पोलिस बनले डॉक्टर, अ‍ॅक्टींग केली भलतीच भारी— नशेच्या गोळ्या विकणा-यांची पोल उलगडली सारी

औरंगाबाद : आरोपीला अंधारात ठेवून पकडण्यासाठी पोलिस काय युक्ती करतील हे आरोपी आणि सामान्य जनतेला देखील समजत नाही. नशेच्या गोळ्या विकणा-या काका – पुतण्याला पकडण्यासाठी औरंगाबाद पोलिसांनी चक्क डॉक्टरांच्या वेशात जावून सापळा रचून पकडल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत महत्वाची बाब म्हणजे नशेच्या गोळ्या खरेदीची ऑर्डर त्यांना घाटी रुग्णालयातूनच मिळाली होती. पकडण्यात आलेल्या पुतण्याचे काही दिवसांनी लग्न होणार होते. त्यामुळे आपल्याला सोडून द्यावे अशी आग्रही विनंती तो पोलिसांकड करत होता. शेख नय्यर शेख नईम (22), शेख रहीम शेख मेहबूब (53), दोघेही रा. आसिफ कॉलनी औरंगाबाद अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोघा काका पुतण्या संशयीत आरोपींची नावे आहेत.

औरंगाबाद शहरात वाढत असलेली नशाखोरी आटोक्यात आणण्यासाठी एनडीपीएस पथकाचे काम सुरु आहे. घाटी रुग्णालय परिसरात रेकॉर्डवरील गुन्हेगार शेख नय्यर हा नशेच्या गोळ्या विक्री करण्यासाठी येणार असल्याची गोपनीय माहिती पथकला समजली होती. त्या माहितीच्या आधारे शनिवारी सहायक निरीक्षक हरेश्वर घुगे, औषध निरीक्षक जीवन जाधव, अंमलदार नसीम खान, विशाल सोनवणे, महेश उगले, धर्मराज गायकवाड, सुरेश भिसे, प्राजक्ता वाघमारे, दत्ता दुभळकर आदींनी सापळा रचला.

घाटी रुग्णालय कर्मचारी निवासस्थानाकडे जाणाऱ्या मार्गावर रचण्यात आलेल्या सापळ्यात एक डमी ग्राहक उभा करण्यात आला. पथकातील काही जण डॉक्टरांचा अ‍ॅप्रन परिधान करत गळ्यात स्टेथेस्कोप तसेच हातात जाडजुड पुस्तके घेवून काही अंतरावर बोलत उभे राहिले. त्यामुळे पोलिस आपल्यावर टपून बसले असल्याची आरोपींना कल्पना आली नाही.

नशेच्या गोळ्या विक्री करण्यासाठी आरोपी नय्यर डमी ग्राहकाच्या दिशेने गेला. व्यवहार सुरु होताच दबा धरुन बसलेल्या पोलिस पथकाने दोघांना ताब्यात घेत पुढील कारवाई सुरु केली. नय्यर याच्या कब्जातून 76 गोळ्या, मोबाईल, रोख रक्कम आणि दुचाकी हस्तगत करण्यात आली. नय्यर याचे काही दिवसांनी लग्न होणार असल्याने घरात लग्नाची तयारी सुरु होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here