भावाच्या पत्नीबद्दल शिवाजीने वापरले ते अपशब्द— संतप्त सुरेशच्या हल्ल्यात झाला कायमचा नि:शब्द

जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क) :  सुरेश आणि शिवाजी हे दोघे भाऊ होते. चाळीसगाव तालुक्यातील अभोणे या गावी राहणा-या लताबाई तुकाराम पाटील या मातेने जन्म दिलेल्या दोघा मुलांचे काही केल्या आपसात जमत नव्हते. दोघा भावांमधे काही ना काही कारणावरुन वाद होत असे. दररोज कोणत्या ना कोणत्या तरी कारणावरुन सुरेश आणि शिवाजी या दोघा भावांमधे वादाची ठिणगी पडत असे. दोघातील वाद कधी कधी विकोपाला देखील जात असे. दोघा भावांचे लग्न झाले होते. दोघांना आपला गृहसंसार होता. लहान भाऊ शिवाजी हा मोठा भाऊ सुरेशला अतिशय खालच्या दर्जाच्या शिव्या देत असल्यामुळे सुरेशच्या मनात त्याच्याविषयी चिड निर्माण झाली होती.

शिवाजी हा त्याच्या पत्नी व मुलांसह नजीकच्या कळमडू या गावी राहण्यास गेला. मात्र तरीदेखील तो अभोणे येथे येवून मोठा भाऊ सुरेश सोबत वाद घालण्याचे काम करतच होता. आई लताबाई आणि सुरेश व त्याचा परिवार असे अभोणा या गावी एकाच ठिकाणी रहात होते. दोघा भावांचा नेहमी होणारा वाद आणि शिवीगाळ बघून लताबाईच्या मनाला मोठ्या प्रमाणात वेदना होत असत. आपल्या दोघा मुलांनी वाद घालू नये अशी लताबाईची इच्छा होती. मात्र दोघा भावातील धुसफूस काही केल्या थांबत नव्हती. कधी कधी दोघा भावात हाणामारी देखील होत असे.

सुरेश आणि शिवाजी या दोघा भावांमधील वाद, शिवीगाळ आणि हाणामारी अभोणा गावातील लोकांसाठी नित्याचा प्रकार झाला होता. त्यामुळे “रोज मरे त्याला कोण रडे” या म्हणीप्रमाणे गावकरी देखील त्यांच्या भानगडीत पडत नव्हते. प्रत्येक जण दोघा भावांचे वाद बघून न बघितल्यासारखे आणि ऐकून न ऐकल्यासारखे करत होते. प्रत्येक जण दोघांच्या भानगडीकडे दुर्लक्ष करुन आपल्या कामात लक्ष घालत होते.  सुरेश यास पत्नी व तिन मुले होती. शिवाजीची गलिच्छ शिवीगाळ बघून सुरेशच्या तिघा मुलांच्या बाल मनावर परिणाम होत असे. आपल्या काकांची अश्लिल, गलिच्छ शिवीगाळ ऐकून बिचारी तिघे मुले काहीच करु शकत नव्हती. बिचारी तिघे मुले मुकाटपणे आपल्या काकाची आपल्या वडीलांसोबत होत असलेली हमरीतुमरी बघत होती. लताबाईने तिचा लहान मुलगा शिवाजी यास कित्येकदा समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. गावातील लोक तुम्हा दोघा भावांचे रोजचे वाद बघतात. त्यामुळे गावात आपली प्रतिष्ठा कमी होते असे  देखील शिवाजीला त्याच्या आईने समजावले होते. मात्र शिवाजीवर त्याचा काही परिणाम होत नव्हता.

सुरेशची पत्नी सुस्वरुप आणि रहायला निटनेटकी होती. ती नात्याने शिवाजीची वहिणी होती हे कुणाला वेगळे सांगण्याची गरज नव्हती. मोठ्या भावाची पत्नी एक प्रकारे मातेसमान असते. मात्र शिवाजीची विखारी नजर मोठा भाऊ सुरेशच्या पत्नीवर पडली होती. तो तिच्याकडे वाकड्या नजरेने बघत होता. त्याच्या वक्र नजरेत ती त्याला हवीहवीशी वाटत होती.  शिवाजी यास मद्यपान करण्याची सवय जडली होती. मद्याच्या नशेत तो सुरेशच्या पत्नीकडे विखारी नजरेने बघत असे. त्याची वाईट नजर सुरेशच्या पत्नीच्या लक्षात आली होती. त्यामुळे ती शिवाजीपासून नेहमी सावध रहात होती. शिवाजी घरात आला म्हणजे ती घरगुती कामानिमीत्ताने घराबाहेर निघून जात होती.

vishnu avhad – asstt police inspector

25 ऑगस्ट रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास शिवाजी हा मद्याच्या नशेत अभोणा येथे आला. कोणतेही कारण नसतांना त्याने किरकोळ वाद उकरुन काढला. सुरेशच्या पत्नीकडे बघून त्याने अश्लिल बोलण्यास सुरुवात केली. “ही खाट कोणा करता टाकेल शे, चाल मना बरबर झोप” असे तो सुरेशच्या पत्नीला अहिराणी बोलीभाषेत म्हणाला. त्याच्या अशा खालच्या स्तरावरील बोलण्यामुळे साहजीकच सुरेशला चिड आली. मात्र लताबाईने त्याची समजूत घालत त्याला घराबाहेर काढले. बराच वेळ वाद घातल्यानंतर मारहाण करण्याची धमकी देत तो तेथून गेला. शिवाजीची बिघडलेली मानसिकता लक्षात घेत सर्वजण त्या रात्री गावातील एका परिचिताकडे झोपण्यास निघून गेले.

26 ऑगस्ट 2022 चा दिवस उजाडला. या दिवशी पोळा हा सण होता. ग्रामीण भागात पोळा या सणाला महत्व असते. बळीराजा आपल्या बैलांना या दिवशी सन्मानपुर्वक सजवून त्याची मिरवणूक काढत असतो. सुरेश आपल्या परिवारासह सकाळीच आपल्या घरी परतला. पोळा सण साजरा करण्यासाठी तो उत्साहाने तयारीला लागला. मात्र सकाळीच सात वाजता शिवाजी त्याच्या घरात मद्यधुंद अवस्थेत परत हजर झाला.

पोळा या सणाच्या दिवशी शिवाजीने दिवसभर सुरेश आणि त्याच्या परिवाराला त्रास दिला. दिवसभर तो मद्यपान करुन त्याच्या घरी येत जात होता. त्याच्या अशा वर्तनामुळे सुरेशच्या घरातील पोळा या सणाच्या आनंदावर आणि उत्साहावर पाणी फिरले होते. सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास सुरेश हा गावात बैल मिरवण्यासाठी गेला होता. त्यावेळी सुरेशची पत्नी घराबाहेर ओट्यावर बसलेली होती. त्याचवेळी शिवाजी तेथे आला. काही वेळाने सुरेश देखील पोळ्याचे बैल मिरवून घरी परत आला. दोघे भाऊ अमोरासमोर आले. नेहमीप्रमाणे शिवाजी मद्यधुंद अवस्थेत होता.

शिवाजीला घरी कळमडू  येथे निघून जाण्यास त्याची आई लताबाईने सांगितले. मी घरी जाणार नाही असे शिवाजीने आई लताबाईला म्हटले. त्यावर लताबाईने त्याला येथे वाद घालू नको असे समजावले. आज रात्री मी येथेच मुक्काम करणार आहे असे म्हणत शिवाजी वाद घालू लागला. मद्याच्या नशेत तो सुरेशला म्हणाला की “आज मला तुझ्या पत्नीजवळ झोपू दे.”

शिवाजीचे असे बोलणे सुरेशच्या जिव्हारी लागले. आपलाच लहान भाऊ आपल्या पत्नीजवळ झोपण्याची अपेक्षा ठेवतो हे ऐकूनच सुरेश अस्वस्थ झाला. संतापाच्या भरात सुरेशने त्याला चांगलेच खडसावले. दोघा भावांमधे हाणामारी सुरु झाली. दिर शिवाजीची विखारी नजर आणि सुरु झालेला दोघा भावांमधील वाद बघता सुरेशच्या पत्नीने आपल्या मुलांना सोबत घेत घराबाहेर जाणे पंसत केले. सुरेशची पत्नी घरातून निघाल्यावर दोघा भावांमधे हाणामारी सुरु झाली.

दरम्यान संतापाच्या भरात सुरेशने पोळा सणानिमीत्त बैलांच्या पुजेसाठी ओटयावर ठेवलेली लोखंडी पास उचलली. आपल्या पत्नीजवळ झोपण्याची अपेक्षा बोलून दाखवणा-या लहान भावाची सुरेशच्या मनात प्रचंड चिड निर्माण झाली होती. हातातील लोखंडी पास त्याने मद्यधुंद शिवाजीच्या चेह-यावर मारली. या हल्ल्यात शिवाजीच्या कपाळातून भळाभळा रक्त वाहू लागले. या हल्ल्यामुळे एकच हल्लकल्लोळ माजला. घराबाहेर गेलेली सुरेशची पत्नी काय झाले हे बघण्यासाठी पुन्हा माघारी फिरली.

परिसरातील लोकांनी लागलीच घटनास्थळी धाव घेतली. उपस्थित जमावाने जमीनीवर रक्तबंबाळ पडलेल्या शिवाजीला उचलून कॉटवर ठेवले. सुरेश आणि शिवाजी या दोघा भावांच्या बायका घटनास्थळी दाखल झाल्या. शिवाजीची रक्ताच्या थारोळ्यातील अवस्था बघून त्याच्या पत्नीची तर काहीवेळ दातखिळीच बसली. त्यामुळे ती काहीवेळ जागेवरच स्तब्ध बसून राहीली.  

या घटनेची कुणीतरी दवाखान्यात माहिती दिली. माहिती मिळताच शासकीय रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. जखमी शिवाजीला त्या अ‍ॅंम्ब्युलन्सद्वारे मेहुणबारे ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील वैद्यकीय अधिका-यांनी तपासून त्याला मयत घोषित केले. वाटेतच मृत्यूने शिवाजीला गाठले होते. या घटनेची माहिती मिळताच मेहुणबारे  पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक विष्णू आव्हाड यांनी आपल्या सहका-यांच्या मदतीने घटनास्थळ आणि दवाखाना गाठला. हल्लेखोर सुरेश पाटील यास ताब्यात घेण्यात आले.

या घटनेप्रकरणी लताबाईने आपला मोठा मुलगा सुरेश याच्याविरुद्ध मेहुणबारे पोलिस स्टेशनला शिवाजी याच्या हत्येचा गुन्हा दाखल केला. सदर गुन्हा मेहुणबारे पोलिस स्टेशनला भाग 5 गु.र.न. 194/22 भा.द.वि. 302, 504 नुसार दाखल करण्यात आला. हल्लेखोर संशयीत आरोपी सुरेश पाटील यास अटक करण्यात आली. या गुन्ह्याचा पुढील तपास स.पो.नि. विष्णू आव्हाड यांच्यासह त्यांचे सहकारी कमलेश राजपूत करत आहेत. या गुन्ह्याच्या तपासकामी पोलिस उप निरीक्षक प्रकाश चव्हाणके, सहायक फौजदार धर्मराज पाटील, पो.कॉ. निलेश लोहार आदींचे सहकार्य लाभत आहे.  संशयीत सुरेश पाटील सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here