अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या तरुणाला जन्मठेप

अकोला : ओळखीचा गैरफायदा घेऊन युवकाने अकराव्या वर्गात शिकत असलेल्या अल्पवयीन मुलीला घरी बोलावले होते. तिला धमकावून व अ‍ॅसिड टाकण्याची धमकी देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले होते. लैंगिक अत्याचारातून पीडित गर्भवती राहिली होती. या प्रकरणी नराधम आरोपीला जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषी ठरवून त्याला वेगवेगळ्या तीन कलमान्वये जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.

२३ वर्षीय आरोपी हा कृषी नगरातील राहुल नगरात राहतो. आरोपी व पीडित मुलगी एकाच कॉलेजमध्ये शिकत होते. धार्मिक ज्ञान असल्याचे भासवून तो १२ नोव्हेंबर २०१९ रोजी दुपारी १ ते २ च्या सुमारास त्याने या मुलीला त्याच्या घरी प्रवचन ऐकण्यासाठी बोलावले. घरात कुणी नसल्याचे पाहून त्याने मुलीवर अतिप्रसंग केला. कुणाला काही सांगितले तर अ‍ॅसिड टाकून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर मुलगी गर्भवती राहिली. मुलीने आरोपीला गर्भवती असल्याचे सांगितल्यानंतर त्याच्या आईवडिलांनी त्या मुलीला घरी बोलावले. तेथे तिला गर्भपाताच्या गोळ्या दिल्या. त्यानंतर मुलीला त्रास झाल्याने अखेर मुलीच्या आईने तिला सर्वोपचार रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी ती दोन महिन्याची गर्भवती असल्याचे सांगितले. त्यानंतर तेथे आरोपीचे आईवडीलही रुग्णालयात गेले होते. मात्र पोलिसांत माहिती दिल्यानंतर ते पळून गेले होते. त्यानंतर मुलीचा गर्भपात झाला आणि सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले होते.

या गुन्ह्याचा तपास तत्कालीन सपोनि विशाल नांदे यांनी करून न्यायालयात आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. डी. पिंपळकर यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत कलम ३७६ मध्ये आजीवन कारावास व ५० हजार रुपये दंड, कलम ३१२ मध्ये सात वर्षे सक्तमजुरी व १० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने साधी कैद, कलम ११३ मध्ये १० वर्षे सक्त मजुरीची शिक्षा व १० हजार रुपये दंड, कलम ५०६ मध्ये सात वर्षे सक्त मजुरीची शिक्षा व १० हजार रुपये दंड, पोक्सोचे कलम ३, ४ मध्ये आजीवन कारावास व ५० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने साधी कैद, पोक्सोचे १६, १७ मध्ये आजीवन कारावास व ५० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. आरोपीला आजीवन कारावास आणि एकूण चार लाख ५० हजार रुपये दंड भरावा लागणार आहे. सर्व शिक्षा आरोपीला एकाचवेळी भोगाव्या लागणार आहेत.

या गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस निरीक्षक विशाल नांदे यांनी केला होता. उत्कृष्ट तपासाबद्दल पोलिस दलातर्फे त्यांना दोन हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले. तसेच तपासात प्रभारी अधिकारी भानुप्रताप मडावी यांना पाचशे, नापोकॉ संजय टाले यांना दीड हजार, कोर्ट पैरवी श्रीकांत गावंडे, प्रवीण पाटील, प्रदीप जाधव यांना एक हजारांचे बक्षीस देण्यात आले. आरोपी आणि पीडित मुलीने दरम्यान लग्न केले होते. त्यानंतर न्यायालयात खटला चालला. पीडित मुलगी मात्र न्यायालयासमोर फितूर झाली. डॉक्टरांची साक्ष व वैद्यकीय पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत शिक्षा ठोठावली.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here