भगवानच्या मनात उसळली संतापाची लाट!!– सत्यवानच्या हत्येने घरात वाहले रक्ताचे पाट

जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क): भगवान धोंडू महाजन आणि सत्यवान धोंडू महाजन हे दोघे सख्खे भाऊ होते. भगवान हा मोठा तर सत्यवान हा लहान भाऊ होता. एरंडोल तालुक्यातील उत्राण (गुजर हद्द) गावात राहणारे दोघे भाऊ अविवाहीत होते. भगवान याने वयाची साठी ओलांडली होती. दोघे भाऊ प्रौढ झाले होते. मात्र दोघांनी अद्याप लग्न केले नव्हते. एकाच घरात दोघे अविवाहीत भाऊ एकत्र रहात होते. या दोघा भावांच्या सर्वात मोठ्या भावाने मात्र लग्न केले होते. आपल्या परिवारासह आईला सोबत घेत वडीलोपार्जीत राहते घर त्याने कायमचे सोडून दिले होते. उत्राण या गावी असलेले वडीलोपार्जीत घर आणि दोघे लहान भाऊ यांच्यात मोठा भाऊ आणि आई यांना कुठलेही सारस्य नव्हते. गेल्या तेरा वर्षापासून ते चाळीसगाव येथे राहण्यास निघून गेले होते. आपले दोघे अविवाहीत भाऊ उत्राण (गुजर हद्द) या गावी कसे राहतात, काय काम करतात याच्याशी मोठ्या भावाला काही सोयरसुतक नव्हते.

भगवान यास अध्यात्म आणि इतिहासाची आवड होती. अध्यात्मासह इतिहासावर बोलण्याची संधी मिळाली म्हणजे तो सोडत नव्हता. थोर पुरुषांविषयी बोलण्यास त्याला आवडत होते. घराबाहेर अध्यात्मावर भरपूर बोलणा-या भगवानचे घरात लहान भाऊ सत्यवान सोबत अजिबात पटत नव्हते. दोघा भावांच्या भांडणाला वडीलोपार्जीत घर विकण्याच्या वादाची किनार होती. दोघे भाऊ रहात असलेले वडीलोपार्जीत घर विकण्याचा हेका भगवान लावत असे. घर विकल्यास येणा-या रकमेत सत्यवान यास हिस्सा हवा होता. मात्र तो हिस्सा देण्यास भगवानची नकारघंटा रहात होती. त्यामुळे दोघा भावात वादाची ठिणगी पडत होती. घर विकून येणा-या रकमेत आपल्याला हिस्सा मिळणारच नसेल तर हे घर कुणी घेवूच नये यासाठी सत्यवान प्रयत्न करत होता. कुणी घर घेण्यास तयार झाल्यास घराला किंमत कमी आली पाहिजे असा देखील सत्यवान प्रयत्न करत होता. दोघा भावांमधे घर विक्रीचा वाद सुरु असल्याचे गावक-यांना माहिती झाले होते. एकंदरीत वडीलोपार्जीत रहात असलेले घर विक्रीच्या विषयावरुन दोघा भावांमधील वाद हा नित्याचा झाला होता. त्यामुळे ते घर विकत घेण्यास कुणी पुढे येत नव्हते. कुणी आल्यास अडून कमी किंमत देण्याची भाषा करत होता. त्यामुळे भगवानला लहान भाऊ सत्यवानचा राग येत होता.

sanshayit bhagvan patil

अखेर सत्यवानच्या जीवनातील 12 सप्टेबर 2022 चा तो अखेरचा दिवस उजाडला. नेहमीप्रमाणे लघुशंका करण्यासाठी सत्यवान घरातील बाथरुम मधे गेला. लघुशंका करुन आल्यावर सत्यवान याने बाथरुम मधे पाणी टाकले नाही. त्यामुळे घरात दुर्गंधी पसरली. लघुशंका केल्यानंतर बाथरुम मधे पाणी न टाकण्याचा हा प्रकार सत्यवान नेहमीच करत होता. त्यावरुन देखील दोघा भावांमधे वाद होत असे. दोघांच्या वादाला एखादे लहानसे कारण देखील पुरेसे ठरत होते. बाथरुम मधे पाणी का टाकले नाही यावरुन भगवानने सत्यवानला खडसावले. सत्यवान याने देखील मोठा भाऊ भगवान यास तेवढ्याच ताकदीने प्रति उत्तर दिले. लघुशंका केल्यामुळे पसरलेल्या दुर्गंधीमुळे अगोदरच भगवानचे डोके भडकले होते. त्यातच सत्यवानचे प्रतीउत्तर ऐकून भगवान अजूनच भडकला. संतापाच्या भरात भगवान याने घरातील लोखंडी मुसळी हाती घेतली. हातातील मुसळीचे एकामागून एक वार भगवानकडून सत्यवानवर होण्यास सुरुवात झाली.

मुसळीच्या हल्ल्यात सत्यवान काही क्षणातच गत:प्राण झाला. होत्याचे नव्हते होण्यास वेळ लागला नाही. सख्ख्या मोठ्या भावाने लहान भावावर मुसळीने हल्ला केला होता. त्या हल्ल्यात लहान भाऊ सत्यवान कायमचा संपला होता. आपला लहान भाऊ हे जग कायमचे सोडून गेल्याचे बघून भगवान काही वेळ अस्वस्थ झाला. सत्यवानच्या मृतदेहाची विल्हेवाट लावायची कशी? हा प्रश्न त्याला सतावू लागला. त्याने त्याचा मृतदेह घराच्या मागच्या खोलीत ओढत ओढत नेला. कुणाला दिसणार नाही अशा पद्धतीने त्याने सत्यवानचा मृतदेह झाकून ठेवला. या घटनेची त्याने कुठेही वाच्यता केली नाही. सायंकळ झाल्यानंतरदेखील त्याने जेवण केले नाही. लहान भाऊ ठार केल्यानंतर त्याची भुक उडाली होती. न जेवताच तो सायंकाळी गावातील ग्रामपंचायतीच्या ओट्यावर झोपून गेला.

मध्यरात्री सर्वत्र सामसूम झाल्यानंतर तो हळूच आजूबाजूचा कानोसा घेत जागेवरुन उठला. तो वापरत असलेली सायकल त्याने बाहेर काढली. घरात जमीनीवर सांडलेले मयत सत्यवानचे रक्त त्याने पुसून काढले. कपाशी भरण्याच्या पोत्यातील सत्यवानचा मृतदेह त्याने सायकलने गिरणा नदीच्या किनारी वाहून नेला. आपल्याला कुणी बघत नसल्याची खात्री पटल्यानंतर त्याने सत्यवानच्या मृतदेहाचे पोते गिरणा नदीच्या प्रवाहात फेकून दिले. रात्री सुमारे अडीच वाजेच्या सुमारास तो सायकलीने घरी परत आला. त्यानंतर जणूकाही झालेच नाही अशा अविर्भावात भगवान सकाळी कामाला लागला. मात्र दररोज दिसणारा सत्यवान गावात कुठेही दिसत नसल्यामुळे तो एक चर्चेचा विषय झाला होता. दोघा भावांमधील होणारा रोजचा वाद कुणालाच ऐकू येत नव्हता.

बघता बघता पाच दिवस उलटून गेले. पाचव्या दिवशी 16 सप्टेबर रोजी भातखेडे येथील धनराज पाटील हे अस्थी विसर्जन करण्यासाठी नदीकाठी महादेव मंदीराजवळ आले होते. त्याचवेळी त्यांना नदी किनारी एका अनोळखी पुरुषाचा फुगलेला व  कुजलेला मृतदेह उंबराच्या झाडाजवळ पाण्यात तरंगतांना आढळून आला. त्यांनी लागलीच हा प्रकार उत्राण येथील महिला पोलिस पाटील रेखा पाटील यांच्या कानावर टाकला.

घटनेची माहिती मिळताच रेखा पाटील यांच्यासह गावक-यांनी घटनास्थळावर धाव घेतली. या प्रकाराची माहिती कासोदा पोलिस स्टेशनला देण्यात आली. माहिती मिळताच कासोदा पोलिस स्टेशनच्या महिला सहायक पोलिस निरीक्षक निता कायटे यांनी आपल्या सहका-यांसह धाव घेतली. पाण्यात वाहून आलेला सत्यवानचा मृतदेह सर्वांसाठी अनोळखी होता. याप्रकरणी सुरुवातीला कासोदा पोलिस स्टेशनला सीआरपीसी 174 नुसार 20/2022 या क्रमांकाने अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली.

हा घातपाताचा प्रकार असल्याचे लक्षात आल्यानंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक नीता कायटे यांनी तपासाला वेग दिला. मृतदेहाची ओळख पटवण्याचे गावक-यांना आवाहन करण्यात आले. ओळख पटण्यास फार वेळ लागला नाही. मयताच्या कपड्यावरुन तो उत्राण (गुजर हद्द) गावातील सत्यवान पाटील असल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान उत्राण (गुजर हद्द) गावचे पोलीस पाटील राजेंद्र माधव महाजन, सरपंच योगेश सुरेश महाजन यांनी स.पो.नि. निता कायटे यांची भेट घेतली. त्यांनी स.पो.नि. निता कायटे यांना सांगितले की आम्ही रहात असलेल्या गावातील भगवान धोंडू महाजन हा गावातून बेपत्ता झाला आहे. गेल्या पाच दिवसांपासून तो गावात कुठेही दिसत नाही. भगवान आणि त्याचा लहान भाऊ सत्यवान या दोघांमधे वडीलोपार्जीत घरावरुन वाद सुरु होता. गावातून बेपत्ता झालेल्या भगवान यानेच सत्यवानचा घातपात केला असावा असा संशय त्यांनी व्यक्त केला. संपुर्ण गावात देखील भगवानच्या नावाची चर्चा सुरु होती.

स.पो.नि. निता कायटे यांनी आपल्या सहका-यांसह उत्राण (गु.ह.) गावी जावून भगवानचा शोध घेतला. तो गावातून फरार झाल्याचे पोलिस पथकाच्या लक्षात आले. अधिक तपासादरम्यान फरार संशयीत भगवान हा एका शेतात व तेथून एका दुचाकीवर डबलसीट बसून एरंडोल बस स्थानकावर गेल्याचे उघडकीस आले. रस्त्यावरील एका  पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही फुटेजमधे देखील तो पोलिसांना दिसून आला.  त्याचा माग काढत पोलिस पथक एरंडोल बस स्थानकावर जावून धडकले. तो एका कोप-यात लपून बसला होता. पळून जाण्याच्या बेतात असतांनाच त्याला कासोदा पोलिस स्टेशनच्या तपास पथकाने ताब्यात घेतले. स.पो.नि. निता कायटे यांच्यासमक्ष त्याला हजर करण्यात आले.

स.पो.नि. निता कायटे यांनी अगोदर आपल्या रसाळ वाणीने व नंतर रणरागीणीचे खाकी रुप दाखवत त्याला गुन्हा कबुल करण्यास भाग पाडले. होय मी लहान भाऊ सत्यवान याची लोखंडी मुसळी मारुन हत्या केल्याचे भगवान याने कबुल केले. हे.कॉ. समाधान दौलत सिंहले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कासोदा पोलिस स्टेशनला भगवान धोंडू पाटील याच्या विरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हा भाग 5 गु.र.न. 127/22 भा.द.वि. 302, 201 नुसार नोंद करण्यात आला. पोलिसांच्या ताब्यातील भगवान पाटील यास अटक केल्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने सुरुवातीला त्याला पोलिस कोठडी सुनावली. पोलिस कोठडी दरम्यान त्याने आपला गुन्हा कबुल करत सर्व घटनाक्रम कथन केला.  संशयीत आरोपी भगवान पाटील सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here