शिंदे-ठाकरे गटातील वाद – निवडणूक आयोगासमोर पुढील महिन्यात सुनावणी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंडखोरीनंतर शिवसेना पक्षात उघड-उघड दोन गट पडले आहेत. या बंडखोरीनंतर आम्हीच शिवसेना पक्ष असल्याचा दावा शिंदे गटाने केला आहे. शिवसेनेच्या धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावर देखील शिंदे गटाकडून दावा करण्यात आला आहे. याच वादावर आगामी 12 डिसेंबर रोजी निवडणूक आयोगासमक्ष पहिली सुनावणी होणार आहे.

बंडखोरीनंतर शिंदे गटाने निवडणूक आयोगाला पत्र लिहित आम्हीच खरी शिवसेना असल्याचे म्हणत पक्ष आणि पक्षचिन्हावर दावा केला होता. त्यानंतर उद्धव ठाकरे गटाने न्यायालयात धाव घेत निवडणूक आयोगाला पक्षचिन्हाबाबत कोणताही निर्णय घेण्यापासून रोखावे अशी मागणी केली होती. मात्र न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली होती. त्यानंतर आता शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हावरील वादावर येत्या 12 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. याआधी आयोगाने दोन्ही गटांना पक्ष तसेच पक्षचिन्हावर दावा सांगण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे जमा करण्यासही मुदतवाढ दिली आहे. दोनी गटांना येत्या ९ डिसेंबरपर्यंत निवडणूक आयोगाकडे ही कागदपत्रे जमा करता येणार आहेत.

ऑक्टोबर महिन्याच्या 8 तारखेला निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवले होते. त्यानंतर अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने या दोन्ही गटांना दोन वेगवेगळी नावे आणि चिन्हे दिली होती. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानुसार उद्धव ठाकरे गटाला धगधगती मशाल तर शिंदे गटाला ढाल-तलावर हे चिन्ह देण्यात आले होते. असे असले तरी धनुष्यबाण निवडणूक चिन्हावरील वाद निवडणूक आयोगासमोर अद्याप प्रलंबित आहे. या वादावर सुनावणी घेण्यासाठी निवडणूक आगोयाने दोन्ही गटांना कागदपत्रे सादर करण्यास सांगितले होते. त्यासाठी दोन्ही गटांना 9 डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here