद्वारे गद्दार, रेडे, प्रेते अशी विशेषणे बहाल झाली. त्यांच्या बॉड्या येतील, डायरेक्ट पोस्टमार्टम शवागारात पाठवू म्हणून सांगून झाले. राऊत मुखातून संतापज्वाला बरसल्या. छोटे युवराज आदित्य यांनी घाण – कचरा निघून गेला असे टोले हाणले. उद्धवजींनी मात्र “चिमण्यांनो – परत फिरा – रे अशी भावनोत्कट साद घातली. हा साराच अजब प्रकार. जे बंडखोर शिवसेना सोडून गेले त्यांनी परत यावे अशी भूमिका ठेवतांना त्यांच्यावरच शिव्यांची लाखोली का? एकाने गालावरुन मोरपीस फिरवायचे आणि दुसऱ्याने जोडे हाणायचे या दुटप्पीपणाला काय म्हणायचे? रेल्वे प्रवासाला जाणारे प्रवासी आपले जड सामान उचलण्यासाठी कुली (हमाल)ची मदत घेतात. आता शब्दांच्या दुनियेत नोकरीवर ठेवलेल्यांना शाब्दिक शिवीगाळ करण्याची कामगिरी सोपवून मालक नामानिराळा राहू इच्छितो असे दिसते. परंतु पाहुण्याच्या हातून साप – विंचू ठेचण्याची ही इरसाल खेळी म्हटली जात आहे.

महाराष्ट्राच्या सत्तांतराच्या डाव यशस्वी करून सोंगट्या हव्या तशा मांडणा-यांना अद्याप हवा तसा परिणाम दिसत नसल्याने की काय किंबहुना अपेक्षित पुढच्या रिझल्टसाठी शिवसेनेची अजून ठेचणी करायची दिसते. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भावनात्मक आवाहनाचे काही परिणाम दिसताहेत. शिंदे गटाकडे धावून आलेल्या चाळीस – पन्नास जणांच्या जथ्थ्याचे कोटकल्याणासाठी हा डाव मांडलेला नव्हता याची जाणीव होताच कुंपणावर बसलेले उड्या मारतील. सध्या तिकडून इकडे आलेले पुन्हा तिकडे जाण्याचे इशारे देत आहेत. आमची नेत्या बद्दल तक्रार नव्हती – नाही पण विठ्ठला भोवतीचे “बडवे” तेवढे आवरा, प्रमुख मुनीमजी छाप बडवा म्हणजे संजय राऊत हाच खलनायक समुद्रात बुडावा म्हणून हाकाटी सुरु झाली आहे. संजय राऊत यांना व्हिलन ठरवण्याचा खेळ हीसुद्धा एक चाल दिसते. त्यासाठी शिवसेनेच्या दहा खासदारांचा गट फोडण्याचे संकेत आहेत.

राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्गु यांना शिवसेनेने म्हणजे उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा जाहीर करावा यासाठी पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांना पुढे करुन शिवसेनेला कैचीत पकडले जात आहे. शिंदेशाही सरकार राज्यात असले तरी शिवसेनेचे 18 खासदार हे मात्र अद्याप ठाकरे गटात आहेत. बाळासाहेबांची शिवसेना हाच बिल्ला वापरुन ते खासदार बनले आहेत. त्यापैकी बारा खासदार शिंदे गटात गेले तरच खासदारातील फूट विधीग्राह्य ठरु शकते. शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण शिंदे गटाकडे जाणार की गोठवणार? हे काही दिवसात स्पष्ट होईल. शिवाय शिवसेना ठाकरे गट – शिंदे गट कायद्याची लढाई आहेच. शिवसेनेचा नफा – नुकसान यापेक्षा केंद्रात सत्तारुढ भाजपाचा फायदा-तोटा लक्षात घेतला जाईल. शिवाय आगामी बृहन्मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक महापालिका जिंकायचे भाजपचे “लक्ष” दिसते. त्याहीपेक्षा 2024 च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून 46 खासदार एकटा भाजप कसे देणार? त्यासाठी नेमकी कुणाकुणाची ताकद वापरायची? कुणाला “युज अँड थ्रो” करायचे हा मनोरंजक खेळ पाहण्यासाठी काही प्रतीक्षा आवश्यक वाटते. त्यातही कोणी “गुगली” टाकलीच तर संजय राऊत यांना व्हिलन ठरवून “बळीचा” बकरा करण्याचा खेळ करणाऱ्या आधुनिक गोबेल्सची टीम जिंकते की हरते? स्वार्थाची खेळी कोण कशी खेळतो हे पाहणे जास्त रंजक ठरावे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here