बालगंधर्व स्मृती दिनानिमित्त “नाट्य संगीत रजनी” कार्यक्रमाचे आयोजन

मुंबई – नारायण श्रीपाद राजहंस ऊर्फ बालगंधर्व या नावाने लोकप्रिय असलेले, विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळातील मराठी रंगभूमीवरील अभिनेता, गायक आणि नाट्यनिर्माते. ज्या काळी रंगभूमीवर स्त्रिया अभिनय करत नसत त्या काळात आपल्या हुबेहुब रंगवलेल्या स्त्री भूमिकांमुळे ज्यांनी मोठी लोकप्रियता कमवली. अशा थोर बालगंधर्व यांच्या स्मृती दिनाचे औचित्य साधून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाअतर्गंत सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून “नाट्य संगीत रजनी” या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन दि. ३० जुलै, 2022 रोजी छत्रपती संभाजी राजे नाट्य मंदिर, जळगाव येथे करण्यात आल्याची माहिती श्री. विभीषण चवरे संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय यांनी दिली आहे.

मराठी माणसाच्या ह्दयात कायमस्वरूपी स्थान मिळवलेल्या व्यक्तींच्या यादीत बालगंधर्वांचा समावेश होतो. १९०५ मध्ये किर्लोस्कर नाटक मंडळीच्या “शाकुंतल” नाटकातून त्यांनी नाट्यविश्वात प्रवेश केला. तेव्हापासून ते १९५५ पर्यंत त्यांनी रंगभूमीवर विविध स्त्री-पुरुष भूमिका करून मराठी नाटकाच्या जडणघडणीत मोठी भूमिका बजावली. मराठी संगीत रंगभूमीला लोकप्रिय आणि समृध्द करण्यात बालगंर्धांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. “पुरुषाच्या देहातून स्त्रीचे सौंदर्य इतक्या मोहकतेने कधीच प्रकट झाले नसेल ” असे त्यांच्या बद्दल आचार्य अत्रे यांनी म्हटले आहे. त्यांच्या स्मृती दिनाचे औचित्य साधून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाअतर्गंत सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून “नाट्य संगीत रजनी” या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे.

या सांस्कृतिक कार्यक्रमात प्राजक्ता काकतकर, ओंकार प्रभुघाटे हे कलाकार आपली कला सादर करतील. तबला साथ धनंजय पुराणिक, ऑर्गन मकरंद कुंडले यांची असेल. सदर कार्यक्रमाची संकल्पना व सादरीकरण स्व.वसंतराव चांदोरकर स्मृति प्रतिष्ठान यांनी केले असून कार्यक्रमाचे निवेदन दिप्ती भागवत या करणार आहेत. कार्यक्रमास अभिजित राऊत, जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी, जळगाव जिल्हा आणि डॉ.प्रवीण मुंडे, जिल्हा पोलीस अधीक्षक हे उपस्थित राहणार आहेत. सदर कार्यक्रमासाठी काही जागा या निमंत्रितांसाठी राखीव आहेत. सदरील कार्यक्रम हा विनामूल्य असून सर्व रसिक प्रेक्षकांनी या कार्यक्रमाचा भरुभरुन आस्वाद घेण्याचे आवाहन विभीषण चवरे, संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय यांनी केले आहे

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here