सलग दुस-या वर्षी केक कापून होणार जळगाव मनपाचा निषेध!  

जळगाव :  जळगाव शहरात विविध व्यापारी संकुलातील बेसमेंटचा वापर वाहन पार्कींगऐवजी व्यावसायीक स्वरुपात होत असल्याचे जळगावकर नागरिक उघड्या डोळ्यांनी बघत आहेत. या बेसमेंटवरील कारवाईकामी वेळ मारुन नेली जात असल्याचा प्रकार सलग दोन वर्षापासून होत आहे. सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता  दीपककुमार गुप्ता यांनी सातत्याने याप्रकरणी पाठपुरावा सुरु ठेवला आहे.

RTI Dipak kumar gupta

व्यापारी संकुलात येणाऱ्या ग्राहकांना त्यांच्या ताब्यातील वाहने उभी करण्यासाठी अधिकृत जागेची व्यवस्था मनपाने केलेली नाही. पर्यायाने वाहनधारकांना त्यांच्या ताब्यातील वाहने थेट रस्त्यावर लावण्याची वेळ येते. त्यामुळे वाहनधारकांना जळगाव शहर वाहतुक पोलीस प्रशासनाकडून होणा-या दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागते.

जळगाव महानगरपालिकेने 36 बांधकामे सील करुन ती निष्कासित करावी तसेच पार्किंगची व्यवस्था करावी. 96 प्रकरणांत तत्काळ निर्णय द्यावा. 133 प्रकरणांत अनधिकृत बांधकामांचा शोध घेवून पार्किंगसाठी जागा उपलब्ध करुन द्यावी तसेच महापालिकेने विविध व्यापारी संकुलातील पार्कींगच्या जागेवरील व्यावसायीक वापरावर बंदी आणून ती बांधकामे सील करुन निष्कासित करावी अशा विविध मागण्यांसाठी माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी 7 डिसेंबर 2020 रोजी आयुक्तांच्या दालनासमोर आंदोलन केले होते.

तत्कालीन आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्या सुचनेनुसार तत्कालीन उपायुक्त संतोष वाहूळे यांनी आंदोलनकर्ते सामाजिक कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांना लेखी आश्वासन दिले होते. त्या लेखी आश्वासनानुसार एक आठवड्यात कारवाई होणे अपेक्षीत होते. मात्र दोन वर्ष उलटून गेले तरी त्या लेखी आश्वासनावर कारवाई झालेली नाही. त्यामुळे दीपककुमार गुप्ता यांनी बरोबर एक वर्षांनी 7 डिसेंबर 2021 रोजी या लेखी आश्वासनाच्या निषेधार्थ मनपा प्रशासकीय इमारतीमधे महापौरांसमक्ष केक कापून निषेध व्यक्त केला होता. तरी देखील निगरगट्ट मनपा प्रशासनाने  कोणतीही कारवाई केली नाही.

आता पुन्हा या आश्वासनाला तिसरे वर्ष लागत आहे. या लेखी आश्वासनाच्या दुस-या वर्षाच्या तारखेला अर्थात 7 डिसेंबर 2022 रोजी सामाजीक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता सकाळी साडे अकरा वाजता निषेधाचा केक कापून आश्वासनपुर्ती न  केल्याबद्दल आपला रोष अनोख्या आंदोलनातून प्रकट करणार आहेत. गेल्यावर्षी अशाच स्वरुपाच्या आंदोलनानंतर नगररचना विभागाकडून नेहरु चौक ते टॉवर चौक या परिसरातील व्यापारी संकुलांचे फेर सर्वेक्षण करण्यात आले होते. तिस अवैध बेसमेंट धारकांना नोटीस बजावून त्यातील 27 जणांची सुनावणी घेत केवळ तिन अवैध बेसमेंट धारकांसाठी सकारण आदेश टाईप करुन ठेवण्यात आल्याचे म्हटले जात आहे. उर्वरीत 24 अवैध बेसमेंटधारकांचे आदेश पडून आहेत. या अनोख्या आंदोलनातून आता तरी जळगाव मनपा प्रशासनाकडून अवैध बेसमेंटविरुद्ध कारवाई होणार का? असा प्रश्न विचारला जात आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here